You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : गंगेच्या काठी वाळूत दफन केलेल्या मृतदेहांना परंपरेचा भाग म्हणणं कितपत योग्य?
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर दफन केलेल्या शेकडो मृतदेहांचे फोटो आणि व्हीडिओ मागच्या आठवड्यात जगभरात चर्चेचा विषय ठरले होते. मृतांच्या आकड्यांवरून लोक प्रश्न विचारत होते, तेव्हा शहरात असणारे उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री महेंद्र प्रताप सिंह यांनी याला 'प्रयागराजची जुनी परंपरा' असं म्हटलं.
प्रयागराजच्या श्रृंगवेरपूर धामजवळ गंगेच्या किनाऱ्यावर दोन किलोमीटरच्या परिसरात इतके मृतदेह दफन केले गेले की त्यांची मोजदाद करणं कठीण होऊन बसलं.
मृतदेहांचं दफन करण्यात इतकी घाई केली की मृतदेहांवर टाकलेली वस्त्र बाहेर आली होती. काही शवांचे अवयव बाहेर आले होते आणि प्राणी त्यांचे लचके तोडून खात होते. या मृतदेहांवर गिधाडं आणि कावळे घिरट्या घालत होतं.
हीच परिस्थिती प्रयागराजच्या फाफामऊ, झूंसी, दारागंज आणि इतर काही घाटांवरही दिसली. याआधी उन्नाव, फतेहपूर, कानपूर आणि रायबरेलीमध्ये मृतदेह वाळून गाडलेले दिसले. त्याआधी गंगा आणि यमुनेतही मोठ्या प्रमाणात मृतदेह तरंगताना दिसले.
गावांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कसे झाले आणि हे मृतदेह कोणत्या गावांचे आहेत, हे लोक कोण आहेत याबद्दल अजूनही पत्ता लागलेला नाही.
प्रयागराजचे जिल्हाधिकारी भानुचंद्र गोस्वामी म्हणतात की, हे मृतदेह सापडलेले नाहीत. उलट लोक त्यांना स्वेच्छेने इथे दफन करून गेलेत. लोक अनेक वर्षांपासून असं करतात.
त्यांच्या मते, "हे काही नवीन नाही. इथे सगळ्या लोकांना असं होतं हे माहितेय. काही समुदायांमध्ये ही परंपरा आहे. काही लोक साप वगैरे चावून मृत्यू झाला तरी अशाच प्रकारे मृतदेह दफन करतात. अर्थात आम्ही टीम बनवून लोकांना जागरूक करतोय की त्यांनी या मृतदेहांचं दहनच करावं म्हणजे प्रदूषण होणार नाही."
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मते याआधीही दफन केलेले मृतदेह गंगेच्या काठावर सापडले आहेत. उन्नावचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांचीही हेच म्हणणं आहे की मोठ्या संख्येने वाळूत दफन केलेले मृतदेह सापडण्याचं कारण परंपराच आहे.
प्रयागराजच्या काही स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये दावा केलाय की, सन 20118 च्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या वेळेसही अशाच प्रकारचं चित्र श्रृंगवेरपूर भागात दिसलं होतं आणि असं अनेकदा झालंय.
पण याची सविस्तर पडताळणी केल्यावर लक्षात येतं की, उत्तर भारतातल्या हिंदू धर्मियांमध्ये मृतदेहांचं काठावर दफन करण्याची अशी कोणतीही परंपरा नाही. लोक असं फक्त विशिष्ट परिस्थितीत झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत करतात किंवा नाईलाज म्हणून.
प्रयागराजच्या दारागंजमध्ये दाहसंस्कार करणारे पुरोहित राजकुमार म्हणतात की, "अनेकदा लोक मृतदेह घेऊन येतात आणि वाळून गाडून निघून जातात. पण असं करणारे तेच लोक असतात ज्यांच्याकडे अग्निसंस्कार करण्याचे पैसे नसतात किंवा ते मृतदेह लहान मुलांचे असतात."
राजकुमार म्हणतात, "आम्ही बऱ्याचदा लोकांना असं करताना पाहिलं आहे. त्यांच्याशी बोलल्यावर कळतं की पैसै नसल्यामुळे ते मृतदेहाचं दफन करत आहेत. आम्ही अशा लोकांची मृतदेहाचं दहन करावं म्हणून मदतही करतो. काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्या मदत करतात. आपल्या मर्जीने तर कोणी दफन करत नाही."
उन्नावच्या बक्सर घाटाबाहेर अंत्यसंस्कारांचं सामान विकणारे दिनकर साहू इतक्या मोठ्या प्रमाणात दफन केलेल्या मृतदेहांबद्द्ल बोलताना म्हणतात, "स्मशानभूमीत असणारी गर्दी आणि महागडं लाकूड यामुळे गरीब लोकांनी शवांचं दफन करणं सुरू केलं आहे. गंगेच्या वाळूत अनेक मृतदेहांचं दफन होताना दिसून येतं. नेहमीच असं होतं असं नाही, पण ज्यांनी हे केलं असेल त्यांचा नक्कीच नाईलाज झाला असेल.
प्रयागराजच्या श्रृंगवेरपूरजवळच्या कमालापूर गावात राहाणारे दिलीप कुमार म्हणतात की गेल्या महिनाभरात आसपासच्या भागांतून कितीतरी लोक आले आणि मृतदेहांचं दफन करून गेले. ते म्हणतात की आसपासच्या गावात राहाणाऱ्या गावकऱ्यांनी पोलिसांकडे अनेक तक्रारीही केल्या पण काही झालं नाही.
'परंपरा दोन्ही आहेत पण दाहसंस्कार सर्वोत्तम विधी आहे'
गेल्या काही दिवसांमध्ये यूपीच्या ज्या ठिकाणांहून मृतदेहांचं दफन केल्याच्या बातम्या आल्या तिथे आसपास रहाणाऱ्या अनेक कुटुंबांशी आम्ही बोललो. पण आम्हाला असं एकही कुटुंब सापडलं नाही जे म्हणेल की त्यांच्याकडे दफन करण्याची पद्धत आहेत.
कमालापूर गावच्याच एका दलित समाजाच्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू 11 मे रोजी 'ताप आणि खोकल्यामुळे' झाला. त्या लोकांनी मृतदेहाचं दफन केलं. पण त्यांचं म्हणणं होतं की असं 'अकाली' झालेल्या मृत्यूमुळे केलं. एरवी ते असं करत नाहीत.
कोरोना काळात शहरांमध्ये मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आणि स्मशानभूमी आणि दफनभूमी दोन्ही ठिकाणी मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना 12-12 तास वाट पाहावी लागली. लाकडांचे भाव कित्येक पटींनी वाढले आणि स्मशानभूमीत लाकडं कमी पडली.
अशाच समस्या गावांमध्येही आल्या. परिणामी अनेक लोक, जे अंत्यसंस्कारांचा खर्च करू शकत नव्हते ते नदीकाठी वाळूत मृतदेह दफन करून निघून गेले किंवा त्यांनी मृतदेह नदीत सोडून दिले.
प्रयागराजच्या दारागंजमध्ये एका संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबूलाल मिश्र म्हणतात की, "परंपरा तर दोन्ही आहेत पण हिंदू धर्मशास्त्रांनुसार दाहसंस्कार सर्वोत्तम विधी आहे आणि बहुतांश लोक हाच विधी करतात."
बीबीसीशी बोलताना डॉ. मिश्र म्हणतात की, "ज्यांचा मृत्यू कुष्ठरोग किंवा क्षयरोगाने होतो त्यांचा दाहसंस्कार करत नाहीत. कारण असं समजतात की अशा लोकांचा दाहसंस्कार करणाऱ्या लोकांनाही या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. अशा लोकांना एक तर जलप्रवाहित किंवा भूमिसात करण्याची परंपरा आहे. याशिवाय ज्यांची मुंज झालेली नाही अशा लोकांनाही भूमिसात केलं जातं. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे."
'जातीमुळे नाही तर गरिबीमुळे मृतदेहाचं दफन'
बाबूलाल मिश्र हेही म्हणतात की, "सध्याच्या काळात मृतदेहाचा दाहसंस्कार करणं अवघड झालंय. कारण ते फार खर्चिक आहे. ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे ते लोक सामान्य परिस्थितीत जरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तरी मृतदेह गाडतात. जुन्या परंपरेतनुसार मृतदेहाचं दफन करताना त्यावर मीठ टाकून गाडायचे म्हणजे शरीर लवकर मातीत मिसळल आणि वातावरण प्रदुषित होणार नाही."
स्थानिक लोकांच्या मते हिंदू धर्मातल्या काही जातींमध्ये मृतदेह गाडण्याची परंपरा आहे पण डॉ मिश्र हे म्हणणं खोडून काढतात. त्यांच्या मते याचा जातीशी काही संबंध नाही. "याचं कारण गरिबी हेच आहे. आर्थिक दुर्बल असल्यामुळे दलित लोक आधीपासून असं करतात. जे गरीब आहेत ते अजूनही करतात. पण जे लोक समर्थ आहेत ते अग्निसंस्कारच करतात."
मिश्र म्हणतात की, "या गोष्टीला काही अपवाद आहेत. विशेष्ट परिस्थितीत काय करावं हे सांगितलं गेलं आहे. संन्याशाचा दाहसंस्कार होत नाही. त्याला जलप्रवाहित किंवा भूमिसात केलं जातं. कारण संन्यस्त जीवन स्वीकारण्याआधी त्या व्यक्तीने आपला अंत्यसंस्कार केलेला असतो."
शैव आणि कबीरपंथीय समुदायात दफन करण्याची पद्धत
परंपराचं म्हणाल तर समाजशास्त्रातल्या तज्ज्ञांना हिंदू धर्मात, विशेषतः उत्तर भारतात दफन करण्याची पद्धत आहे हे मान्य नाही. काशी हिंदू विद्यापीठातले समाजशास्त्राचे माजी प्राध्यापक अशोक कौल म्हणतात, "अशा कोणत्या परंपरेचे ऐतिहासिक पुरावे नाहीत. फक्त ऐकीव गोष्टी आहेत. हिंदू धर्मातल्या मुख्यधारेची ही संस्कृती कधीच नव्हती. दफन करणं किंवा दहन करणं याचा संबंध धर्माशी आहे जातीशी नाही."
अर्थात हिंदू धर्मातले काही पंथ, उदाहरणार्थ शैव संप्रदाय आणि कबीरपंथीय लोकांमध्ये मृतदेह दफन करण्याची पद्ध आहे. पण अशोक कौल यांच्या मते, "अशा लोकांची संख्या आधी खूप कमी होती आणि आता तर नसल्यात जमा आहे."
प्रयागराजमधले एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी 2018, 2019 आणि त्याच्याही आधीच्या काही फोटोंचा दाखला देत मृतदेह दफन करण्याची परंपरा आहे असं सांगतात. पण अनेक स्थानिक पत्रकार आणि फोटोग्राफरच्या मते आधी दफन केलेले मृतदेह सापडले जरी असले तरी त्यांची संख्या इतकी मोठी कधीच नव्हती.
प्रयागराजमधले वरिष्ठ फोटोग्राफर राजेश कुमार सिंह एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसाठी काम करतात. ते म्हणतात, "मृतदेह दफन केले जातात आणि आम्ही अनेकदा ते पाहिलं आहे. पण 2018 किंवा त्याआधीही मला इतक्या मोठ्या प्रमाणात मृतदेह दिसले नव्हते.
प्रयागराजमधील वरिष्ठ फोटोग्राफर राजेश कुमार सिंह आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि फोटो एजन्सीसाठी काम करतात. ते सांगतात, "मी 2019 साली नमामी गंगे प्रोजेक्टसाठी बिजनौर ते बलिया प्रवास करत होतो, तेव्हा मला अनेक ठिकाणी मृतदेह दफन केलेले दिसले. श्रुंगवेरपूरमध्येही दिसले होते. मी फोटोही काढले होते पण आता जितके मृतदेह मिळालेत तितके आधी सापडले नव्हते."
अनेक स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे की, जर 2018 साली इतके मृतदेह सापडले असते तर स्थानिक माध्यमांमध्ये बातम्या छापून आल्या असत्या आणि फोटोग्राफर्सच्या नजरेतून हे सुटलं नसतं. पण असं झालं नाही. स्थानिक लोकांच्या मते मृतदेह गावात दफन करण्याचं सगळ्यांत मोठं कारण कोव्हिड आणि इतर काही आजारांमुळे ग्रामीण भागात झालेले मृत्यू हे आहे.
त्यांच्या मते, "आजारीपणात झालेल्या मृत्यूनंतर नातेवाईक गुपचूप गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेह दफन करून टाकतात, जेणेकरून त्यांची कोणी चौकशी करणार नाही. बाकी त्यांच्याकडे दाहसंस्कारांसाठी पैसे नसणं हा मुद्दा आहेच."
एसके यादव प्रयागराजमध्ये फोटो जर्नलिस्ट म्हणून गेल्या तीन दशकांपासून सक्रिय आहेत आणि सध्या अलाहबाद विद्यापीठात फोटोग्राफी विभागात प्राध्यापक आहेत. एसके यादव यांनाही 2018 किंवा त्याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडल्याची घटना आठवत नाही."
ते म्हणतात, "गंगेच्या किनाऱ्यावर दफनभूमीसारखं दृश्य दिसणं काही साधी गोष्ट नाही. असं काही चित्र समोर यावं आणि माध्यमांमध्ये दिसू नये असं तर होणार नाही. आता जर असे फोटो समोर येत असतील तर त्यांची पडताळणी झालीच पाहिजे. हे पाहिलं पाहिजे की, हे फोटो ज्या काळातले सांगितले जातात, त्याच काळातले आहेत की खोटे बनवले आहेत. आजकाल फोटो मोबाईलने काढला किंवा कॅमेऱ्याने, त्याची सगळी माहिती लगेच मिळते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)