You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली 'या' 2 गोष्टींची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राचं कौतुक केलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून लसीकरणासंदर्भात दोन मागण्यांचा विचार व्हावा अशी विनंती केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, "आज म्हणजे शनिवार 8 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद झाला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.
"तसंच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असं सांगत मोदींनी राज्याच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे."
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली आणि महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावं अशी विनंती केली आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसं नियोजन सुरू आहे त्याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, असं सांगून महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
याआधी सर्वोच्च न्यायालयानं मुंबईच्या कोव्हिड संकटाचा उल्लेख केला होता आणि या आजाराला आळा घालण्यासाठीच्या मुंबई मॉडेलची स्तुती केली होती.
कोव्हिड-19 च्या त्सुनामीत ऑक्सिजन व्यवस्थापनात मुंबईनं चांगल काम केल्यानं कोर्टानं त्याची दखल घेतली होती. एवढंच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने 'दिल्ली आणि केंद्र सरकारला मुंबईने काय केलं हे पाहा' अशी सूचनाही केली होती. आता पंतप्रधानांनी राज्य सरकारला शाबासकी दिली आहे.
मु्ख्यमंत्र्यांचं आवाहन
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्रही प्रसिद्ध झालं आहे. त्यात उद्धव यांनी महाराष्ट्रात विशेषतः 18-44 या वयोगटात आणखी वेगानं लसीकरण करता यावं, यासाठी काही सूचना केल्या आहेत.
लशीची मागणी वाढल्यामुळे नोंदणीसाठी लस उपलब्ध होताच कोविन वेबसाईट काम करेनाशी होते. त्यामुळे प्रत्येक राज्याचं स्वतंत्र कोविन अॅप तयार केलं जावं आणि त्यातली माहिती केंद्रासोबत शेअर केली जावी अशी सूचना राज्य सरकारनं केली आहे.
लशींचा पुरवठा वाढावा यासाठी सर्व लशी एकाच वेळेत विकत घेण्याची महाराष्ट्राची तयारी आहे, मात्र लशीच्या निर्मात्यांकडे तेवढ्या लशी उपलब्ध नाहीत.
त्यामुळे राज्यांना इतर लस निर्मात्यांकडून लशी घेण्याची परवानगी मिळाली, तर अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर लस देणं शक्य होईल. त्यासाठी प्रत्येक राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाची मदत घेता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
या सूचनांवर केंद्र सरकार काय पावलं उचलतंय, ते पाहण आता महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)