हेमा मालिनी : 'कोरोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते' #5मोठ्याबातम्या

हेमा मालिनी

फोटो स्रोत, @dreamgirlhemamalini

फोटो कॅप्शन, हेमा मालिनी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. कोरोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते - हेमा मालिनी

कोरोनासारख्या अनेक आजारांपासून स्वत: ला वाचवण्यासाठी लोकांनी घरी हवन केलं पाहिजे, असं वक्तव्य भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हेमा मालिनी यांनी एक व्हीडिओ शेअर केला होता.

त्या म्हणाल्या, "मी अनेक वर्षांपासून पूजा झाल्यानंतर हवन करते आणि कोरोनाचा संसर्ग आल्यापासून मी दिवसातून दोनदा हवन करते. यामुळे वातावरण फक्त शुद्ध होतं नाही तर पवित्र वाटतं आणि कोरोनासारख्या संसर्गाला आपल्यापासून दूर ठेवतं.

"आज संपूर्ण जग कोरोनासारख्या भयानक संसर्गाचा सामना करत आहे. मी सगळ्यांना विनंती करते की फक्त जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त नाही तर जोपर्यंत आपण कोरोना संसर्गावर मात करत नाही तो पर्यंत रोज हवन करा. याच्याशी कोणत्याही धर्म किंवा जातीचा संबंध नाही," असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.

2. 'शरद पवारांच्या ड्राव्हरमधून आमदारांची यादी चोरून राज्यापालांना देणे कोणत्या नैतिकतेत बसतं?'

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक पाहायला मिळत असून चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना अजित पवारांवर निशाणा साधला. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय 14 महिने जुना आहे, हा विषय आता का काढता? असा सवाल अजित पवार यांनी केला होता.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, चंद्रकांत पाटील

त्याविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, "महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. कारण मी काही त्यांना उद्देशून बोललो नव्हतो. पण, त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावं लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवलं आहे.

"14 महिने झाले तरी जे चुकीचं ते चुकीचेच असतं. शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात?"

3. मोदींनी केली पहिल्या इलेक्ट्रिक वाहन शहराची घोषणा

पर्यावरण दिनानिमित्ताने शनिवारी (5 जून) एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या पहिल्या इलेक्‍ट्रॉनिक शहराबद्दल उल्लेख केला. यामध्ये त्यांनी सांगितलं की, स्टॅच्यू ऑफ यूनिटी असलेले शहर हेच भारतातील पहिले इलेक्‍ट्रॉनिक शहर असणार आहे.

मोदी या कार्यक्रमात भविष्यातील योजनेबद्दल सांगत म्हणाले की, "आगामी काळात पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेऊन गुजरातमधील केवडिया शहरामध्ये फक्त बॅटरीवर चालनाऱ्या वाहनांनाच प्राधान्य दिले जाईल. आगामी काळात या शहरात फक्त बॅटरीवर चालणारी कार आणि बस धावतील."

मोदी

फोटो स्रोत, Getty Images

मोदींच्या या घोषणेपूर्वी 2019 मध्ये केंद्र सरकारने केवडियामध्ये केवळ इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

4. मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार - जयंत पाटील

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. सरकारनामानं ही बातमी दिली आहे.

ते म्हणाले, "मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून, वेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. पण, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता संसदेत याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे.

"त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रह करणार आहे."

जयंत पाटील

फोटो स्रोत, JAYANT PATIL /FACEBOOK

फोटो कॅप्शन, जयंत पाटील

5. ...तर देशांतर्गत प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक नसेल

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना डोमेस्टीक (देशांतर्गत) विमान प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक नसेल, असं वक्तव्य नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे.

हरदीप पुरी यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, "ज्या प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्या प्रवाशांना डोमेस्टीक म्हणजे देशांतर्गत विमान प्रवासासाठी निगेटीव्ह आरटी-पीसीआर प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही.

"भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोविड 19 च्या नवीन नियमावलीत ही सूचना केली आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणीच्या निगेटीव्ह असल्याची अट रद्दबातल केली जाऊ शकेल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता..

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)