चंद्रकांत पाटील: 'वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, आमची दुश्मनी कधीच नव्हती'

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, चंद्रकांत पाटील
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत - चंद्रकांत पाटील

"वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच", असं थेट विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी केलं.

ते पुण्यात बोलत होते. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला महत्त्व आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. मोदीजींशी जुनी मैत्री आहे असं उद्धवजींनी सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा."

ते पुढे म्हणाले, "मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार."

2. लहान मुलांवर रेमडेसिवीरचा वापर नको- आरोग्य मंत्रालयाची सूचना

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

लहान मुलांचं लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

आरोग्य मंत्रालयाकडून सविस्तरपणे देण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस करण्यात आलेली नाही, तसंच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

"लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस नाही. 18वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव आहे," असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे.

3. देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला आरोग्य कर्मचारी म्हणून मिळाली लस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचं समोर आलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

एप्रिल 2021मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतल्याचं प्रकरण गाजलं होतं.

शोभा फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि तन्मय फडणवीस

फोटो स्रोत, Tanmay fadnavis/instagram

फोटो कॅप्शन, शोभा फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि तन्मय फडणवीस

फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस हा तेव्हाच्या वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील त्याला लस देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांनी टीका केली होती.

मात्र, तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याची बाब आता समोर आली आहे. बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे.

4. कोव्हॅक्सिनच्या फेज 3 ट्रायलचे रिझल्ट जुलैमध्ये - भारत बायोटेक

कॉव्हॅक्सिन लशीच्या फेज-3 ट्रायलचे रिझल्ट जुलै महिन्यात जाहीर केले जातील, असं लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकनं म्हटलं आहे. यापूर्वी कंपनीनं हे निकास जूनमध्ये जाहीर केले जातील, असं सांगितलं होतं. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

लस

फोटो स्रोत, Getty Images

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीला देशात वापरासाठी मंजुरी मिळालेली आहे. फेज-र ट्रायलचे रिझल्ट येण्यापूर्वीच जानेवारी महिन्यात कंपनीला लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती.

आम्ही फेज-3 ट्रायलचा डेटा जुलै महिन्यात सार्वजनिक करू. तसंच तो औषध नियंत्रक मंडळाला सादर करू, असं कंपनीनं वृत्तसंस्था ANIला सांगितलं आहे.

5. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं

महाराष्ट्रभरात पावसानं हजेरी लावली आहे. कुठे संततधार, तर कुठे मुसळधार सरी कोसळताना पाहायला मिळाल्या. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही पाऊस पडत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)