पुणे पिरंगुट: आगीच्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू, DNA टेस्ट करून मृतांची ओळख पटवणार

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस अॅक्वा टेक्नालॉजी या कंपनीला काल (7 जून) दुपारी लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला.

कंपनीत यावेळी एकूण 37 कामगार होते. आग लागल्यावर अनेक कामगार आतमध्ये अडकले आणि आगीत होरपळले. त्यापैकी 18 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती पुण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे.

एसव्हीएस अॅक्वा ही पाण्याचं शुद्धीकरण करणारी कंपनी आहे. या ठिकाणी क्लोरिन डायऑक्साईड हे रसायन होतं. हे रसायन ज्वलनशील नसलं तरी त्यातल्या काही घटकांमुळे आग लागल्यानंतर धूर निर्माण झाला, अशी माहिती पोटफोडे यांनी दिली.

कंपनीत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी कंपनीच्या भिंती जेसीबीनं तोडून वाचवण्यात आलं. तसंच, आग लागल्याचे समजताच तातडीने पीएमआरडीएच्या सहा, तर एमआयडीसीच्या दोन अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरा आग विझवण्यात यश आलं.

कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणण्यानुसार एकूण 37 कामगार आत अडकले होते. अग्निशमन दलाकडून 18 कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आगीमुळे धुराचे लोट परिसरात पाहायला मिळत आहेत.

मुळशीचे तहसीलदार अशोक धुमाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

गृहमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी

आज (8 जून) महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पाहणीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. ज्वलनशील केमिकल असल्याने आग लागली. आगीचं कारण, जबाबदार कोण याबाबत चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्त्वात समिती नेमली आहे. याचा सगळा आढावा घेऊन गुन्हा दाखल केला जाईल"

"आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील. त्याशिवाय ओळखता येणार नाहीत. ससून हॉस्पिटलमध्ये दोन ते तीन दिवस जातील," असं वळसे पाटील म्हणाले.

सेफ्टी ऑडिट केलं जाईल आणि एमआयडीसीमध्ये आता हे पाहिलं जाईल, असंही वळसे पाटलांनी सांगितली.

आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटलं, "पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे."

"दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल," अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर ट्वीट करून दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)