You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आरेची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे, मुख्यमंत्र्यांचा निर्णय #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. आरेची 286 हेक्टर जागा अखेर वनविभागाकडे, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबईतली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याविषयीचा निर्णय घेत आरेची 286 हेक्टर जागा वनविभागाला सोपवली.
आरेमधील 125.422 हेक्टर, गोरेगावमधील 71.631 आणि मरोळ मरोशीमधील 89.679 जागा वनविभागाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या जमीन क्षेत्राचा ताबा घेतल्यानंतर आता वनविभाग मुंबईच्या मधोमध एकूण 812 एकर जागेवर वनक्षेत्र फुलवू शकेल.
लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.
2. पंतप्रधानांनी देशातल्या 2 अतिशहाण्या मुख्यमंत्र्याना लायकी दाखवली - भातखळकरांची टीका
"आज देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात," अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
याविषयीचं ट्वीट त्यांनी केलंय.
21 जूनपासून देशातल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत लस देणार असून राज्यांकडे सोपवण्यात आलेलं लसीकरणाचं 25 टक्के काम केंद्र सरकार परत स्वतःकडे घेत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (7 जून) जाहीर केलं होतं.
'लसीकरणाचं विकेंद्रीकरण करावं अशी मागणी करणारी महाराष्ट्र, दिल्ली राज्यं तोंडावर आपटली असून राज्य सरकारांच्या अपयशावर पंतप्रधानांनी जालीम मात्रा लागू केल्याची' टीका भातखळकरांनी केल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.
3. कोरोना निर्बंध हटवण्याची घाई करू नका, WHOचा भारताला इशारा
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची घाई करणं महागात पडू शकतं असा इशारा जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने भारताला दिलाय.
'भारतातील डेल्टा व्हेरियंट आणि इतर व्हेरियंट्सचा वाढता संसर्ग पाहता, निर्बंध शिथील करण्याची घाई गंभीर ठरू शकते. कोरोनावरची लस ज्यांनी अजून घेतलेली नाही त्यांच्यासाठी नियम शिथील करणं धोकादायक ठरू शकतं,' असा इशारा WHOचे प्रमुख टेड्रोस अॅडनहॉम गिब्रायसुस यांनी दिलाय.
न्यूज18लोकमतने ही बातमी दिली आहे.
4. बँकेच्या रांगेत उभ्या राहिलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
खरीप लागवडीसाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या शेतकऱ्याचा परभणीतल्या जिंतूर येथे मृत्यू झाला.
सुदाम कांबळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. जिंतूरच्या मार्केट यार्डातल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते आले होते. पण बँकमध्ये गर्दी असल्याने ते उपाशी पोटी दोन-अडीच तास रांगेत उभे होते.
पैसे काढून गावी परत जात असताना रस्त्यात ते भोवळ येऊन पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ई-सकाळने हे वृत्त दिलं आहे.
5. पेट्रोल-डिझेलची भाववाढ मागे घ्या, नाहीतर आंदोलन करू - नाना पटोले
केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेलची भाववाढ मागे घेतली नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.
केंद्रातील मोदी सरकार इंधनावर भरमसाठी कर लादून जनतेचे खिसे कापत असल्याचं म्हणत काँग्रेसने काल आंदोलन केलं.
मोदी सरकारने ही जुलमी करवसुली कमी करत जनतेला दिलासा दिला नाही, तर काँग्रेस पक्ष भविष्यात आणखी मोठं आंदोलन करणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय.
टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)