You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशेरीगड : महाराष्ट्रातले गड-किल्ले आता कोरानाचा नवा हॉटस्पॉट ठरतील का?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मध्यंतरी एक इंग्लिश व्यंगचित्र पाहिलं होतं. त्यात देव म्हणतो, "मी यांना अशी आपत्ती दिली ज्यात त्यांना काहीच करायचं नव्हतं, फक्त घरात बसायचं होतं. गाढवांना तेही जमलं नाही."
हे आठवायचं कारण म्हणजे मुंबई लगतच्या पालघर जिल्ह्यात असलेल्या आशेरीगडागडावर गेल्या वीकेंडला झालेल्या महाप्रचंड गर्दीचे सोशल मीडियावर फिरत असलेले व्हीडिओ.
लॉकडाऊन संपल्याचा फायदा घेत हजारो पर्यटकांनी तिथे धाव घेतली. एकावेळेस तिथे पाच हजार लोक असावेत असा अंदाज होता.
तिथल्या स्थानिक गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आम्ही आमच्या आयुष्यात अशी गर्दी पाहिली नाही.
हे व्हीडिओ तुम्ही नीट पाहिलेत तर लक्षात येईल की यातल्या बहुसंख्य लोकांनी ना मास्क घातलेत ना सुरक्षेची काही काळजी घेतलीये. सोशल डिस्टन्सिंगचा तर प्रश्नच नाही.
आता तुम्ही म्हणाल इतके दिवस घरात डांबून राहिलेल्या लोकांनी निसर्गात जाऊन जरा आनंद घेतला तर काय चुकलं?
तर काही तथ्यांचा आढावा घेऊ. पहिलं म्हणजे कोरोना व्हायरसची साथ अजून संपलेली नाही.
भारतात कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका बसला महाराष्ट्राला. दोन्ही वेळा राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले. आता कोव्हिडनंतर हळूहळू अनलॉक होत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तयारी सुरू केली गेलीये.
16 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सची बैठक घेतली. तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी महाराष्ट्रानं काय केलं पाहिजे याचा एक आराखडा या बैठकीत आखण्यात आला. पण याच बैठकीत डॉक्टरांनी महिन्या-दोन महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही राज्यांना पत्र लिहून सावधगिरीचा इशारा दिलाय.
म्हणजेच तिसरी लाट दोन ते चार आठवड्यात धडकू शकते अशी तज्ज्ञांना भीती वाटते.
दुसऱ्या लाटेचे महाभयानक परिणाम आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले. ऑक्सिजन, बेडवाचून तडफडणारे पेशंट पाहिले, त्यांचे हतबल नातेवाईक पाहिले, औषधांचा काळाबाजार पाहिला आणि स्मशानभूमीतल्या रांगाही पाहिल्या. ही कुठली इतिहासातली गोष्ट सांगत नाहीये मी. अजून महिनाही लोटला नाहीये हे सगळं घडून.
मग असं काय झालं की लोकांना अचानक याचा विसर पडून ते गड-किल्ल्यांवर, पर्यटनस्थळांवर शेकडोंच्या संख्येने गर्दी करायला लागलेत?
"सामाजिक जाणीवेचा विसर," दुर्गप्रमी आणि अभ्यासक अमित सामंत म्हणतात.
त्यांच्यामते आशेरीगडावर होणारी गर्दी धोकादायक आहे, विशेषतः कोरोना काळात. "पोलीस प्रशासन किती पुरे पडणार? आणि किल्ल्यांवर जायला एक रस्ता नसतो, अनेक रस्ते असतात. त्यामुळे मुख्य रस्ता बंद केला तरी हौशी पर्यटक इतर रस्त्यांनी वर जातातच."
पावसाळा आला की गडकिल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी होणं नवीन नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक समस्या येतात. हौशी पर्यटक योग्य ती काळजी घेत नसल्याने अपघात होणं, गड किल्ल्यांची नासधूस होणं, तिथे कचरा पसरणं हे तर होतंच. पण यावर्षी अजून एक भीती आहे ती म्हणजे या वाढत्या गर्दीमुळे हे गड-किल्ले कोरोनाचे हॉटस्पॉट बनतील.
अमित म्हणतात की हा सगळा खेळ एका सेल्फीसाठी आहे. "लोकांच्या लक्षातही येत नाही की पावसाळी सहली काढण्याच्या नादात किंवा एक चांगला फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याच्या नादात ते स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळत आहेत. आशेरीगडावर झालेली गर्दी पाहा, सगळ्यांना स्वतःचे फोटो काढायचे होते."
स्थानिकांच्या मनात धाकधूक
एक आशेरीगडच नाही महाराष्ट्रातल्या अनेक गड-किल्ल्यांची हीच परिस्थिती आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील होताच तिथे गर्दी व्हायला लागली आहे. अशात त्या भागात राहाणारे स्थानिक लोक कात्रीत सापडले आहेत.
राधाबाई खाडे नाशिक जिल्ह्याजवळच्या पहिने गावाजवळच्या एका आदिवासी पाड्यावर राहातात. इतर वेळेस त्या शेतीत काम करतात पण पावसाळ्यात शनिवार-रविवारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांना मक्याची कणीसं आणि इतर छोटे-मोठे खाद्य पदार्थ विकण्याचं काम करतात. "या काळात जी थोडीफार कमाई होते ती बंद पडली तर कसं करायचं," त्या म्हणतात.
पर्यटनस्थळं किंवा प्रसिद्ध गड किल्ल्यांच्या आसपास राहाणाऱ्या स्थानिकांसाठी पर्यटक म्हणजे उपजीविकेचं साधन असतात. पण आता पर्यटक नसले तर कमाई नाही, गर्दी झाली तर कोरोनाचा धोका अशा व्दिधा मनस्थितीत ते अडकले आहेत.
सुनील गायकडवाड लोणावळ्यात राहातात. त्यांची संस्था गडकिल्ले किंवा दुर्गम ठिकाणी अडकलेल्या, अपघातात सापडलेल्या पर्यटकांच्या बचाव मोहिमा राबवते.
इथे सध्या पोलिसांनी गड-किल्ल्यांवर जाण्याचे रस्ते बंद केलेत. पण तरीही लोणावळ्यात पर्यटक येत आहेत याची भीती आहे असं ते म्हणतात. "इथे गर्दी असतेच. लोणावळ्यात सध्या कोरोनाचे पेशंट नाहीत पण बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना पसरणार तर नाही ना ही धास्ती आहे."
महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी काय परिस्थिती?
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच्या वीकेंडला अनेक शहरांच्या आसपास असणारे गड-किल्ले आणि पर्यटनस्थळांवर लोकांची गर्दी ओसांडून वाहात होती. पुण्याच्या सिंहगडचे व्हीडिओ व्हायरल झाले होते तर नाशिकच्याही पहिने, त्र्यंबकेश्वर, घोटी भागात गर्दी झाली होती.
या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागल्या आहेत. पुणे परिसरात गडकिल्ल्यांवर जाणारे सगळे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. नाशिकमध्येही ठिकठिकाणी चेकपोस्ट उभ्या राहिल्या असून पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत.
आशेरीगडावर झालेल्या गर्दीनंतर पोलिसांनी तिथल्या पर्यटकांवर गुन्हेही दाखल केले आहेत.
पालघरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी माध्यमांना माहिती दिली की, "चोवीस पर्यटकांवर जमावबंदीचं उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. मास्क नसल्यामुळे 241 पर्यटकांवर गुन्हे दाखल केलेत."
पर्यटकांनी कोव्हिडच्या नियमांचं पालन करावं असं त्यांनी म्हटलं होतं.
पर्यटकांचं म्हणणं काय?
मिथिला कामत नाशिकमध्ये गृहिणी आहेत. रविवारी, 20 जूनला त्या कुटुंबासह नाशिकच्या आसपास फिरायला गेल्या होत्या. एकूण 22 जण त्या ट्रीपमध्ये सहभागी झाले होते.
"घरात बसून बसून मुलं प्रचंड कंटाळली आहेत आणि लहानसहान गोष्टींवरून चिडचिड करतात. सतत घरात बसून बसून घरातल्या सगळ्यांच लोकांना डिप्रेसिंग वाटतं. मग थोडी संधी मिळाल्यानंतर आम्ही सहलीला बाहेर पडलो. घरातल्या गृहिणीलाही सुट्टीची तेवढीच गरज आहे. आम्ही शक्य तेवढी काळजी घेतली होती."
सध्या ट्रेकिंग बंदच
अनेक आठवडे घरातच थांबावं लागल्यामुळे कोंडल्यासारखं वाटतं हे खरं असलं तरी अनेक ट्रेकर्स सध्या ट्रेकिंगला जात नाहीयेत. पुण्याचे आशिष चितळे सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात आणि ट्रेकर आहेत. ते म्हणतात, "सध्या आम्ही ट्रेकिंग पूर्णपणे बंद केलं आहे कारण कोरोनाची भीती आहे. एकतर पुण्याच्या आसपास जे प्रसिद्ध गडकिल्ले आहेत तिथे कोरोना काळ सोडून एरवीही प्रचंड गर्दी असते, विशेषतः वीकेंडला. तिथे लोक इतका कचरा करतात की ते पाहून खूप वाईट वाटतं. कोरोना काळाचं म्हणाल तर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक गावांनी पर्यटकांची एंट्री बंद केलीये आणि ते योग्यही आहे. त्यांच्यासाठी हा एकमेव उपजीविकेचं साधन असलं तर त्यांनी हा निर्णय घेतला मग आपण का नाही थोड्या काळासाठी ट्रेकिंग थांबवू शकत?"
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)