कोरोना व्हायरस : देशातल्या मोठ्या शहरांतून लहान लहान गावात कसा पोचला संसर्ग?

    • Author, विकास पांडे आणि शादाब नझमी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

दिल्ली, मुंबई, पुणे, लखनऊ अशी देशातली मोठमोठी शहरं कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात अडकली आहेत. हॉस्पिटल्स आणि स्मशानभूमी दोन्हीकडे जागा नाहीये, अनेकांचे अंत्यविधीही कार पार्किंगमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या स्मशानभूमीत होत आहेत.

मोठ्या शहरांमधल्या यंत्रणेची धूळदाण उडवणारी ही लाट लहान-लहान शहरांकडे सरकली आहे. निमशहरी आणि खेडेगावात काय घडतंय याची पूर्ण माहिती समोर येत नाहीये.

राजस्थानमधल्या कोटाचे रहिवाशी असणारे राजेश सोनी यांनी आपल्या वडिलांना घेऊन एका टुकटुक रिक्षातून या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये सलग 8 तास फिरत राहिले. त्यांना अँब्युलन्स मिळाली नाही आणि ती रिक्षा हाच एकच पर्याय त्यांच्यासाठी शिल्लक होता.

संध्याकाळी 5 वाजता त्यांनी ठरवलं की आता हॉस्पिटलसाठी बेड शोधण्यात काही अर्थ नाहीये, वडिलांची तब्येत जास्तच खराब होतेय आणि ते वडिलांना घेऊन घरी आले. त्यांनी सगळं 'नशिबाच्या भरवशावर' सोडलं होतं.

"मी त्यांना घरीच औषधं देतोय पण मला खात्री नाहीये की ते जगू शकतील. आम्हाला मरायला रस्त्यावर सोडून दिलं आहे," राजेश म्हणाले. ते म्हणतात की अनेक हॉस्पिटल्सनी त्यांना फसवलं आणि त्यांच्याकडून टेस्टसाठी पैसे घेतले पण नंतर बेड नसल्यामुळे त्यांच्या वडिलांना घेऊन जायला सांगितलं.

"मी श्रीमंत माणूस नाहीये, माझ्याकडे जे पैसै होते ते मी रिक्षा ड्रायव्हर आणि दवाखान्यांमध्ये खर्च केले. आता मी ऑक्सिजन सिलेंडर आणायला पैसै उधार मागतोय."

देशाची राजधानी दिल्लीत हे चित्र वेळोवेळी दिसलं आहे, पण आता देशाच्या लहान लहान शहरांतूनही अशा कहाण्या ऐकू येत आहेत.

भारताच्या पाच राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे हे बीबीसीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

कोटा, राजस्थान

कोटा शहर आणि आसपासच्या भागात गेल्या आठवड्यात 6 हजाराहून जास्त केसेस समोर आल्या आहेत. कोरोना साथीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत इथे 264 मृत्यू झाले आहेत. पण यापैकी 35 टक्के मृत्यू एकट्या एप्रिल महिन्यात झाले आहेत.

7 एप्रिलपर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दुप्पट व्हायला 72 दिवस लागत होते, आता त्यासाठी 27 दिवस लागतात.

शहरातले सगळे ऑक्सिजन बेड भरलेले आहेत आणि जिल्ह्याच्या 329 पैकी फक्त 2 आयसीयू 27 एप्रिलपर्यंत रिकामे होते. शहरातल्या एका वरिष्ठ पत्रकारांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "हॉस्पिटल क्षमतेपेक्षा जास्त भरली आहेत आणि इथली खरी आकडेवारी खूप जास्त असू शकते."

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर, टोसिलिझुमॅब सारखी औषधं यांचा इथे प्रचंड तुटवडा आहे. कोटा जिल्हा मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षासाठी असणाऱ्या कोचिंग क्लासेसचं माहेरघर आहे.

इथले विद्यार्थी निघून गेलेत आणि जिल्हा आता संकटात सापडला आहे. इथल्या संकटाकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचं लक्ष नाहीये. त्या पत्रकाराने आम्हाला सांगितलं की इथली हॉस्पिटल्स 'कोव्हिड त्सुनामीसाठी' तयार नव्हती. इथे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची तातडीने गरज आहे, ते मिळाले नाहीतर लोक रस्त्यांवर मरायला लागतील असंही त्यांनी आम्हाला सांगितलं.

अलाहाबाद, उत्तर प्रदेश

या शहराला प्रयागराज म्हणूनही ओळखलं जातं. अलाहाबादमध्ये 20 एप्रिलपर्यंत 54,339 कोरोना व्हायरस प्रकरणांनी नोंद झाली होती. पण त्यानंतरच्या एका आठवड्यात या केसेसमध्ये एकदम 21 टक्क्यांनी वाढ झाली आणि 11,318 नव्या प्रकरणांची नोंद झाली.

शहरातल्या नोंद झालेल्या 614 मृत्यूंपैकी 32 टक्के मृत्यू फक्त एप्रिल महिन्यात झाले. इथल्या आरोग्यसेवांची कुठलीही अधिकृत आकडेवारी नसली तर इथल्या अनेकांनी बीबीसीला सांगितलं आहे की त्यांना त्यांच्या नातलगांसाठी बेड मिळाला नाही.

शहराच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेकदा फोन करून आणि लिखित प्रश्न विचारुनही शहरात बेड्स का मिळत नाहीयेत याचं उत्तर मिळालं नाही. इथल्या एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितलं की प्रत्यक्षात मृत्यूंची संख्या खूप जास्त आहे कारण इथल्या स्मशानभूमी आणि दफनभूमी सतत कार्यरत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच म्हटलं की राज्यात कुठेही ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड किंवा औषधांची कमतरता नाहीये. पण प्रत्यक्षात परिस्थितीत प्रचंड तफावत असल्याचं तज्ज्ञ म्हणत आहेत.

सोशल मीडियावर बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसारख्या औषधांसाठी मदत मागणाऱ्या पोस्ट भरभरून वाहात आहेत. मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलं की कोणत्याही खाजगी हॉस्पिटलने 'ऑक्सिजनची कमतरता असल्याचा चुकीचा' दावा केला कर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.

एका खाजगी हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याने बीबीसीला सांगितलं की ऑक्सिजन मिळवणं खूप अवघड आहे पण ते तक्रार करू शकत नाहीत कारण त्यांना कारवाईची भीती आहे.

"मला कळत नाही हॉस्पिटल्स ऑक्सिजनच्या कमतरतेचा चुकीचा दावा का करतील, यात काही अर्थच नाहीये," ते म्हणाले.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या येत आहेत. उत्तर प्रदेशातले अनेक जिल्हे आणि गावांमध्ये बेड्सची कमतरता असल्याचं चित्र आहे.

आशिष यादव यांचे वडील कानपूरमध्ये सिरियस झाले आहेत पण त्यांना बेड मिळत नाहीये, ना त्यांचा डॉक्टरचा संपर्क होत होता.

"मी सगळीकडे विनंती केली, अक्षरशः भीक मागितली. पण कोणीच मदत केली नाही. जाहिरात केलेल्या हेल्पलाईन नंबर्सवर कोणी फोनसुद्धा उचलत नाहीये."

कबीरधाम, छत्तीसगड

मध्य भारतातल्या या जिल्ह्यात 1 मार्चपर्यंत कोरोनाची एकही सक्रिय केस नव्हती. पण गेल्या 7 दिवसात इथे 3000 केसेसची भर पडली आहे.

कबीरधाम जिल्हा हॉस्पिटलमध्ये 7 व्हेंटिलेटर्स आहेत, पण हे मशिन्स चालवायला इथे कोणीही तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. सरकारी आकड्यांनुसार जिल्हा हॉस्पिटलमध्ये 49 स्पेशलिस्ट डॉक्टर्स हवेत पण इथे फक्त 3 आहेत. नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांचीही इथे कमालीची कमतरता आहे.

स्थानिक पत्रकार म्हणतात की गंभीर रुग्णांना हाताळण्याची क्षमता जिल्ह्यात नाहीये. वाढत्या कोरोना संसर्गासाठी इथे तयारीच केली गेली नव्हती. अनेक लोक कोणत्याही उपचाराशिवाय मरण पावले आहेत.

भागलपूर आणि औरंगाबाद, बिहार

बिहारमधल्या भागलपूर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. 20 एप्रिलपासून इथे 26 टक्क केसेस वाढल्या आहेत. याच काळात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 36 टक्क्यांनी वाढलं आहे.

या जिल्ह्यातल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलजमध्ये फक्त आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. 28 एप्रिलपर्यंत इथले सगळे आयसीयू बेड भरले होते. या हॉस्पिटलच्या 350 पैकी 270 ऑक्सिजन बेड्सही भरले होते. हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की इथल्या 220 डॉक्टरांपैकी 40 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत तर यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दवाखान्यावरचा ताण वाढला आहे.

याच राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. 5 एप्रिलपासून इथे 5 हजार नव्या केसेस समोर आल्या आहेत. याच काळात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे असं सरकारी आकडेवारी सांगते. पण इथल्या वरिष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे की प्रत्यक्षातली आकडेवारी कितीतरी जास्त असू शकते कारण लहान शहरं आणि गावांमध्ये कोरोनाची चाचणी न होणं ही मोठी समस्या आहे. अनेक लोक गंभीररीत्या आजारी पडतात आणि मृत्यू पावतात पण त्यांची कोव्हिड-19 ची चाचणी होत नाही. अशा मृत्यूंची सरकारी आकडेवारीत नोंद होत नाही.

सुमित्रा देवींना औरंगाबादमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी फार झगडावं लागलं. एकीकडे त्यांची तब्येत खालावत होती पण अनेक दिवस प्रयत्न करूनही त्यांची RT-PCR चाचणी होत नव्हती. त्यांच्या चाचणीच्या रिपोर्टशिवाय हॉस्पिटल्सनी त्यांना दाखल करून घ्यायला नकार दिला.

सरतेशेवटी त्यांच्या कुटुंबाने शेजारच्या जिल्ह्यातल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं. तिथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण हॉस्पिटलचं म्हणणं पडलं की त्या अत्यावस्थ आहेत आणि तिथे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा नाहीत.

नाईलाजाने सुमित्रा देवींच्या कुटुंबीय त्यांना घेऊन राज्याची राजधानी पटनामधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांना अॅडमिट होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली.

त्यांना बेड मिळाल्यानंतर 2 तासात त्यांचं निधन झालं.

नैनिताल, उत्तराखंड

पर्यटकांचं आकर्षण असलेला हा जिल्हा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाशी झगडतोय. 27 एप्रिलला इथल्या 142 आयसीयू बेड्सपैकी 131 बेड्स भरलेले होते आणि 771 ऑक्सिजन बेड्सपैकी फक्त 10 रिकामे होते.

गेल्या आठवड्यात इथे 4000 नव्या केसेस आणि 82 मृत्यूंची नोंद झाली. इथला वाढता कोरोनाचा संसर्ग थांबवायला इथल्या आरोग्य व्यवस्थेला अपयश येतंय कारण इथले अनेक पेशंट दूरवरच्या खेड्यातून येत आहेत अत्यंत कमी प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत.

एका स्थानिक डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की इथली परिस्थिती, "वाईट आणि भयानक आहे."

"आम्ही या परिस्थितीत सापडलोय कारण सरकारने दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी योजना बनवली नाही. मला भीती आहे की हिमालयाच्या दुर्गम भागात अनेक लोक मरतील आणि आपल्याला त्यांच्याविषयी कधी काही कळणारही नाही. त्यांचा उल्लेख कधीच कोणत्या आकडेवारीत येणार नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)