कोरोना: लस उत्पादन एका रात्रीत वाढवता येत नाही- अदार पुनावाला #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. लस उत्पादन एका रात्रीत वाढवता येत नाही- अदर पुनावाला

"लसीचे उत्पादन एका रात्रीत वाढवले जाऊ शकत नाही. आम्हाला हे देखील समजून घेण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी लसीच्या डोसचे उत्पादन हे एक सोपे काम नाही. अगदी विकसित देश आणि कमी लोकसंख्या असलेल्या देशातही औषधी कंपन्या यावर संघर्ष करताना दिसतात," असं सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. लशीसाठी मला धमक्या मिळतात, दबाव आहे असं पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पण लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे बर्‍याच राज्यात, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण अजून सुरु झालेलं नाही.

पुनावाला म्हणाले, "प्रत्येकाला लवकरात लवकर लस हवी आहे. आम्हालाही तसंच वाटतं. आम्ही या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात आम्ही भारताला मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करू."

2. रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात

फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्रे लिक केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी फिर्यादीमध्ये माझ्याविरोधात कठोर कारवाई करु नये, अशी मागणी याचिकेत केली आहे. पोलीस बदल्यांसंबंधित महत्त्वाची कागदपत्रे लिक केली आहेत आणि अनेक राजकीय व्यक्ती- अधिकाऱ्यांचे फोन कॉल्स विनापरवानगी टॅप केले आहेत, अशी तक्रार महाराष्ट्र गोपनीय माहिती विभागाकडून बीकेसी सायबर गुन्हे विभागात अज्ञात व्यक्तिंविरोधात केली आहे.

या तक्रारीवरुन त्यांना पोलिसांनी एप्रिलमध्ये दोन वेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र शुक्ला अद्याप चौकशीला हजर झालेल्या नाहीत. या पार्श्वभुमीवर आता त्यांनी एड समीर नांगरे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक माझ्या विरोधात बोगस तक्रार दाखल केली आहे. पोलीस बदल्यांमध्ये मंत्री आणि राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे भ्रष्टाचार केला जातो हे मी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे सांगितले. खरेतर यासाठी माझे कौतुक व्हायला हवे, मात्र माझ्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

3. 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबे यांचं कोरोनामुळे निधन

IRS अधिकारी अनंत तांबे यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. ते अवघ्या 32 वर्षांचे होते. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे ते अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

जावडेकर यांनी म्हटलं आहे की, "श्री. तांबे यांच्या अचानक आणि अकाली निधनामुळे फार दु:खी आहे. कोविडमुळे वयाच्या 32 व्या वर्षी अनंत तांबे यांचे निधन झाले. ते अतिरिक्त पीएस म्हणून काम करत होते. एक तरुण आणि तेजस्वी आयआरएस अधिकारी गमावल्याचं दु:ख आहे."

4. तुम्ही राक्षस आहात, कोरोनावर बनावट औषध विकणाऱ्यांवर फरहान अख्तर संतापला

"मी एक बातमी पाहिली ज्यात काही लोक बनावट औषधे बनवत विकत असल्याचे दिसतं आहे. अशा कठीण प्रसंगात लोकांचा विश्वासघात करण्यासाठी तुम्हाला एका खास प्रकारचे राक्षस असणं गरजेचं आहे. तुम्ही जे कोणी आहात तुम्हाला स्वत:ची लाज वाटली पाहिजे," अशा आशयाचं ट्वीट फरहानने केलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरत असताना मूलभूत सोयीसुविधांसाठी सामान्य माणसाला वणवण करावी लागते आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन काहींनी बनावट औषधं विकायला सुरुवात केली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

या आधी फरहानने एक ट्वीट केले होते. त्यात त्याने करोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. यात त्याने देशभरातील स्वयंसेवी संस्थांची नाव आणि त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे. या संस्था गरजूंना ऑक्सिजन, बेड्स आणि अन्न पर्यंत सगळ्या गोष्टींची मदत करत आहेत.

5. पॅट कमिन्स पीएम केअर्स ऐवजी युनिसेफला मदत करणार

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने पीएम केअर्स फंडामध्ये देणगी देण्याचा निर्णय बदलला आहे. 'टीव्ही९ मराठी'ने ही बातमी दिली आहे.

50,000 डॉलर्सची जवळपास 37 लाख रुपये रक्कम पीएम केअर्सऐवजी कोव्हिड-19 पीडितांसाठी काम करणाऱ्या युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या इंडिया कोव्हिड-19 क्रायसिस अपीलला दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पॅटने म्हटलं होतं की, "एक खेळाडू म्हणून आमच्याकडे एक गोष्ट आहे, ती म्हणजे आम्हाला लोक ओळखतात. याच गोष्टीचा आम्ही योग्य प्रकारे वापर करु शकतो. त्यामुळेच मी पीएम केअर्स फंडासाठी काही मदत एकत्र केली आहे. विशेषत: भारतातील रूग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा, यासाठी मी 50 हजार डॉलर्सची मदत दिली आहे." आयपीएलमधील सहकाऱ्यांनाही मदतीचं आव्हान पॅटने केलं होतं.

कमिन्सने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "मी गेली अनेक वर्ष भारतात येतोय आणि मी या देशाच्या प्रेमात पडलो आहे. येथील लोक माझ्यावर भरभरुन प्रेम करतात. कोरोना संकटाच्या काळात अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएल खेळवणे योग्य की अयोग्य यावर सध्या चर्चा सुरू आहेत. मी भारत सरकारला सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळात आयपीएलमुळे किमान चार तास तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे."

दरम्यान आता कमिन्सने त्याचा निर्णय बदलला आहे. त्याने त्याची मदत ही पीएम केअर्स ऐवजी युनिसेफला देम्याचे ठरवले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)