पृथ्वीराज चव्हाण: मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती जणांचे मृत्यू झाले, हे समजायला हवं- #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ANI
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती जणांचे मृत्यू झाले हेही समजायला हवं- पृथ्वीराज चव्हाण
लसीकरणाबाबत बोलायचं झालं तर, चार दिवस लसीकरण थांबवायचं आणि पाचव्या दिवशी रेकॉर्ड झाला म्हणून पाठ थोपटवून घ्यायची. यामुळे किती लोकांचे जीव चाललेत.
"मोदींच्या व त्यांच्या टीमच्या अकार्यक्षम कारभारामुळे किती जणांचे नाहक बळी गेलेत निश्चित आकडा आपल्याला कधीच कळणार नाही असं मला वाटतं. आज चार लाखांपेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
"यापैकी मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती जणांचा मृत्यू झाला? हे समजायला हवं," असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान सुद्धा केलं पाहिजे, एवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत. शेवटी असं आहे की लोकाभिमुख प्रशासन देणं हे शक्य आहे. ते लोकांना केंद्रभागी ठेवून करता येतं," असंही चव्हाण म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
2. मुंबई महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं....
मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळे. मुंबईत पावसाने काही झालं की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
मुंबईतील जागेची अडचण आणि त्या तुलनेत प्रचंड लोकसंख्या यामुळे निवासाचा प्रश्न बिकट आहे. निसरड्या डोंगरउतारावर असलेल्या झोपडपट्यांमध्ये हजारो कुटुंब पिढ्यानपिढ्या राहत आहेत.
दर पावसाळ्यात या वस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबईला भौगोलिक मर्यादा आहेत.
अमर्याद मानवी लोंढे यामुळे जमेल तिथे राहा हे समीकरण दृढ झालं आहे. डोंगर उतारावरील शेकडो वसाहती आणि जुन्या धोकादायक इमारतींमध्ये नोटिसा मिळूनही जीव मुठीत घेऊन राहणे हे या गणिताचे सामान्य जनतेचे अपरिहार्य उत्तर आहे.
कमी वेळात प्रचंड पाऊस असं होतं आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जाते. मात्र कधीकधी अनैसर्गिक पावसाचा फटका बसतो.
मुंबईत मध्यरात्री दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळे. काहीही झालं की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं.
3. नवज्योतसिंग सिद्धू पंजाब काँग्रेस अध्यक्ष
पंजाब काँग्रेसमधील वादावर तोडगा निघाला असून माजी क्रिकेटपटू, समालोचक नवज्योतसिंग सिद्धू पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष असणार आहेत.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्रक काढून यासंदर्भात घोषणा केली. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter@sherryontopp
पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी सिद्धू यांच्या निवडीला मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी विरोध केला होता.
अमरिंदर यांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा निर्णय सर्वांना मान्य राहील असं अमरिंदर यांनी म्हटलं आहे.
पंजाबच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदी निवडीनंतर आमदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
4. नंदुरबारमध्ये कार दरीत कोसळून आठजणांचा मृत्यू
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या डोंगररांगांमध्ये भीषण अपघातात आठजणांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत्यूमुखी आणि जखमी हे मध्यप्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातल्या शमलेट गावातील आहेत.
हे सर्व शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन वसाहतीत भजनाच्या कार्यक्रमासाठी येत असताना गाडी दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
तोरणमाळ खडकी या दरम्यानच्या सिंदिदिगर घाटामधून शहादा तालुक्यातील चिखली येथे येत असताना क्रुझर गाडीला अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या दरीत जाऊन ही गाडी कोसळली.
गाडीमध्ये 15 पेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 100 फुटांपेक्षा अधिक खोल दरीत ही गाडी जाऊन पडली.
हा अपघात इतका भीषण होता की 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य प्रवासी हे जखमी झाले आहेत. जखमींना तोरणमाळ आणि म्हसावद येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी 5 च्या सुमारास घडला.
या भागात नेटवर्क नसल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. अपघात झाल्यानंतर तात्काळ मदतकार्य पोहोचवण्यास समस्यांचा सामना करावा लागला. प्रशासनाला या अपघाताबाबत नेमकी माहिती मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागले.
5. वाढदिवसाला पदार्पण, पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात- इशान किशानची चमकदार कामगिरी
भारताच्या पर्यायी संघाने श्रीलंकेवर पहिल्या वनडेत सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात इशान किशनने केलेले विक्रम अनोख्या स्वरुपाचे आहेत. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Surjeet Yadav
इशान किशनने त्याच्या वाढदिवशी वनडे पदार्पण केलं. पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने कारकीर्दीची सुरुवात केली. पदार्पणात अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रमही इशानने नावावर केला.
इशानने ट्वेन्टी-20 पदार्पणातही अर्धशतकी खेळी साकारली होती. असं करणारा तो केवळ दुसरा फलंदाज आहे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 धावांची मजल मारली. भारतातर्फे दीपक चहर, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार शिखर धवनच्या संयमी 86 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला. शिखरने वनडेत 6,000 धावांचा टप्पाही ओलांडला.
पृथ्वी शॉने 24 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी केली. इशान किशनने 59 धावांची खेळी केली. मनीष पांडेने 26 तर पदार्पणवीर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा केल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























