चक्रीवादळ : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका - कुलाबा वेधशाळा

चक्रीवादळ, अरबी समुद्र, महाराष्ट्र

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

(महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असं वेधशाळेनी 12 मे रोजी सांगितलं होतं. 13 मे ला वेधशाळेनी सांगितलं की या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला नाही. यासंबंधातली ताजी बातमी तुम्हाला या ठिकाणी वाचता येईल.)

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका अजूनही कायम आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे, मात्र हे वादळ कुठल्या दिशेनं जाईल हे आत्ताच सांगता येणार नाही.

अरबी समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात दाट ढग जमा झाल्याचं इन्सॅट उपग्रहानं पाठवलेल्या ताज्या प्रतिमेतून स्पष्ट होतंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 तारखेला अरेबियन समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रुपांतर होईल.

मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते सांगतात, "16 तारखेला या चक्रीवादळाचा जोर वाढून महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याचा प्रभाव जाणवेल. तिथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे पाहायला मिळतील. या हवामानाचा परिणाम मध्य महाराष्ट्रावरही पाहायला मिळेल."

या दरम्यान अरबी समुद्रानं रुद्रावतार धारण केलेला दिसेल. वाऱ्याचा वेग 40 ते 50 ताशी किलोमीटर असेल आणि त्याची तीव्रता ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढूही शकते. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. ज्या बोटी समुद्रात आहेत, त्यांनी लवकरात लवकर परत यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

"मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे," असं रायगडच्या उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र तिथून चक्रीवादळ पुढे कुठल्या दिशेनं सरकेल, हे आत्ताच सांगता येणार नाही.

हवामान

फोटो स्रोत, IMD

इथून चक्रीवादळ पश्चिमेला ओमानच्या दिशेनं सरकू शकतं. ते पूर्वेला सरकलं, तर आधी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशात त्याचा प्रभाव जाणवू शकतो आणि तिथून ते पुढे उत्तरेला गुजरात किंवा दक्षिण पाकिस्तानकडे सरकू शकतं. याविषयीची निश्चित माहिती 14 मे नंतरच कळू शकेल.

यंदाच्या मोसमातलं हे या परिसरातलं पहिलं चक्रीवादळ ठरू शकतं. या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर त्याला 'तौकते' हे नाव दिलं जाईल. म्यानमारनं सुचवलेलं हे नाव आहे. चक्रीवादळांची नावं कशी ठरवली जातात, याविषयीचं सविस्तर वृत्त तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटवर वाचू शकता.

चक्रीवादळ, अरबी समुद्र, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Majority World

फोटो कॅप्शन, समुद्रकिनारे

हिंदी महासागराच्या उत्तरेला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एरवी मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती झालेली दिसते. यंदा मात्र मेच्या मध्यावर पहिलं वादळ अरबी समुद्रात निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पूर आणि मुसळधार पावसाचं संकट सरकारी यंत्रणा आणि आरोग्य सुविधांवरचा ताण वाढवू शकतं, असं केंद्रीय पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला निसर्ग या चक्रीवादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)