संजय गायकवाड : शिवसेना आमदाराची गाडी पेटवण्याचा प्रय़त्न

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गेल्या काही दिवसांपासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या इनोव्हा गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बुधवारी (26 मे) पहाटे 3 च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला आहे.

आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. रात्री उशीरा दीड वाजता ते बुलडाण्यात घरी परतले. त्यानंतर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या मागे आल्या आणि गाडीच्या टॅंकवर पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी पेटवून दिली.

त्यांच्या गाडीच्या मागे- पुढे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या. या सर्व गाड्या पेटवण्याच्या दृष्टिकोनातून हा हल्ला करण्यात आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुनियोजित कट असल्याप्रमाणे हल्ला करण्यापूर्वी परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी कापला होता, असंही आता पुढे येत आहे.

या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सकाळी घटनास्थळी दाखल झालं आहे. त्यांनी शोध सुरू केला आहे. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून ही घटना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्यानं घेतली आहे.

"मुंबईहून आम्ही जेव्हा घरी परतलो तेव्हा सगळीकडी स्ट्रीट लाईट सुरू होती. प्रवास झाल्यामुळे आम्ही लवकर झोपलो. पण बाहेर अचानक गाडीच्या सेन्सरचा आवाज आला. सगळे धावत आलो तेव्हा गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. बहुतेक त्यांचा उद्देश गाडी ब्लास्ट करून घर जाळण्याचा असावा. हा पूर्वनियोजित कटच असू शकतो," असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.  ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे.

प्रदीप साळुखे यांनी सांगितलं, "आज सकाळी आम्हाला माहीती मिळाली की जुन्या गावांमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची इनोव्हा क्रिस्टा गाडी कुणीतरी अज्ञात इसमाने जाण्याचा प्रयत्न केला. मागच्या बाजूने बराच भाग जळाला होता.

घटनास्थळावर आम्ही जाऊन पाहणी केली. आमदारांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी विविध पथकं तयार करण्यात आलेली आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)