You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिमानी बुंदेला KBC : अंधत्वावर मात करत 1 कोटी जिंकलेल्या मुलीची गोष्ट
आग्रा येथील हिमानी बुंदेला यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, एक दिवस त्यांच्या यशाचं देशभरात कौतुक होईल आणि अमिताभ बच्चन यांच्या तोंडून त्यांना स्वतःची स्तुती ऐकायला मिळेल.
अवघ्या 25 वर्षाच्या वयात हिमानी बुंदेला 'कौन बनेगा करोडपती'च्या 13 व्या हंगामातील पहिल्या करोडपती बनल्यात. त्यांच्या यशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दृष्टीहीन आहेत.
हिमानी 15 वर्षांच्या असताना एका दुर्घटनेत त्यांची दृष्टी गेली. आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील हिमानी यांच्या डोळ्यांची चार ऑपरेशन झाली, पण त्यांची दृष्टी परतली नाही.
पण हिमानी यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली आणि सरकारी नोकरी मिळवणाऱ्या त्या कुटुंबातील पहिल्या व्यक्ती ठरल्या.
केंद्रीय विद्यालयात शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या हिमानी बुंदेला यांनी त्यांचं बालपण, दृष्टी गमावल्याची दुर्घटना, जीवनातील संघर्ष यापासून ते केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकण्याबाबतपर्यंत अनेक अनुभव सांगितले. काय आहे त्यांची कहाणी?
वाचा त्यांच्याच शब्दांमध्ये...
'KBC साठी 2009 पासून प्रयत्न'
मला बालपणापासून टीव्ही पाहण्याची आवड होती. मी रिअॅलिटी शो आणि त्यात लोकांना सादरीकरण करताना पाहायचे. त्यावेळी मीही कधीतरी टीव्हीवर झळकू शकते का? असा विचार माझ्या मनात यायचा.
त्यानंतर मी केबीसी पाहिलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, या शोमध्ये आपण जनरल नॉलेजच्या जोरावरही प्रवेश करू शकतो. त्याचवेळी मी ठरवलं की, मला एक दिवस हॉट सीटवर बसायचं आहे आणि अमिताभ सरांना भेटायचं आहे.
आता तर मी केवळ हॉट सीटपर्यंतच पोहोचले नसून एक कोटी रुपयेही जिंकले आहेत, हे संपूर्ण जगानं पाहिलं आहे. हा अनुभव मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. पण हे काही एका झटक्यात मिळालेलं यश नाही.
मी 2009 पासूनच 'कौन बनेगा करोडपती' मध्ये रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न सुरू केले होते. पण प्रत्येकवेळी मला अपयश यायचं. रजिस्ट्रेशन होत नव्हतं.
दरम्यानच्या काळात माझं पूर्ण जीवनच बदलून गेलं. माझी दृष्टी गेली. पण दहा वर्षांनी 2019 मध्ये रजिस्ट्रेशन यशस्वी झालं. मात्र हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नाही. 2019 पासून 2021 सलग तीनवेळा रजिस्ट्रेशनमध्ये अपयश आलं. अखेर संधी मिळाली ती, 2021 मध्येच.
'कौन बनेगा करोडपती' मध्ये सहभागी होण्यासाठी मला मुंबईला जायला मिळणार असल्याचं मला सोनी टीव्हीच्या वतीनं सांगण्यात आलं. पण तेव्हा मला यावर विश्वासच बसला नाही.
कुणीतरी आपली फसवणूक करत आहे असंच सुरुवातीला वाटलं. पण नंतर त्या टीमशी अनेकदा बोलणं झालं आणि मला कोणत्याही प्रकारचे बँक डिटेल्स किंवा वैयक्तिक माहिती विचारली नाही, तेव्हा अखेर माझा विश्वास बसला.
केबीसीच्या सेटमधून बाहेर निघाल्यानंतरही मला, मी खरंच अमिताभ सरांबरोबर बसलेली होते का? असं वाटत होतं. त्यांनी त्यांच्या हातानं मला पाणी दिलं. माझ्यासाठी हे सर्वकाही स्वप्नवत होतं. मला जीवनात सर्वकाही मिळालं आहे. आता हे सर्व असंच थांबून जावं, असं मला वाटत होतं.
दिसत नसल्यामुळं भीती
फास्टेस्ट फिंगर फर्स्टपूर्वी रात्रभर माझ्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होता. कारण माझी स्पर्धा अशा लोकांबरोबर होती, ज्यांना पाहता येत होतं, ऐकू येत होतं आणि सर्व काही नॉर्मल होतं. कारण त्या सर्वांकडे शिकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते.
एका क्षणाला तर मला असं वाटलं की, कदाचित माझ्यात असलेल्या कमतरतेमुळं मला हॉटसीटवर बसण्याची संधीच मिळणार नाही. पण मला आत्मविश्वास होता आणि त्याहीपेक्षा अधिक केबीसीच्या टीमनं मला सहकार्य केलं.
त्यामुळं माझ्या मनातली भीती संपली. त्याचं कारण म्हणजे मी घरातून निघाले तेव्हाच ठरवलं होतं की, एकतर मी काहीतरी जिंकून येईल किंवा शिकून तरी येईल.
एक कोटीचा प्रश्न माझ्यासमोर आला तेव्हा मी प्रचंड घाबरलेली होते. कारण सामान्य कुटुंबासाठी एक कोटीची रक्कम खूप मोठी असते. त्यावेळी मला असं वाटलं की, जर मी चुकीचं उत्तर दिलं तर मी थेट 3,20,000 वर पोहोचेन आणि सगळी मेहनत वाया जाईळ. या विचारानं मी आणखीच नर्व्हस झाले. पण माझं उत्तर बरोबर ठरलं.
एका अपघातानं बदललं जीवन
माझ्या जीवनात खूप चढ-उतार आले. लहानपणापासून मला डोळ्यांचा त्रास होता. त्यामुळे मला जरा कमी दिसत होतं. पण 2006 मध्ये एम्समध्ये ऑपरेशन झाल्यापासून माझ्या दृष्टीत बरीच सुधारणा झाली होती. मला बरंच स्पष्ट दिसायला लागलं होतं.
मी सामान्य मुलांप्रमाणे सर्व काम करू शकत होते. बहिणीला बसवून स्कुटीही चालवता येत होती. दृष्टी कमी असल्यामुळंच मी डॉक्टर बनण्याचं ध्येय ठेवलं होतं.
पण एका दुर्घटनेनं सर्वकाही बदलून गेलं. जुलै 2011 मध्ये एक दिवस मी क्लाससाठी जात होते. माझी सायकल वेगात होती. त्याचवेळी एका बाजूनं एक बाईकस्वारही वेगानं निघाला आणि अचानक पुढं जाऊन तो वळला.
माझी सायकलही वेगात होती, त्यामुळे त्याला धडकली आणि मी त्याच्या बाईकबरोबर फरफटत खूप लांबपर्यंत गेले. मी खूप जखमी झाले होते, पण या अपघाताचा खरा परिणाम एका आठवड्यानंतर दिसला.
एका आठवड्यानंतर माझी दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली. मला वाटलं की वडिलांबरोबर जाऊन चष्म्याच्या नंबर तापासून पाहावा. माझ्या डोळ्यांवर अपघाताचा परिणाम झाला असेल असं मला वाटलं नाही. पण डॉक्टरांनी सांगितलं की, अपघातामुळं रेटिना जागेवरून सरकला आहे.
चौथं ऑपरेशन अपयशी ठरलं
माझ्या डोळ्यांची तीन ऑपरेशन्स झाली. हळूहळू मला थोडं दिसायला लागलं होतं. पण दृष्टी अधिक स्पष्ट व्हावी यासाठी चौथं ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण चौथ्यावेळी माझं ऑपरेशन अपयशी ठरलं.
मी बारावीमध्ये होते. माझ्यासमोर पूर्ण करिअर होतं, माझं भविष्य होतं. डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं.
ऑपरेशननंतर मी डोळे उघडले तर समोर केवळ अंधकार होता. मला काही कळत नव्हतं. माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. हे काय घडलं? आता काय होणार? हे सर्व माझ्याबरोबरच का घडलं ? असे प्रश्न पडत होते. संपूर्ण जीवनच जणू संपलं असावं असं वाटत होतं.
डॉक्टरांशी बोललो तर ते म्हणाले की, सध्या अशक्तपणा आहे. त्यामुळं कदाचित काही काळानं दृष्टी परत येईल. पण 2012 पासून आज 2021 आलं आहे. पण माझी दृष्टी अद्याप परत आलेली नाही.
कुटुंबानं सहकार्य केलं
आम्ही एका सर्वसाधारण कुटुंबातले होतो. वडिलांची खासगी नोकरी होती आणि आम्ही पाच भाऊ बहीण होतो. सर्वांनी काटकसर करून अडचणींचा सामना करून माझ्या ऑपरेशनसाठी पैसे गोळा केले होते. एका ऑपरेशनचा खर्च 40 ते 50 हजार रुपये होता आणि ते जमवण्यासाठी वडिलांना खूप प्रयत्न करावे लागायचे.
दृष्टी गमावल्यानंतर जवळपास सहा महिने माझ्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. मी देवाला नेहमी विचारायचे की, हे सर्व माझ्याबरोबरच का घडलं. पण माझे कुटुंबीय आणि मित्र मंडळींनी मला या काळात अत्यंत सकारात्मक आधार दिला. त्यामुळे मी हे सर्वकाही विसरू शकले आणि त्या धक्क्यातून बाहेर पडले.
मी एक गोष्ट नक्की सांगेन की, माझ्या आई वडिलांनी आम्हाला सर्व भावंडांना चांगल्या पद्धतीनं शिकवलं. मुलींना इंग्रजी माध्यमात शिकवण्याची काय गरज? असं लोक म्हणायचे. पण आमच्या वडिलांनी कधीही भेदभाव केला नाही. मला वाटतं की माझ्या शिक्षणामुळंच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले.
मी आग्र्याच्या बीडी जैन कॉलेजमधून बीए पूर्ण केलं. त्यानंतर लखनऊमध्ये विकलांगांसाठी तयार करण्यात आलेलं आशियातील सर्वांत मोठं विद्यापीठ डॉक्टर शकुंतला मिश्रा रीहॅबिलिटेशन युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा इन एज्युकेशन केलं. त्यानंतर 2017 मध्ये मला केंद्रीय विद्यालयात शिक्षकेच्या रुपात नोकरी मिळाली.
'शिक्षक बनल्याचा आनंद'
मला आता कधीही असं वाटत नाही की, मी डॉक्टर का बनले नाही. मी सर्वांत उत्तम क्षेत्र निवडलं आहे हे मला, शिक्षक बनल्यानंतर जाणवलं. मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी संलग्न होऊन त्यांचं भवितव्य घडवू शकते, हे माझ्या लक्षात आलं.
अपघातानंतर माझं जीवन पूर्णपणे बदललं होतं हेही खरं आहे. पण जर मी अपघातापूर्वी आणि अपघातानंतरच्या जीवनाचा विचार केला, तर अपघातानंतर मी जीवनाचा अधिक आनंद घेतला, असं म्हणता येईल. मी संगीत आणि गाणंही शिकले आणि अभ्यासही सुरू ठेवला. शिवाय 21 व्या वर्षी मी सरकारी नोकरी मिळवणारी कुटुंबातली पहिली व्यक्ती बनले.
मुलं तुम्हाला त्रास तर देत नाही, असं शिक्षिका म्हणून लोक मला विचारतात. पण मला हे माहितीच नव्हतं की, मुलं एवढी समजदार असू शकतात. आपण नेहमी असा विचार करतो की मुलं खोडकर असतात. पण एवढी वर्षं शिकवल्यानंतरही वर्गात कोणत्याही मुलानं मला दिसत नसल्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट शाळेच्या गेटपासून क्लास रूमपर्यंत नेण्यासाठी मुलं माझ्याकडं धावत येतात आणि हिमानी मॅडमना आपणच वर्गापर्यंत नेणार यासाठी ती आपसांत भांडतात.
विकलांगांसाठी संस्था सुरू करण्याचा विचार
मी 13-14 वर्षांची होते, तेव्हापासूनच दोन्ही मोठ्या बहिणींसह मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळं मुलांबरोबर कसं वागायला हवं आणि त्यांना कसं शिकायला आवडतं हे सर्व मी शिकले होते.
मुलांना शिकवताना मी त्यांना कधीही गणित शिकवणार असं म्हणत नाही, तर मी त्यांनी नेहमी मॅजिक मॅथ नावाने शिकवते. तुम्हाला मी जादू करायला शिकवणार आहे, असं मी मुलांना सांगते.
माझ्या या प्रवासात माझ्या मोठ्या बहिणी चेतना आणि भावना, लहान बहीण पुजासह सर्वात लहान भाऊ रोहितचं मोठं योगदान राहिलं आहे. या सर्वांनी पावलोपावली मला साथ दिली.
मला दृष्टी नसल्याचा खेद नसून उलट आनंद आहे, असं मी आज म्हणू शकते. त्याचं कारण म्हणजे आज माझ्यामुळं माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे आणि ते माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे, मी जो पैसा जिंकला आहे, त्याचा एक भाग मी विकलांगांच्या शिक्षणावर खर्च करणार आहे. आगऱ्यामध्ये एक संस्था सुरू करण्याचा माझा विचार आहे. त्याठिकाणी सर्व प्रकारची विकलांग मुलं स्वतःच्या बळावर शिक्षण घेऊन काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना ती संधी तिथं मिळेल.
(हिमानी बुंदेला यांनी यशपाल सिंह यांना दिलेल्या माहितीनुसार)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)