कोरोना लस : दिल्लीत एका महिन्यात 44 ऑक्सिजन प्लांट लावणार - अरविंद केजरीवाल

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, दिल्ली सरकार ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी बँकॉकहून 18 ऑक्सिजन टँकर आणि फ्रान्सहून 21 ऑक्सिजन प्लांट मागवत आहे.

त्याचसोबत, दिल्लीमधील ऑक्सिजन कमतरतेची समस्या सोडवण्यासाठी एका महिन्यात 44 ऑक्सिजन प्लांट लावले जातील, असंही केजरीवाल म्हणाले.

"यातील 8 ऑक्सिजन प्लांट केंद्र सरकारच्या मदतीने सुरू केले जाणार आहेत. तर इतर 36 प्लांटची जबाबदारी दिल्ली सरकार उचलेल," असं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस - अरविंद केजरीवाल

दिल्लीत 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

लवकरात लवकर अधिकाधिक लोकांना देण्यात यावी यासाठी सरकार एक योजना तयार करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

यासाठी सरकारनं 1 कोटी 34 लाख लस खरेदी करण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

सगळ्यांना लस मिळाल्यास कोरोनामुळे कुणाचीही स्थिती गंभीर होणार नाही, अशी आशा केजरीवाल यांनी व्यक्त केली.

दरम्यान कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. या टप्प्यात 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील सगळे लोक 1 मेपासून लस घेऊ शकतील.

दिल्लीत लॉकडाऊन वाढवला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन, आणखी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवला आहे. सोशल मीडियाद्वारे रविवारी (15 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांनी याबाबत माहिती दिली.

आधी जाहीर केलेला लॉकडाऊन उद्या म्हणजे 26 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र, दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आणखी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

म्हणजेच, आता 3 मे 2021 च्या सकाळी 5 वाजेपर्यंत पुढील आठवड्याचा लॉकडाऊन असेल.

"हे शेवटचं शस्त्र होतं, जे आम्ही वापरू इच्छित होतो. पण लॉकडाऊन लावावा लागत आहे," असं लॉकडाऊनच्या घोषणेवेळी केजरीवाल म्हणाले.

"दिल्लीमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर 36-37 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. दिल्ली अशा स्थितीत कधीच पोहोचली नव्हती. काल हाच दर कमी होऊन 30 टक्क्यांपर्यंत आलाय. मात्र, कोरोना संपेल असं आपण आता बोलू शकत नाही," असं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत ऑक्सिजनची प्रचंड कमतरता जाणवत असल्याचं नमूद केलं.

"दिल्लीला 700 टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र, केंद्र सरकारकडून दिल्लीला 480 टन ऑक्सिजन मिळण्याचा शब्द दिला गेलाय. शनिवारी आणखी 10 टन देण्याचं केंद्राकडून आश्वासन दिलं गेलं. मात्र, एवढा ऑक्सिजन अजून दिल्लीत पोहोचला नाही," असंही केजरीवाल म्हणाले.

विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला ऑक्सिजन पुरवण्यासाठी पत्र लिहिलं असून, त्यांच्याशी चर्चाही करतोय, अशी माहिती केजरीवालांनी दिली.

याआधीच्या लॉकडाऊनवेळी केजरीवाल काय म्हणाले होते?

दिल्लीमध्ये 19 एप्रिल ते 26 एप्रिल पूर्णतः संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांवर पडत असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे," असं केजरीवाल म्हणाले होते.

19 एप्रिल रोजी सकाळीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत ते म्हणाले "दिल्लीची परिस्थिती कशी आहे याबाबत माझी आणि नायब राज्यपालांची सविस्तर चर्चा झाली होती.

"दिल्लीची आरोग्य व्यवस्था कोलमडली नाही पण खूप तणावाखाली आहे. ऑक्सिजन, आयसीयू बेड अशा अनेक गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे," असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

पुढे ते म्हणाले होते की, गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. यावेळी तुम्ही दिल्ली सोडून कुठेही जाऊ नका.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)