कोरोना लॉकडाऊन: परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनांनी निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा-मुख्यमंत्री

कोरोना, लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 'अनलॉक' करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलली आहेत. त्यासाठी पाच स्तरात जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनांनी निर्बंधाबाबत निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

आपल्या परिसरातली दुकानं तसंच बाकी व्यवहार सुरू होणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

"कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या", असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

ब्रेक दि चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करणाऱ्या 4 जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असेही स्पष्ट केले.

"गेल्या वर्षी संसर्ग हा विविध सण उत्सवानंतर वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरं म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभे राहील", असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाची पूर रेषा

मुख्यमंत्री म्हणाले की, "दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्या वर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पाउले उचलतो अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत".

शंका असेल तर निर्बंध सुरूच ठेवा

"कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला , कुठल्याही दबावाला बळी पडू नका", असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे.

कोरोना, लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉकडाऊन

"विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत. आपण स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील गृहीत धरणार

ग्रामीण भागात कोरोना वाढतोय, त्याला रोखण्यासाठी आपण कोरोनामुक्त गाव करा म्हणून आवाहन केले आहे. या कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले.

गर्दी चालणार नाही

"नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडलाआमंत्रण देणारी गर्दी , समारंभ, सोहळे चालणार नाहीत आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवायचे आहे.तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे", असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना, लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, कोरोना

जनजीवन सुरळीत करतानाच कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान महाराष्ट्र सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारनं पाच स्तरात (Levels) जिल्ह्यांची विभागणी केलीय आणि या स्तरांनिहाय नियम बनवले आहेत.

हे पाच स्तर काय आहेत, ते बनवण्यासाठी काय नियम वापरलेत आणि कुठल्यात स्तरात राज्यातील कुठेल जिल्हे येतात, या सर्व गोष्टी आपण एक एक करून सविस्तर जाणून घेऊया.

एकीकडे जिल्ह्यांची पाच स्तरात विभागणी केली आहे मात्र दुसरीकडे स्थानिक प्रशासनाने ठरवावं असे आदेश आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये काय सुरू होणार, खरंच सगळं सुरू होणार का याबाबत गोंधळाचं वातावरण आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)