You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिल्पा शेट्टीनं राज कुंद्रा प्रकरणी सोडलं मौन, आपली भूमिका मांडताना काय म्हटलं?
अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं पती राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडत, मीडिया ट्रायल न करण्याची विनंती केलीय. खासगीपणाचा आदर करण्याचं आवाहन शिल्पा शेट्टीनं केलंय.
उद्योगपती राज कुंद्रा यांना 20 जुलै 2021 रोजी अटक झाली. पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली कुंद्रांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर शिल्पा शेट्टीनं पहिल्यांदाच तिची सविस्तर भूमिका मांडली.
माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर करा, अशी विनवणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केलीय.
शिल्पा शेट्टीनं तिच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
"गेले काही दिवस सर्व स्तरांवर अत्यंत आव्हानात्मक गेले आहेत. अनेक अफवा आणि आरोप सुरू आहेत. माध्यमं आणि हितचिंतकांकडूनही अवास्तव निंदा केली गेली. अनेकांनी ट्रोलिंग केली, प्रश्न उपस्थित केले. आणि हे सर्व केवळ माझीच नव्हे, तर माझ्या कुटुंबाचीही.
माझी भूमिका मी अजून मांडली नाही. मी यावर काहीच बोलली नाही. कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कृपया माझ्या हवाल्यानं कुठलीही असत्य गोष्ट पसरवणं थांबवा.
सेलिब्रिटी म्हणून मी मानते असलेलं एक तत्वज्ञान पुन्हा सांगते, 'कधी तक्रारही करु नका, कधी स्पष्टीकरणही देऊ नका.'
मला एवढंच सांगायचंय की, तपास सुरू आहे. मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे.
कुटुंब म्हणून आमच्यासमोर उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर मार्गांचा आम्ही अवलंब करू. पण तोपर्यंत एक आई म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे की, माझ्या मुलांसाठी आमच्या खासगीपणाचा आदर करा. कुठलीही शहानिशा न केलेल्या अर्धवट माहितीवर विश्वास ठेवणं टाळा.
कायद्याचा अभिमान बाळगणारी मी स्वाभिमानी भारतीय आहे आणि गेल्या 29 वर्षांपासून मेहनत करणारी महिला आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणी तो विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या खासगीपणाच्या अधिकाराचा आदर करा.
आमची मीडिया ट्रायल करू नका. कायद्याला त्याचं काम करू द्यावं.
सत्यमेव जयते..."
नेमकं प्रकरण काय आहे?
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्राला 20 जुलै 2021 रोजी अटक करण्यात आली होती. पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली कुंद्रांना अटक करण्यात आली आहे.
राज कुंद्रासोबतच रायन थार्प या व्यक्तीलाही अटक करण्यात आली.
23 जुलै रोजी राज कुंद्रा रायन थार्प यांना न्यायालयात हजर केल्यानंतर, न्यायालयानं दोघांनाही 14 दिवसांची (10 ऑगस्ट 2021 पर्यंत) न्यायालयीन कोठडी सुनावली.
मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)