You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संसद अधिवेशन: राज्यसभेतील धक्काबुक्कीवर विरोधक-सत्ताधारी आमनेसामने
संसदेचं अधिवेशन संपलं असलं तरी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधील संघर्ष संपताना दिसत नाहीये. संसदेचं पूर्ण अधिवेशन घोषणाबाजी, गदारोळात वाहून गेलं असलं तरी आता हा प्रश्न संसदेच्या बाहेरही धगधगत राहाणार असं दिसत आहे.
राज्यसभेतील मध्यवर्ती टेबलवर चढणे, नियमपुस्तिका भिरकावणं, सभापतींच्या दिशेने, सचिवांच्या दिशेने कागद भिरकावल्याचे व्हीडिओ आता प्रसिद्ध झाले आहेत.
या व्हीडिओमध्ये काँग्रेसच्या खासदार छाया वर्मा यांनी कथितरीत्या महिला मार्शलला धक्काबुक्की केल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र छाया वर्मा यांनी माफी मागण्यास नकार दिला असून या घटनेला सरकार जबाबदार आहे. लोकांचा आवाज सभागृहात ऐकून घेतला नाही तर असे प्रसंग घडत राहाणार असं सांगितलं आहे.
विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सभागृहातील कामकाजाचे आणि सीसीटीव्हीचे चित्रिकरण प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
राज्यसभेत बुधवार 11 ऑगस्ट रोजी खासदारांना मारहाण झाली असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी केला आहे.
ते म्हणाले, "राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण झाली आहे. बाहेरच्या लोकांना बोलावून त्यांना निळा गणवेश देऊन खासदारांना मारहाण करण्यात आली."
"राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष संसदेचे काम पाहून व्यथित झाले आहेत अशं सांगतात पण सभागृहाचं कामकाज चालवणं हे त्यांचं काम आहे, ते आपलं काम का करु शकत नाहीयेत?"
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत आपण भारत पाकिस्तान सीमेवरच उभे आहोत असं वाटत असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, काल आम्ही लोकशाहीची हत्या होताना पाहिली, "राज्यसभेत ज्या प्रकारे खासगी लोकांनी मार्शलचा ड्रेस वापरुन आमच्या खासदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे मार्शल नव्हते, संसदेत मार्शल लॉ लावला गेला होता."
विरोधकांच्या आरोपांनंतर सत्ताधारी आक्रमक
राज्यसभेत झालेल्या धक्काबुक्कीला मार्शल जबाबदार आहेत, आमच्या खासदारांना मारहाण झाली असं म्हणणाऱ्या विरोधकांना सरकारने प्रथमच उत्तर देण्याचे ठरवले.
राज्यसभेचे नेते पीयूष गोयल, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भूपेंद्र यादव यांनी विरोधकांवर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले.
राज्यसभेचे नेते पीयूष गोयल म्हणाले, विरोधकांनी या अधिवेशनाचं कामकाज होऊच देणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. मात्र त्यांना हव्या त्या वेळेस त्यांनी चर्चा होऊ दिली आणि एरव्ही गदारोळ घातला.
आपल्या 55 वर्षांच्या राजकीय आयुष्यात असं चित्र पाहिलं नव्हतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना गोयल म्हणाले, "मग 55 वर्षांच्या कालावधीत विरोधकांनी अशाप्रकारे हुल्लडबाजी केलेली त्यांनी पाहिली आहे का? त्यांनी आपल्या सहकारी पक्षाच्या खासदारांना थांबवलं का नाही? मार्शलना धक्काबुक्की करणाऱ्यांना त्यांनी थांबवलं का नाही असा प्रश्न त्यांनी विचारला."
पीयूष गोयल म्हणाले, "हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आपल्याला या गोंधळात स्वारस्य नसल्याचं सांगितलं. लोकसभेचं कामकाज कालच (10 ऑगस्ट) विसर्जित केलं आहे, तसंच हे संपवून टाका, आम्हाला मुंबईला जायचंय असं ते सांगत होते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)