पश्चिम बंगाल: मोदींकडून ममतांकडे परतण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंडण करून घेतलं प्रायश्चित #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा....

1. भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्यासाठी प्रायश्चित, कार्यकर्त्यांचं मुंडण

पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात 'घरवापसी' सुरू आहे.

'भाजपमध्ये जाणं ही आपली चूक होती,' असं म्हणत अनेक कार्यकर्ते प्रायश्चित करतानाही दिसत आहेत.

पश्चिम बंगालमधील हुगळी येथे नुकतेच 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण परतताना प्रायश्चित म्हणून अनेकांनी जाहीररित्या डोक्याचं मुंडण करून घेतलं आहे, असं वृत्त एबीपी लाईव्हने दिलं आहे.

इतकंच नव्हे तर या कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये सहभागी होण्यासाठी मुंडण केल्यानंतर डोक्यावर गंगा जल शिंपडून स्वतःला 'शुद्ध' करून घेतलं आहे.

हुगळीच्या आरामबाग मतदारसंघाचे खासदार अपरुपा पोद्दार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचा तृणमूल प्रवेश घडवून आणला.

2. कोरोनाविषयी उत्तर प्रदेशसंदर्भात भीतीचं वातावरण पसरवण्यात आलं - योगी आदित्यनाथ

गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील कोरोना स्थितीबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. राज्य सरकारच्या कारभारावर अनेक आरोप केले जात आहेत. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

"उत्तर प्रदेशमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणून कोरोना वाढला, असा आरोप केला जातो. मग निवडणूक आयोगालाच फाशी द्या, हत्येचा गुन्हा दाखल करा, असं कुणीतरी म्हटलं.

"मग रुग्ण वाढण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या का? दिल्लीत निवडणुका होत्या का? महाराष्ट्र किंवा दिल्लीमध्ये कुंभमेळा होता का," असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.

"उत्तर प्रदेशच्या संदर्भात फक्त भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं. कोरोनामुळे हे सगळे मृत्यू होत आहेत, असं भासवल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली", असा दावा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

3. संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील घडामोडीनंतर शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ट्विट केले. त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत भाष्य केले आहे.

आज मी शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेसंदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील.

ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत, असे शरद पवार म्हणाले, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसल्याचे या ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

4. मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही अत्याचारी - नाना पटोले

केंद्रातील मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जळगावातील फैजापूरमधील पहिल्या ग्रामीण अधिवेशनात बोलत होते.

ते म्हणाले, "शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी तीन काळे कृषी कायदे आणले आहेत. केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार घालवल्याशिवाय या देशातील शेतकरी कष्टकरी यांचे 'अच्छे दिन' येणार नाहीत."

केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ देता येत नाही. तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर 7 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे.

तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. शेतकरी थंडी, पाऊस, उन्हात आंदोलन करत असताना पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचारात व्यस्त होते, असा आरोप पटोले यांनी केला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

5. 'पुढील आठ दिवस राज्यात पाऊस नाही, पेरणी काळजीपूर्वक करा'

राज्यात मान्सून वेळेवर आणि दणक्यात सुरू झाला. पण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस गायब झाला असून आठवडाभर पावसाची चिन्हे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणी शक्यतो करू नये, याबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी सूचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

सध्या राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडत असला तरी तो पेरणीसाठी उपयोगी नाही. येत्या आठ दिवसात पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणी करु नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

येत्या आठ दिवसात पाऊस कमी पडणार आहे. 80 मिमी ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असं कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले. ही बातमी झी 24 तासने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)