आमदार अण्णा बनसोडे कोण आहेत आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार का झाला?

फोटो स्रोत, facebook
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
पिंपरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर गोळीबार झाल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.
गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपी तानाजी पवार यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवडच्या झोन एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार तानाजी पवार हे एका कंपनीत कामाला आहेत.
दुपारी पवार हे अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात आले. त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरुन वादावादी झाली. त्यातून बाहेर पडताना पवार यांनी अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर गोळीबार केला.
गोळीबारानंतर अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी पवार यांना चोप दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे.
आमदार बनसोडे काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना बनसोडे म्हणाले, "अॅंथनी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांना मी वैयक्तिक ओळखत नाही. त्यांचा तानाजी पवार हा सुपरवायझर आहे. दोन मुलगे कामाला घेण्यासाठी माझा पी ए तानाजी पवार यांना फोन करत होता. त्याने माझ्याशी बोलताना अरेरावी केली होती. आज तो ऑफिसला आला होता. त्याला आणि त्याच्या मालकाला हा विषय सोडून द्यायला सांगितलं."
"त्याने बोलताना वाद घातला. त्यानंतर तो ऑफिसच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबार केला. त्याच्यासोबत त्याचा मेव्हना आणि एक साथिदार होता. त्यांच्याकडे देखील पिस्टल होते. त्याने फायरिंग केल्यानंतर कार्यकत्यांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस तपासातून गोळीबाराचा हेतू स्पष्ट होईल. माझा आणि त्या ठेकेदाराचा कुठलाही संबंध नाही.''
गोळीबारानंतर अण्णा बनसोडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून आपण सुरक्षित असल्याचं सर्वांना कळवलं.
लोकांनी संतप्त होऊन कुठेही गर्दी करू नये, काळजी घ्यावी, असं आवाहन अण्णा बनसोडे यांनी केलं आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
कोण आहेत अण्णा बनसोडे ?
अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे.

फोटो स्रोत, facebook
दोन वेळा ते पिंपरीमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
बनसोडे हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. त्यांची आधी पान टपरी होती, पुढे ते कार्यकर्ते झाले, नगरसेवक बनले आणि मग आमदार झाले. अजित पवार यांचे विश्वासू म्हणून देखील ते ओळखले जातात.
लस खरेदीसाठी 25 लाख रुपये
कोरोनाच्या लसीच्या खरेदीसाठी 7 मे या दिवशी बनसोडे यांनी आमदार निधीतून 25 लाख रुपये दिले होते. ही लस त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना देण्यात यावी असे पत्र देखील त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना लिहिले होते.
लसीकरणासाठी आमदार निधी देणारे ते पिंपरी चिंचवड शहरातील पहिलेच आमदार आहेत. यापूर्वी देखील मार्च महिन्यात पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात सीटीस्कॅन यंत्र बसविण्यासाठी सव्वा कोटी रुपये त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून दिले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























