क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची कारवाई, एका अभिनेत्याच्या मुलाचाही सहभाग? #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, PA Media
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.
1. समुद्रात क्रूझवर मध्यरात्री सुरू होती ड्रग्ज पार्टी, एनसीबीच्या धाडीत 10 जण ताब्यात
मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण पथकानं शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. समुद्राच्या मध्यभागी एका क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत 10 जणांना एनसीबीनं ताब्यात घेतलं. यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचा समावेश असल्याचं महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. क्रूझ समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर ही पार्टी सुरू झाली होती, अशी माहिती एनसीबीनं दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकानं या सर्वांना रंगेहाथ अटक केली. त्यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश होता. शनिवारी निघालेली ही क्रूझ सोमवारी मुंबईला परतणार होती, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. तसंच या पार्टीसाठी क्रूझचं तिकिट 80 हजार रुपये एवढं असल्याचंही काही माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे.
2. मी माणुसकी मेलेली पाहिली, माझ्यासोबत कुणीच नव्हतं-धनंजय मुंडे
'कोव्हिडच्या संकटात माणुसकी मेलेली मी पाहिली आहे. कोरोना होण्याआधी माझ्यासोबत 50 लोक असायचे. मात्र कोरोना झाला तेव्हा रुग्णवाहिकेत मी एकटा बसलो होतो. कुणीही सोबत नव्हतं,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, FACEBOOK/DHANANJAY MUNDE
शनिवारी (2 ऑक्टोबर) अहमदनदरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाशी संघर्ष करताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात अनेक नेते, मंत्री यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश होता. त्यादिवसांबद्दल धनंजय मुंडे बोलत होते.
टीव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोव्हिडच्या संकटात आमदार नीलेश लंके यांनी माणुसकी दाखवली आहे, असं म्हणत इतरांपेक्षा त्यांच्या मतदारसंघात जास्त निधी देण्याचं आश्वानसही मुंडे यांनी दिलं.
3. रामदास कदम यांची सोमय्यांना मदत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा पुन्हा आरोप
किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. मात्र यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनीच सोमय्यांना माहिती पुरवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. पुरावा म्हणून कदम आणि सोमय्या यांच्यात झालेल्या संभाषणाच्या क्लिप त्यांनी सादर केल्या आहेत. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती कदम यांनी सोमय्यांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परब यांचं कार्यालय तोडलं जावं, याचाही उल्लेख या ध्वनीफितीमध्ये आहेत.
कदम यांच्या आरटीआय कार्यकर्त्यांबरोबरच्या क्लिपही त्यांनी सांदर केल्या. अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंना सांगून मंत्रिमंडळात माझा समावेश होऊ दिला नाही, असा उल्लेखही कदम यांनी एका क्लिपमध्ये केलेला आहे.
शिवसेनेतील अंतर्गत वादामुळं स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना त्रास होत असल्याचा आरोप करत संजय कदम यांनी वरिष्ठांकडे सर्व पुरावे सादर केल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान रामदास कदम यांनी यापूर्वीही त्यांच्यावरचे हे आरोप फेटाळले होते.
4. देशात वीज संकट निर्माण होण्याची शक्यता, 3 दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध
देशात मोठ्या प्रमाणावर वीज संकट निर्माण होण्याची शक्यता ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे. कोळशाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्यानं हा धोका निर्माण झाल्याचं ऊर्जा मंत्रालयानं सांगितलं आहे. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
देशामधील जवळपास 72 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असल्याचं मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं या प्रकल्पांना वेळेत कोळसा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.

फोटो स्रोत, AFP
या वीज प्रकल्पांना त्यांचा कोळशाचा साठा संपण्यापूर्वी कोळसा उपलब्ध करून दिला नाही, तर अनेक वीज प्रकल्प बंद पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसं झाल्यास देशात मोठं वीज संकट निर्माण होऊ शकतं.
दरम्यान, सरकारी मालकीच्या कोल इंडियाचे कोळसा उत्पादन सप्टेंबरमध्ये किरकोळ वाढून 47 दशलक्ष टन झाले आहे. घरगुती कोळसा उत्पादनात कोल इंडियाचा वाटा सुमारे 80 टक्के आहे.
5. सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या तोंडावर मिळणार पगारवाढ
सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं घरभाडं भत्ता आणि डीएमध्ये वाढ करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केल्यानं, कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये (HRA) 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानं HRA मध्येही वाढ करण्यात आली आहे. लोकमतनं याबाबचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डीए 25 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास HRA मध्येदेखील वाढ केली जाणार असल्याचं जुलै महिन्यात सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता घरभाडं भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे.
या वाढीमुळं कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या शहरांच्या आणि त्यांच्या वेतनाच्या श्रेणीनुसार पगारामध्ये वाढ मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























