कोरोना व्हायरस : कोव्हिड मृतांच्या कुटुंबांना 50 हजारांची मदत, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. कोरोना मृतांच्या कुटुंबांना 50 हजारांची मदत, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत करण्यात येईल, असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सातत्याने विचारणा केली होती. तसंच अनेकवेळा फटकारलंही होतं. अखेर त्याला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.
देशात आतापर्यंत सुमारे 4 कोटी नागरिकांनी प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबांना मदतीची रक्कम राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही रक्कम दिली जाईल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
याकरिता अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. मृतांच्या कुटुंबांना आपत्ती व्यवस्थापन निधीनुसार, 4 ते 5 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी करण्यात येत होती. पण इतकी मदत करणं शक्य नाही. कोरोना संकट वेगळं आहे, असं केंद्राने म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.
2. महापालिका निवडणूक 2022 : मुंबईत 1 तर इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत
आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत एक सदस्यीय तर इतर ठिकाणी 3 सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे.
बुधवारी (22 सप्टेंबर) आयोजित राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यांसह इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीयऐवजी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवावी, अशी मागणी काही नेत्यांची आहे. त्यातही अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आलेला आहे.
याव्यतिरिक्त नगर पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. त्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपालिकेत 2, तर नगर पंचायतीमध्ये 1 प्रभाग पद्धत असेल, असं राज्य सरकारने सांगितलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
3. 'निवडणूक लढवायची आहे, तर 10 झाडे लावाच'
निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराने त्याच्या मतदारसंघात किमान 10 झाडे तरी लावावीत. अन्यथा त्याला निवडणुकीसाठी अर्जच भरता येणार नाही, असा प्रस्ताव विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला आहे.

फोटो स्रोत, facebook
वातावरणातील बदल व ग्लोबल वॉर्मिंग या संदर्भात विधानभवनात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (22 सप्टेंबर) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत वृक्षारोपणासाठीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव निंबाळकर यांनी राज्य सरकारसमोर मांडला. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. दुर्योधन, दुःशासनाच्या नशिबी आलं तेच त्यांच्या नशिबी येईल - योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशात महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या व्यक्तींची स्थिती महाभारतातील दुर्योधन, दुःशासनाच्या यांच्याप्रमाणे होईल , असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

फोटो स्रोत, Ani
संबलमध्ये योगी आदित्यनाथांच्या हस्ते 62 योजनांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते.
आधी आपल्या बहिणींना, मुलींना शाळेतही जाता येत नव्हतं. तेव्हा गुंडगिरी करणारे या महिलांच्या प्रतिष्ठेसोबत खेळायचे. आज अशी हिंमत केली तर त्यांना धडा शिकवण्यात येईल.
दुर्योधन, दुःशासनाच्या यांच्या नशिबी आलं तेच त्यांच्या नशिबी येईल असं योगींनी म्हटलं.
दरम्यान, समाजवादी पक्ष हा महिला विरोधी, दलितविरोधी आणि मागास वर्गाविरोधी असण्याबरोबरच हिंदूविरोधी तसेच लहान मुलांच्या अधिकारांविरोधात असणारा पक्ष आहे, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. ही बातमी एनडीटीव्हीने दिली.
5. किरीट सोमय्यांचा 28 तारखेला कोल्हापुरात जाण्याचा निर्णय
भाजपचे नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. किरीट सोमय्या हे 28 सप्टेंबरला कोल्हापूरला जाणार आहे.

फोटो स्रोत, Hindustan Times
तिथे गेल्यावर मुश्रीफ यांच्याविरोधात कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहे. दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना कराडमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं.
त्यानंतर आता सोमय्यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























