You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : WHO म्हणण्याप्रमाणे खरंच कुंभमेळा आणि निवडणुकांमुळे रुग्णसंख्या वाढली का?
भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यासाठी राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम सुद्धा कारणीभूत असल्याचं निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नोंदवलं आहे. WHO ने भारतात संसर्ग पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांचा अभ्यास केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सद्य:स्थितीचा अहवाल WHO ने प्रसिद्ध केला आहे. भारतात कार्यक्रमांच्या निमित्ताने लोक एकमेकांच्या संपर्कात आल्याचा उल्लेखही यात करण्यात आला आहे.
तसंच भारतात आढळून आलेल्या कोरोना व्हायरसची संसर्ग क्षमता जास्त असल्याचंही अहवाल म्हटलं आहे.
देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पाच राज्यातील निवडणुकांचा प्रचार आणि कुंभमेळ्याच्या आयोजनावरूनही मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे भारतात ही परिस्थिती निर्माण होण्यामागचं कारण म्हणून निवडणूक प्रचारसभांकडे बोट दाखवलं जात आहे.
पण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने हा आरोप फेटाळून लावला आहे. देशातील वाढत्या रुग्णसंख्येचा आणि निवडणूक प्रचारसभा किंवा धार्मिक कार्यक्रमांचा काही एक संबंध नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेते डॉ. विजय चौथाईवाले यांनी दिलं आहे.
WHO अहवालात काय म्हटलंय?
"भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यापैकी दोन कारणं म्हणजे राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र आले. तसंच सार्वजनिक नियमांचं पुरेसं पालन करण्यात आलं नाही," असंही WHO ने म्हटलं आहे.
या कारणांपैकी कोणते कारण सर्वाधिक कारणीभूत आहे किंवा कोणते कारण किती प्रमाणात कारणीभूत आहे याची सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी अशा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचं गेल्या दोन महिन्यात प्रचार सत्र सुरू होतं.
यादरम्यान या 5 राज्यांमधील विविध शहरांमध्ये प्रचारसभांसाठी गर्दी उसळल्याचंही दिसून आलं.
शिवाय, मार्च आणि एप्रिल या कालावधीत कुंभमेळ्यासाठी हरिद्वार येथे मोठी गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने त्याठिकाणीही जमलेल्या भक्तांना कोव्हिडची लागण झाल्याचं समोर आलं.
प्रचारसभांमुळे कोरोना वाढला का?
कोरोना काळातही राजकीय पक्षांच्या प्रचारसभांमध्ये मोठी गर्दी जमल्याचं दिसून आलं. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. शिवाय लोकांच्या तोंडावर मास्कही नव्हते.
सभा घेणारे नेते, उमेदवार किंवा त्यांचे समर्थक यांपैकी कुणीच कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केल्याचं दिसलं नाही.
दरम्यान, भारताच्या निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालला यासंबंधित एक नोटीस पाठवली. राजकीय नेत्यांकडून नियम पाळले जात नसल्याने 22 एप्रिलपासून पश्चिम बंगालमधील प्रचारसभांवर आयोगाकडून बंदी घालण्यात आली.
दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या वेगाने वाढत गेली. रुग्णसंख्येचा चढता आलेख आपल्याला पाहता येऊ शकेल. इतर राज्यांतही कमी जास्त फरकाने अशीच परिस्थिती आहे.
पण येथील स्थानिक पातळीवर पसरलेल्या कोरोना संसर्गाची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.
पण देशात फक्त याच चार राज्यांमध्ये रुग्ण वाढत चाललेत असंही नाही. यात कालावधीत देशात इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसून आली.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. या राज्यांमध्ये कोणत्याही निवडणुका नाहीत. पण तरीही येथील रुग्णवाढीचं प्रमाण मोठं आहे.
त्यामुळे फक्त निवडणुकांमुळे कोरोना वाढतो, असं थेट म्हणता येणार नाही. तसं म्हणण्यासाठी ठोस पुरावेही आपल्याकडे उपलब्ध नाहीत.
फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णसंख्या वाढली
भारतातील कोरोना व्हायरस बाधितांच्या संख्येत 2020 च्या सप्टेंबर महिन्यातील मध्यापासून घट पाहायला मिळाली होती. पण फेब्रुवारी अखेर या संख्येने पुन्हा वेग पकडला.
मार्च महिन्यात रुग्णवाढीचा आलेख प्रचंड वेगाने वाढत आहे. परिणामी, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत आकडे दुप्पट वेगाने वाढताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येचा मागच्या वेळचा उच्चांकही यावेळी मोडल्याचं दिसून आलं.
30 एप्रिलपर्यंत कोव्हिड संसर्गात विक्रमी वाढ झालेली दिसली. देशात दिवसाला चार लाखांपर्यंत रुग्णांची नोंद होऊ लागली.
पुढे यात काहीशी घट झाली आणि 3 मे रोजी दिवसाला 3 लाख 60 हजार रुग्ण आढळले. त्यामुळे भारतात कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठून आता ही लाट ओसरायला सुरुवात झाली, असं मानलं जाऊ लागलं. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या पुन्हा वाढली.
त्याशिवाय, मार्च महिन्यात उत्तर भारतात कुंभमेळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी जमते. इथंही कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन योग्यरित्या झालं नाही, असं सांगितलं जातं.
10 ते 14 एप्रिल या कालावधीत कुंभमेळ्यातून 16,00पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)