You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील : 'यापुढे आम्हाला बोलावलं नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 'यापुढे आम्हाला बोलावलं नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही' - चंद्रकांत पाटील
पुण्यात नुकतीच मेट्रोची ट्रायल पार पाडली. या कार्यक्रमाला आम्हाला बोलावलं नाही असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही पुण्यात नसताना कार्यक्रम पार पडला असंही ते म्हणाले. शिवाय, बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव का नाही? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
ते म्हणाले, "पुणे मेट्रोला 2016 मध्ये परवानगी मिळाली. त्यावेळी अजित पवार नव्हते. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे यापुढे आम्हाला कार्यक्रमाला बोलावलं नाही तर आम्ही कार्यक्रम होऊ देणार नाही." असा इशारा त्यांनी दिला.
मेट्रोचे काम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर त्यावेळी होणाऱ्या कार्यक्रमांना नरेंद्र मोदी यांना बोलवावे लागेल असंही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी राज ठाकरेंची परप्रांतियांबाबतची क्लिप मिळाली आहे अशी कबुली दिली. ते भाषण मी ऐकले असून याबाबत काही शंका आहेत आणि यासंदर्भात आपण राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
चर्चेतून प्रश्न सुटतात असं सूचक विधान पाटील यांनी केलं. दरम्यान, मनसे आणि भाजपमध्ये युतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
2. राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात 'या' विषयांवर चर्चा
राज्यात गेल्या काही काळापासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू असताना सोमवारी (2 ऑगस्ट) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणाविषयी चर्चा झाली. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे आहे. यात ते म्हणतात, "राहुल गांधी यांच्याशी भेट झाली. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणावर आमची सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रातील कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं. शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धतीविषयी त्यांनी जाणून घेतलं."
संजय राऊत यांनी साधारण महिन्याभरापूर्वी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांचं नेतृत्त्व शरद पवार यांनी करावं अशी विविध राजकीय पक्षांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आपण गांधी कुटुंबाविरोधात काहीही म्हटलं नाही असं स्पष्टीकरण त्यावेळी संजय राऊत यांनी दिलं होतं.
या घटनेनंतर राज्यात सातत्याने काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये कुरबुर पहायला मिळते. यापार्श्वभूमीवर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
3. राज्यात जातीनिहाय जनगणना होणार
राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगानं केला आहे. राज्य सरकारने नुकतीच राज्य मगासवर्ग आयोगाची स्थापना केली. आयोगाची दुसरी बैठक सोमवारी (2 ऑगस्ट) पुण्यात पार पडली. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
मराठा आरक्षणापाठोपाठ राज्यातील ओबीसींचे आरक्षण सुद्धा रद्द झाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर आता मोठी आव्हानं आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना का करण्यात आली नाही अशी टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात होती.
इतर मागासवर्गीयांचा इम्पिरिकल डेटा नसल्याने जातीनिहाय जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोगाने केला आहे. हा अहवाल राज्य सरकारसमोर सादर केला जाईल.
यापूर्वी पार पडलेल्या आयोगाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण आणि इम्पिरिकल डेटा यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. राज्यातील 102 विविध प्रकारच्या समाजघटकांनी आपला समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करावा अशी मागणी आयोगाकडे केली आहे.
4. '1% व्याजदराने पंतप्रधान योजनेअंतर्गत कर्ज मिळणार' हे खरं आहे का?
फक्त 1 टक्के व्याजदराने कर्ज मिळत असल्याचे मेसेज गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं समोर आलं आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सुद्धा आहे. व्हॉट्सअपवर सुद्धा अशा प्रकारचा संदेश मोठ्यासंख्येने शेअर होत असल्याचं दिसून आलं आहे. एवढ्या स्वस्तात कर्ज मिळत असल्याने यासंदर्भात लोकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.
या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान योजनेअंतर्गत आधारकार्डवर 1 टक्के व्याजाने कर्ज मिळत आहे. 50 टक्के सूट असंही नमूद करण्यात आलं आहे. सरकारी एजन्सी पीआयबी फॅक्ट चेकने यासंदर्भात इशारा दिला आहे. लोकतमने हे वृत्त दिलं आहे.
हा संदेश बनावटी असल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. अशी कोणतीही योजना नसल्याचं पीआयबीने म्हटलं आहे. आधारकार्डद्वारे कर्ज मिळणार ही योजना बोगस असल्याचं पीआयबीच्या फॅक्टचेकमध्ये उघड झालं आहे. लोकांनी अशा बनावटी संदेशांपासून सावध रहावं असं आवाहन करण्यात येत आहे.
5. बाबुल सुप्रियो यांनी 'या' कारणामुळे बदलला आपला निर्णय
माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय फेसबुक पोस्ट लिहित जाहीर केला होता. पण आपण आपल्या खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचं आता बाबुल सुप्रियो यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
"राजकारणात न राहता देखील समाजकार्य करत राहणार आहे. कुठल्याही पक्षात जाणार नाही," असं सुप्रियो यांनी म्हटलं होतं. पण भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीनंतर बाबुल सुप्रियो यांनी आपल्या निर्णयात मोठा बदल केला. भाजपकडून त्यांचे मन वळण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे.
जेपी नड्डा यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर बाबुल सुप्रियो म्हणाले, "खासदारकी घटनात्मक आहे. 2024 पर्यंतचा खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करेन. राजकारणापासून दूर राहूनही कर्तव्य पूर्ण करता येऊ शकतं."
दरम्यान, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा सीपीएम यातल्या कोणत्याही पक्षानं बोलावलं नसल्याचंही सुप्रियोंनी स्पष्ट केलं. "निवडणुकीअगोदरच पक्षाबरोबर माझे काही मतभेद होते, त्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सर्वांसमोर उघड झाल्या होत्या. पराभवाची जबाबदारी घेत आहे, परंतु दुसरे नेते देखील जबाबदार आहेत," असं बाबुल सुप्रियो यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)