कोरोना लग्न : भटजींच्या मुस्काटात मारली, नवऱ्याची कॉलर धरून लग्न थांबवण्याचा नक्की प्रकार काय?

    • Author, दिलीप कुमार शर्मा
    • Role, गुवाहाटीहून, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

ईशान्येकडच्या त्रिपुरा राज्यातल्या एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. शैलेश कुमार यादव यांच्या एका लग्नात कोरोना निर्बंधांचे नियम लागू करण्याच्या पद्धतीवर टीका होतेय.

हे प्रकरण समोर आल्यानंतर सत्ताधारी आमदारांसह अनेक लोकांनी या कलेक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी मुख्य सचिवांकडे यासंबंधीचा सविस्तर अहवाल मागितला आहे.

कोव्हिड संक्रमणाच्या वाढत्या केसेसमुळे 22 एप्रिलपासून आगरतळा नगरपालिकेच्या भागांत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. अशात कोव्हिड प्रोटोकालच्या अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेऊन लग्न समारंभ होत आहेत.

पण 26 एप्रिलला आगरतळा शहरातल्या पॅलेस कंपाऊंडच्या माणिक्य कोर्टात एका स्थानिक डॉक्टरच्या बहिणीच्या लग्नात जे घडलं त्याने सगळं कुटुंब अजूनही हैराण आहे.

आपल्या बहिणीच्या लग्नात घडलेल्या घटनेबद्दल सांगताना डॉ. सुभ्रजीत देव यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या सगळ्या कुटुंबाला मानसिक त्रास झाला. माझ्या लहान बहिणीचं लग्न सोमवारी, 26 एप्रिलला होतं. यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाची परवानगीही घेतली होती. पण जिल्ह्याधिकारी माझे वृद्ध आई-वडील, घरातल्या बायकांशी चुकीच्या पद्धतीने वागले. त्यांनी लग्न बंद करण्याचा नावाखाली आमच्या पाहुण्यांवर लाठीचार्ज केला. अपशब्द उच्चारले."

'घटनेचा मानसिक धक्का बसलाय'

शहरात रात्री 10 वाजेपासून नाईट कर्फ्यू सुरू होतो आणि लग्नसमारंभ त्यानंतरही सुरू होता.

याबद्दल उत्तर देताना सुभ्रजीत म्हणतात, "नाईट कर्फ्यूत लग्नसमारंभ होत असेल तर प्रशासनाकडून वाहन पास दिले जातात. हे पास संपूर्ण रात्रीसाठी वैध असतात. माझ्या बहिणीच्या लग्नचा मुहुर्त रात्री साडे अकराचा होता. आम्ही वाहन पाससाठी जो अर्ज दिला होता यात याचा उल्लेखही होता. पण त्यानंतरही कलेक्टर इथे येऊन असा धिंगाणा घालतील याची कल्पना आम्हाला नव्हती."

"माझ्या मोठ्या बहिणीने जेव्हा जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाल्याचा कागद दाखवला तेव्हा त्यांनी तो कागद फाडून माझ्या बहिणीच्या तोंडावर फेकला. माझ्या वडिलांना हृदयविकार आहे, आईला डायबेटिज आहे. त्या दिवसाच्या घटनेमुळे आम्ही अजूनही मानसिक धक्क्यात आहोत. मला अजूनही कळत नाही एक वरिष्ठ आयएएस अधिकारी असं कसं वागू शकतात? मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि मी कोरोना पेशंटची काळजी घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोव्हिडच्या नियमांचं उल्लंघन करणार नव्हतो. आम्ही नियमाप्रमाणे फक्त 35 पाहुण्यांना लग्नात बोलावलं होतं."

जिल्हा प्रशासनाची परवानगी

सुभ्रजीत कोलकात्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये सर्जन आहेत. आपल्या बहिणीच्या लग्नात जो प्रकार झाला त्याची चौकशी व्हावी अशा अर्थाची सोशल मीडिया पोस्टही त्यांनी लिहिली. जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्याची कागदपत्रंही त्यांनी सोशल मीडियावर टाकली.

त्यांनी लिहिलं की, हिंदू पंचागांनुसार लग्नाचा मुहुर्ता रात्री 11.30 वाजताचा होता. याचा उल्लेख आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये केला होता आणि सोबत लग्नाची पत्रिकाही जोडली होती. यामुळे आम्हाला डॉ. शैलश कुमार यादव यांनी समारंभासाठी परवानगी दिली होती.

आगरतळा शहरात पसरणाऱ्या कोरोना व्हायसरचं संक्रमण थांबवण्यासाठी CRPC च्या कलम 144 अंतर्गत नाईट कर्फ्यूचं उल्लंघन केलं म्हणून सोमवारी 2 मंगल कार्यालयं बंद करण्याचे आदेश दिले गेले होते. त्याचीच पाहणी करायला पश्चिम त्रिपुरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. शैलेश यादव स्थानिक पोलिसांसह विवाहस्थळी पोहचले होते.

सोशल मीडियावर व्हायरल व्हीडिओ

जिल्हा प्रशासनाच्या या कारवाई दरम्यान स्थानिक माध्यमांचे काही प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या भागात दोन लग्न समारंभ चालू होते.

या व्हीडिओत जिल्हाधिकारी नवरा-नवरी आणि त्यांच्या कुटुंबावर ओरडताना दिसत आहेत. एका ठिकाणी ते लग्न लावणाऱ्या वृद्ध भटजींच्या 'कानशिलात मारताना' दिसत आहेत. या व्हीडिओत दिसतयं की लग्नाच्या ठिकाणी पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी आपल्या पोलीस जवानांना म्हणत आहेत की, "बाहेर काढा यांना, मारा यांना." आणि एक पोलीस कर्मचारी लग्नात आलेल्या पाहुण्यांना लाठीने मारताना दिसतोय.

यानंतर एका खोलीत पोलीस इतर अनेक पाहुण्यांवर लाठीचार्ज करताना दिसतात. मग जिल्हाधिकारी वराची गच्ची पकडून त्याला बाहेर काढायला सांगतात. यावेळी तिथे महिला आणि लहान मुलंही दिसत आहेत.

जिल्हाधिकारी पुन्हा ओरडतात, "तुम्हाला समजत नाही का, कायदा नावाची काही गोष्ट आहे इथे."

इतकंच नाही जिल्हाधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवरही ते चिडतात आणि त्यांना निलंबित करण्याच्या गोष्टी करतात.

त्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी 29 जणांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.

जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं

गुलाब बागान आणि माणिक्य दरबारमध्ये होणाऱ्या लग्नांवर धाडी टाकल्यानंतर जिल्हाधिकारी शैलेंद्र यादव यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी म्हटलं की, "जर कोव्हिड-19 पसरला तर हेच लोक उद्या सरकारने काही केलं नाही असे आरोप करतील. त्यांनी काय केलंय? परवानगी रात्री 10 नंतर नव्हती. त्यानंतर हॉल बंद करावा लागेल."

जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "लोकांच्या सतत तक्रारी आल्यानंतरही इथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ही लग्न थांबवण्यासाठी काही पावलं उचलली नाहीत. म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या नात्याने मला इथे यावं लागलं. मी पश्चिम आगरतळा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी शिफारस करेन. त्यांनी या लोकांबरोबर संगनमत केलं होतं. त्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे."

घटनेवर प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोन्ही व्हीडिओनंतर अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृत्याला चुकीचं ठरवलं आहे आणि त्याबद्दल राग व्यक्त केला आहे.

अनेकांनी म्हटलं की जर कायद्याचं उल्लंघन झालं तर ते लोकांना अटक करू शकत होते. अपशब्द वापरण्याचं आणि वृद्ध भटजींना मारण्याचं समर्थन होऊच शकत नाही. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनीही जिल्हाधिकारी शैलेंद्र यादव यांच्यावर टीका केली आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि विरोधी पक्ष नेते माणिक सरकार यांनी ही घटना चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

पश्चिम त्रिपुराच्या खासदार आणि भाजप नेत्या प्रतिमा भौमिक यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन या घटनेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं वचन दिलं आहे.

त्या म्हणाल्या, "प्रशासन कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी योग्य ती पावलं उचलत आहेत, पण लग्नाच्या रात्री जे झालं ते चुकीचंच होतं. असं व्हायला नको होतं."

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली माफी

या घटनेनंतर सत्ताधारी भाजपचे आमदार सुदीप रॉय बर्मन, आशीष कुमारा साहा आणि सुशांत चौधरी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार यांना पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडिया आणि राज्यातल्या अनेक मोठमोठ्या व्यक्तीकडून होणाऱ्या कठोर टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे.

त्यांनी म्हटलं, "मी नाईट कर्फ्यूच्या दरम्यान जे केलं ते लोकांच्या भल्यासाठी केलं. माझा हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता."

दरम्यान, मुख्यमंत्री विप्लब देव यांनी मुख्य सचिवांना घडलेल्या घटनेवर सविस्तर अहवाल सादर करायला सांगितलं आहे. तसंच सुभ्रजीत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे.

सुभ्रजीत म्हणतात की, "आमच्याबाबतीत जे घडलं त्यांचं दुःख आम्हीच समजू शकतो. मला अपेक्षा आहे की याबाबतीत आम्हाला न्याय मिळेल. आशा करतो की त्रिपुराच्या रहिवाशांना लग्नासारख्या शुभप्रसंगी अशा तऱ्हेचा त्रास पुन्हा सहन करावा लागणार नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)