You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: भारतातील निवडणूक प्रचारसभांमुळे कोरोना वाढला का? - रिअॅलिटी चेक
- Author, श्रुती मेनन आणि जॅक गुडमॅन
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
भारतातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
याच दरम्यान भारतातील चार राज्यांमध्ये निवडणुकाही सुरू आहेत. त्यामुळे भारतात ही परिस्थिती निर्माण होण्यामागचं कारण म्हणून निवडणूक प्रचारसभांकडे बोट दाखवलं जात आहे.
पण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने हा आरोप फेटाळून लावला आहे. देशातील वाढत्या रुग्णसंख्येचा आणि निवडणूक प्रचारसभा किंवा धार्मिक कार्यक्रमांचा काही एक संबंध नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेते डॉ. विजय चौथाईवाले यांनी दिलं आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णसंख्या वाढली
भारतातील कोरोना व्हायरस बाधितांच्या संख्येत 2020 च्या सप्टेंबर महिन्यातील मध्यापासून घट पाहायला मिळाली होती. पण फेब्रुवारी अखेर या संख्येने पुन्हा वेग पकडला.
मार्च महिन्यात रुग्णवाढीचा आलेख प्रचंड वेगाने वाढत आहे. परिणामी, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत आकडे दुप्पट वेगाने वाढताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येचा मागच्या वेळचा उच्चांकही यावेळी मोडल्याचं दिसून आलं.
याच दरम्यान, भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात येत आहेत. याठिकाणी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राजकीय पक्षांच्या प्रचारसभाही होत आहेत. मार्च आणि एप्रिल असे दोन महिने या ठिकाणी मतदान होणार आहे.
प्रचारसभांमुळे कोरोना वाढला का?
कोरोना काळातही राजकीय पक्षांच्या प्रचारसभांमध्ये मोठी गर्दी जमल्याचं दिसून आलं. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. शिवाय लोकांच्या तोंडावर मास्कही नव्हते.
सभा घेणारे नेते, उमेदवार किंवा त्यांचे समर्थक यांपैकी कुणीच कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केल्याचं दिसलं नाही.
दरम्यान, भारताच्या निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालला यासंबंधित एक नोटीस पाठवली आहे. राजकीय नेत्यांकडून नियम पाळले जात नसल्याने 22 एप्रिलपासून पश्चिम बंगालमधील प्रचारसभांवर आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे.
दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. रुग्णसंख्येचा चढता आलेख आपल्याला पाहता येऊ शकेल. इतर राज्यांतही कमी जास्त फरकाने अशीच परिस्थिती आहे.
पण येथील स्थानिक पातळीवर पसरलेल्या कोरोना संसर्गाची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.
पण देशात फक्त याच चार राज्यांमध्ये रुग्ण वाढत चाललेत असंही नाही. यात कालावधीत देशात इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसून आली.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. या राज्यांमध्ये कोणत्याही निवडणुका नाहीत. पण तरीही येथील रुग्णवाढीचं प्रमाण मोठं आहे.
त्यामुळे फक्त निवडणुकांमुळे कोरोना वाढतो, असं थेट म्हणता येणार नाही. तसं म्हणण्यासाठी ठोस पुरावेही आपल्याकडे उपलब्ध नाहीत.
बंदिस्त ठिकाणी जास्त धोका
एखाद्या बंदिस्त ठिकाणी कार्यक्रम घेण्याच्या तुलनेत मोकळ्या ठिकाणी लोकांनी एकत्रित येण्याने संसर्गाचा धोका कमी असतो, असं तज्ज्ञ सांगतात.
वॉरविक मेडिकल स्कूलचे प्रा. लॉरेन्स यंग यांच्या मते, मोकळ्या वातावरणात व्हायरस वेगाने निष्क्रिय होऊ शकतो.
पण तरीही अशाप्रकारे मोठ्या संख्येने एका ठिकाणी गर्दी जमल्यास संसर्गाचा धोका जास्त असतो. लोक गर्दीच्या ठिकाणी एकमेकांच्या जवळ बराच वेळ उभे असतात, त्यांच्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही, अशा वेळी संसर्ग पसरू शकतो, असंही प्रा. यंग यांनी सांगितलं.
युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलचे प्रा. जोनाथन रेड सांगतात, "जवळ जवळ उभे राहण्यात धोका तर आहे. विशेषतः तुमच्या समोर किंवा आजूबाजूला 1 मीटर अंतरावर कुणी उभं उसेल तर संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत मोकळ्या वातावरणातही विषाणूची बाधा होण्याची शक्यता असते."
अशा स्थितीत एखादा व्यक्ती जोरजोराने ओरडत असेल, तर तोंडातून उडणाऱ्या तुषारांमार्फत संसर्गाची शक्यताही जास्त असते.
रुग्णवाढीचं कारण नवा व्हेरियंट?
भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्यामागे कोरोनाचा दुसरा व्हेरियंट आहे का, याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, अशी शक्यता असली तरी त्याचेही सबळ पुरावे उपलब्ध नाहीत.
योग्य आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाच्या भारतीय व्हेरियंटला अद्याप 'व्हेरियंट ऑफ कन्सर्न'च्या यादीत समाविष्ट केलेलं नाही. युकेमध्ये ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरियंटसाठी हा शब्द वापरला जातो.
त्याशिवाय, मार्च महिन्यात उत्तर भारतात कुंभमेळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी जमते. इथंही कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन योग्यरित्या झालं नाही, असं सांगितलं जातं.
10 ते 14 एप्रिल या कालावधीत कुंभमेळ्यातून 1600पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)