You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू न झाल्याचं केंद्र सरकारचं वक्तव्य, वातावरण तापलं
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशातील कोणत्याच राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही, असं केंद्र सरकारने मंगळवारी (20 जुलै) संसदेच्या अधिवेशनात म्हटलं.
या वक्तव्याचा विरोध झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील अहवाल सादर केले आहेत.
ऑक्सिजन टंचाईमुळे कोव्हिड-19 च्या रुग्णांचा मोठ्या संख्येने रस्त्यांवर आणि रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला आहे का, असा प्रश्न आरोग्य मंत्री मांडवीय यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आले.
केंद्राने उत्तर देताना म्हटलं की "राज्य आणि केंद्र शासित प्रदेश कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देत असतात. पण कोणत्याही राज्याने अथवा केंद्रशासित प्रदेशाने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंची माहिती केंद्राला दिली नाही."
कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेदरम्यान वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी बरीच वाढली होती, असं केंद्राने म्हटलं.
पहिल्या लाटेत 3,095 मॅट्रीक टन ऑक्सिजनची मागणी होती. तर दुसऱ्या लाटेदरम्यान ही मागणी 9 हजार मॅट्रीक टनांपर्यंत पोहोचल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.
विरोधी पक्षांकडून निशाणा
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी वरील उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधण्यात येत आहे.
मांडविया यांच्या वक्तव्यात संवेदनशीलतेची कमतरता आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
त्यांनी लिहिलं, "फक्त ऑक्सिजनची कमतरता नव्हती. तर संवेदनशीलता आणि सत्य यांचीही कमतरता त्यावेळी होती. आजही ती आहे."
या मुद्द्यावरून आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं काँग्रेस खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, "ऑक्सिजनच्या कमरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही, असं सरकार म्हणत आहे. चुकीची माहिती देऊन त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे. आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहोत."
इतर क्षेत्रांतील मान्यवरांकडूनही टीका
उद्योजक तहसीन पुनावाला यांनीही याप्रकरणी सरकारवर टीका केली.
रात्री-अपरात्री आम्ही विनाकारण उठत होतो. डॉक्टर आणि रुग्णालयं आम्हाला विनाकारणच कॉल करत होते. लोक ऑक्सिजनच्या रांगेत विनाकारण उभे होते, असं पुनावाला म्हणाले.
लेखिका सबा नक्वी म्हणाल्या, "आम्ही ऑक्सिजनसाठी भीक मागत होतो. त्यात सरकारने ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालं नाही, असं म्हटल्यानंतर दुःख होतं."
ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही. म्हणजेच दुसरी लाटही नव्हती. मग कोव्हिड साथ आहे की नाही?
पत्रकार शीला भट्ट यांनी किडवाई यांच्या ट्विटला रिप्लाय करत एक वेगळी भूमिका मांडल्याचं दिसून आलं.
ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू न झाल्याच्या सरकारच्या दाव्याबाबत आम्हाला स्पष्टीकरण हवं आहे. त्यांनी हे नेमकं कसं म्हटलं, कोणत्याच राज्य सरकारने ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या कॅटेगरीत त्याची नोंद केल्यामुळे त्यांनी असं म्हटलं का. मांडविया यांनी राज्याकडून आलेल्या माहितीच्या आधारे हे वक्तव्य केलं का याबाबत स्पष्टीकरण हवं, असं शीला भट्ट म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)