You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केतकी चितळेला 'ती' वादग्रस्ट पोस्ट भोवणार? कोर्टानं फेटाळला अटकपूर्व जामीन #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-
1. केतकी चितळेला 'ती' वादग्रस्ट पोस्ट भोवणार? ठाणे कोर्टानं फेटाळला अटकपूर्व जामीन
आपल्या वक्तव्यांमुळं चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा अडचणीत आहे. एका वक्तव्याप्रकरणी केतकी यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.
जवळपास दीड वर्षापूर्वी सोशल मीडियावर केलेल्या एका वक्तव्यानं ती अडचणीत आली आहे. केतकीने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यातील आक्षेपार्ह वक्तव्यावरून केतकीला अटक होण्याची शक्यता आहे.
लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
केतकीने फेसबुकवर लिहिलं होतं, "नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो," असं म्हटल्याचा उल्लेख लोकसत्ताच्या वृत्तात आहे.
केतकीच्या या पोस्टवर अनेकांनी आक्षेप घेत टीकाही केली होती. तिच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणीही झाली होती. या प्रकरणी केतकी यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर केतकी चितळेने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण ठाणे कोर्टानं तिचा अर्ज फेटाळल्यानं तिला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2. महाराष्ट्र सदन प्रकरणाने कार्यकर्त्यांना त्रास झाला - छगन भुजबळ
महाराष्ट्र सदनातील घोटाळ्याच्या आरोपातून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यानंतर नाशिकमध्ये जल्लोष झाला. नाशिकमध्ये आल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधत विरोधकांवर टीका केली आहे.
घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये असताना कार्यकर्त्यांची मान खाली झाली, याचं दुःख वाटत असल्याचं छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. मात्र त्याचवेळी लोकांचे आशीर्वाद सोबत असल्याचंही भुजबळ म्हणाले.
सकाळनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
ज्याला हवं त्यांनी आपल्या विरोधात अजूनही उच्च न्यायालयात जावं. आम्ही आणखी उजळ माथ्यानं या प्रकरणातून बाहेर पडू, असं म्हणत भुजबळांनी विरोधकांना आव्हान दिलं.
माझ्यावर झालेल्या कारवाईनंतर एखाद्याला इशारा देताना 'तुमचा भुजबळ करू' असं म्हटलं जात होतं. पण आता तसं म्हणता येणार नसल्याचं म्हणत भुजबळांनी विरोधकांना टोला लगावलाय.
3. केंद्र-राज्याच्या भांडणात आमचा जीव जातोय- प्रताप सरनाईक
अडचणीच्या काळात पक्षानं पाठराखण केली नाही, असा नाराजीचा सूर मांडणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एक वक्तव्य केलं आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या भांडणामध्ये आमचा जीव जात आहे, असं वक्तव्य सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
टीव्ही9 मराठीनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
'राजकारण करत असताना आम्ही कुणाच्या कुटुंबीयांवर हल्ला करत नाही. मात्र आमच्या कुटुंबीयांना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्याचं काम केलं जात आहे. त्याचा कुटुंबीयांना त्रास होतो,' असंही सरनाईक म्हणाले.
किरीट सोमय्या चुकीची माहिती परसवत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल केल्याचं ते म्हणाले. न्यायालयावर विश्वास असून न्यायालयाचा निर्णय मान्य असेल, असंही त्यांन म्हटलं.
प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांची नाराजी व्यक्त केली होती. तसंच या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजपशी जुळवून घ्यावं अशी विनंतीही केली होती.
4. मुख्यमंत्री आले तर स्वागत करू, नारायण राणेंच्या भूमिकेत बदल?
चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? अशा चर्चा असताना या प्रकरणी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेतही बदल झालेला पाहायला मिळत आहे.
विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी यायलाच हवं असं काही नसल्याचं नारायण राणे म्हणाले होते. पण आता मुख्यमंत्री उद्घाटनाला आले तर त्यांचं स्वागत करू, अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
चिपी विमानळावरून विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसंच या विमानतळाचं श्रेय मिळवण्यासाठीदेखील दोन्ही बाजूंमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
राणे कुटुंबीयांचं विमानतळ उभारणीत काहीही योगदान नाही. नीलेश राणे खासदार असताना त्यांनी एकदाही हा प्रश्न संसदेत मांडला नाही. त्यामुळं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका शिवसेनेचे विनायक राऊत यांनी केली आहे.
चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबरला होणार आहे.
5. मीदेखील काश्मिरी पंडित, तुम्हाला मदत करेन; राहुल गांधींचं काश्मिरी पंडितांना आश्वासन
मी आणि माझे कुटुंबीय आम्ही काश्मिरी पंडित आहोत. त्यामुळं काश्मिरी पंडितांना मदत करण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिलं आहे. जम्मूमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं.
एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
काश्मिरी पंडितांना भाजपनं भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांना नुकसान भरपाई देण्यातच आली नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन यावेळी राहुल गांधींनी केलं. आपलं ऐकलं जात असल्याचा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याला आला की, काँग्रेस लोकसभेत 450 जागादेखील जिंकेल असंही राहुल गांधी म्हणाले.
दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या त्रिशक्तींमुळं देशाची प्रगती होते. पण स्वतःला हिंदू म्हणवणारे वैष्णोदेवीच्या मंदिरात दर्शन घेऊन याच त्रिशक्तीचा अपमान करतात, अशी टीकाही राहुल गांधींनी विरोधकांवर केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)