You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जितिन प्रसाद: भाजप प्रवेश केल्यावर काँग्रेसबद्दल काय बोलले प्रसाद?
उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी (9 जून) भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा करण्यात आली.
दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात जाण्यापूर्वी जितिन प्रसाद यांनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
जितिन प्रसाद गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. उत्तर प्रदेशातील ते काँग्रेसचे मोठे नेते असून राज्यातला काँग्रेसचा मुख्य चेहरा मानले जात होते. उत्तर प्रदेशातून ते दोन टर्म खासदार राहिले आहेत.
जितिन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. त्याबद्दल तुम्ही इथं सविस्तर वाचू शकता.
गेल्या काही काळापासून जितिन प्रसाद काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. काँग्रेसच्या 23 बड्या नेत्यांनी हाय कमांडला पक्षात मोठे बदल करण्याची गरज असल्याचं पत्र लिहिलं होतं. या 23 नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचाही सहभाग होता.
उत्तर प्रदेशात पुढल्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
जितिन प्रसाद म्हणाले, "माझ्या राजकीय जीवनातील नवीन अध्याय सुरू होत आहे. तीन पिढ्या मी काँग्रेस पक्षाला साथ दिली. हा निर्णय मी विचारपूर्वक केला आहे. मी कोणत्या पक्षाला सोडत आहे हा प्रश्न नाहीये तर मी कोणत्या पक्षात प्रवेश करत आहे आणि पक्ष का सोडत आहे? हा मूळ प्रश्न आहे."
ते पुढे म्हणाले, "आज या देशात कोणता पक्ष संस्थात्मक असेल तर तो भाजप आहे. इतर सर्व पक्ष व्यक्ती केद्रित किंवा प्रादेशिक आहेत. आज भारतात केवळ एकच राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो म्हणजे भाजप. देशात सध्या जी परिस्थिती आहे आणि देश ज्या आव्हानांचा सामना करत आहे त्याला उत्तर देण्यासाठी केवळ भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत."
काँग्रेसमध्ये राहून मला जनतेसाठी काम करता येत नव्हते असंही जितिन प्रसाद यांनी सांगितलं.
जितिन प्रसाद यांच्यापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. ते म्हणाले, "मला या गोष्टीचा आनंद आहे. माझे छोटे बंधू यांचे भाजपात स्वागत आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)