You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींची सेंट्रल व्हिस्टावर टीका : देशाला श्वास हवा, पंतप्रधानांचं निवासस्थान नाही #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) देशाला श्वास हवा, पंतप्रधानांचं निवासस्थान नव्हे - राहुल गांधी
नव्या संसद इमारतीच्या अर्थात सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"देशाला श्वासाची गरज आहे, पंतप्रधानांसाठी निवासस्थानाची नव्हे," अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केलीय. याबाबतचं ट्वीट त्यांनी केलीय.
या ट्वीटसोबत राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या इंडिया गेटजवळ सुरू असलेल्या बांधकामाचा फोटो आणि ऑक्सिजनसाठी लोकांनी लावलेल्या रांगेचा फोटो जोडला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहा:कार उडवला आहे. ऑक्सिजनची प्रचंड कमतरता देशभरात जाणवत आहे. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प सुरूच आहे.
या प्रकल्पाला स्थगिती देऊन, त्याच पैशानं कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय सुविधांची निर्मिती करण्यासाठी प्राधान्य द्यावं, अशी मागणी सातत्यानं काँग्रेसकडून करण्यात येतेय.
राहुल गांधी यांनी त्यांच्या दुसऱ्या एक ट्वीटमध्ये म्हटलंय की, "कोरोना आता शहरांमध्येच नव्हे, तर ग्रामीण भागातही वेगानं पसरतोय. शहरांनंतर आता गावंही परमेश्वरावरच अवलंबून आहेत."
राहुल गांधी यांच्या या टीकेवर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
2) गडकरी म्हणतात, 'देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती...'
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीसांना हात जोडून एक सल्ला दिलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
गडकरी म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जाणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोक होते? आता सर्व काम व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे."
"उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत," असंही गडकरी म्हणाले.
"आपला जीव वाचला तर पुढे काही करता येणार आहे. त्यामुळे आता पहिली प्रायॉरिटी ही आपला जीव, आपलं कुटुंब. दुसरी आपल्या घराच्या सगळ्या आर्थिक व्यवस्था आणि मग तिसरी प्रायॉरिटी आपला पक्ष, समाज," असंही गडकरींनी विनंतीपूर्वक म्हटलं.
3) GST माफ केल्यास कोरोनाची औषधं, लशी महाग होतील - सीतारामण
"कोरोनाची औषधं, लशी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी गोष्टींचा देशांतर्गत पुरवठा आणि व्यावसायिक आयातीवरील वस्तू आणि सेवा कर (GST) पूर्णत: माफ केल्यास त्या वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतील," असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केलंय. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
याचं कारण देताना सीतारामण म्हणाल्या, "GST माफ केल्यास उत्पादकांना त्यांच्या उत्पादनसाखळीच्या प्रत्येक टप्प्यावर भरलेल्या कराचा परताव्याचा लाभ मिळणार नाही आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल,"
सध्या भारतात उत्पादित लशी आणि त्यांच्या व्यावसायिक आयातीवर 5 टक्के GST आकारला जातो, तर कोरोना औषधे आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स यांच्यावर 12 टक्के GST वसूल केला जातो.
4) सरकारला मराठा, धनगर आरक्षण द्यायचेच नाही - पडळकर
"मराठा आरक्षणप्रकरणी ठाकरे सरकारने सर्वोच न्यायालयात गायकवाड आयोगाची पाठराखण केली नाही. महाविकास आघाडी सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही असेच दिसत आहे," अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
यावेळी गोपीचंद पडळकरांनी MPSC तून निवडलेल्या मात्र नियुक्त्या न मिळालेल्या उमेदावारांच्या नियुक्त्यांची मागणीही सरकारकडे केली.
"मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या तातडीने आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी वर्णी लावली त्या तातडीने बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी एमपीएसीतून निवडले गेलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यावी. त्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत," असं पडळकर म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.
5) विरोधकांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी लवकर चर्चा - राऊत
राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या एकजुटीसाठी लवकरच चर्चा सुरू होईल, त्याबाबत शरद पवार यांच्याशीही चर्चा झालीय, अशी माहिती शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या आघाडीचा आत्मा काँग्रेस असेल, असंही राऊत म्हणाले.
"देशात विरोधकांच्या सक्षम आघाडीची गरज आहे. मात्र, ही आघाडी काँग्रेसशिवाय होऊ शकत नाही. काँग्रेस आत्मा आहे. मात्र, आघाडीचं नेतृत्त्व चर्चेतून ठरवता येईल," असं राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडीचं उदाहरण दिलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आलेत आणि नीट सरकार चालत आहेत, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला नीट काम करता आलं नसल्याचं म्हटलं. हीच भूमिका त्यांनी 'सामना' वृत्तपत्रातील 'रोखठोक' सदरातूनही मांडलीय.
त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. "आम्ही सामना वृत्तपत्र वाचत नाही. आम्ही त्यांच्या भाष्याकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्याकडे बोट दाखवल्यावर स्वत:कडे चार बोट असतात हे त्यांनी विसरू नये," असं पटोले म्हणाले. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)