निवासी डॉक्टर्स संपावर, विविध मागण्यांसाठी MARDचं आंदोलन #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. राज्यातले निवासी डॉक्टर्स संपावर, विविध मागण्यांसाठी MARDचं आंदोलन

राज्यभरातले निवासी डॉक्टर्स आज सकाळी 8 वाजल्यापासून बेमुदत संपावर गेले आहेत. मार्ड संघटनेला देण्यात आलेल्या विविध आश्वासनांची पूर्तता करण्यात न आल्याने निवासी डॉक्टरांच्या या संघटनेनं संप पुकारला आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शैक्षणिक फी माफी, प्रोत्साहन भत्ता, पालिका महाविद्यालयाच्या डॉक्टर्सच्या टीडीएसचा मुद्दा आणि राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्टेलमधल्या समस्या सोडवाव्यात या सगळ्या निवासी डॉक्टर्सच्या मागण्या आहेत.

कोरोना काळात निवासी डॉक्टर्सनी केलेली रुग्णसेवा आणि यादरम्यान त्यांचं झालेलं शैक्षणिक नुकसान, हे पाहता या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचं आश्वासन दिलं होतं.

राज्यातले 5 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर्स या संपामध्ये सहभागी होत असल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे.

2. कॉंग्रेस कार्यकारिणीची लवकरच बैठक, पक्षात फूट पडत असल्याची ज्येष्ठ नेत्यांना भीती

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या घराबाहेर काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी निदर्शनं केल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सिब्बल यांना पाठिंबा दाखवलाय. सोबतच पक्षामध्ये फूट पडत असल्याची चिंताही पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद या ज्येष्ठ नेत्यांनी बोलून दाखवली आहे.

पंजाबमधली सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षातून बाहेर पडणारे मोठे नेते याकडे पाहता बैठक घेण्यात यावी अशी मागणी या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी केली होती.

यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीची लवकरच बैठक घेणार असल्याचे संकेत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले असल्याचं काँग्रेसचं प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

द इंडियन एक्स्प्रेसने याविषयीची बातमी छापली आहे.

3. अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वाच्या क्षेत्रांची ऑगस्ट महिन्यात चांगली कामगिरी

अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वाच्या 8 क्षेत्रांनी ऑगस्ट महिन्यात प्रगती नोंदवलेली आहे. सिमेंट, वीज निर्मिती, कोळसा आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक प्रगती नोंदवण्यात आली आहे.

जुलै महिन्यात या क्षेत्रांच्या प्रगतीचा दर 9.9% होता. ऑगस्टमध्ये तो 11.6% नोंदवण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या ऑगस्टमहिन्यात या क्षेत्राची 6.9% घसरण झाली होती.

भारताच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी या आठ क्षेत्रांचा 40 टक्के वाटा आहे. त्यामुळे या विभागांमध्ये झालेल्या प्रगतीचा परिणाम एकूणच औद्योगिक उत्पादन क्षेत्रावर दिसून अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी होणार असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने म्हटलंय.

4. राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद

जून ते सप्टेंबर या पावसाच्या चार महिन्यांच्या काळामध्ये राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात 19 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे.

कोकणासोबतच यावर्षी मराठवाड्यातही जास्त पावसाची नोंद झालीय. त्यामुळे धरणांमध्ये सुमारे 84 टक्के पाणीसाठा आहे.

सप्टेंबर महिन्यात राज्यभरात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक पाणीसाठ्याची भर पडली.

तर अतिवृष्टीमुळे मराठवाड्याची नोंद देशातील सर्वाधिक पावसाच्या विभागात झाली असून मराठवाड्यातील जालना जिल्हात सर्वाधिक पाऊस पडलाय. जालन्यात सरासरीपेक्षा 82 टक्के अधिक पाऊस पडल्याचं लोकसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

5. लसीकरण प्रमाणपत्रावर आता जन्मतारीखही नोंदवता येणार

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचं प्रमाणपत्र डाऊनलोड करताना आता भारतीय नागरिकांना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर जन्मतारीखही नोंदवता येणार आहे.

आतापर्यंत या प्रमाणपत्रावर त्या व्यक्तीच्या वयाचा उल्लेख होता, पण जन्मतारीख नव्हती. पण आता ही तारीख सर्टिफिकेटवर येणार असल्याने याचा फायदा आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होईल.

कोविनचं प्रमाणपत्र आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निकषांनुसार असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक राकेश शर्मा यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)