You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विवेक : प्रसिद्ध तमीळ अभिनेते विवेक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन
तामिळ अभिनेते विवेक यांचं शनिवारी चेन्नईत निधन झालं. ते 59 वर्षांचे होते आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
पण त्यांच्या निधनाची चर्चा होते आहे, कारण विवेक यांनी हार्ट अॅटॅक येण्याच्या एक दिवस आधी सरकारी रुग्णालयात जाऊन कोव्हिडवरची लस घेतली होती. मात्र लशीचा विवेक यांच्या मृत्यूशी काही संबंध असल्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण रुग्णालयानं दिलं आहे.
विवेक यांनी गुरुवारी (15 एप्रिल) लस घेतली होती. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी लसीकरणाच्या आपल्या अनुभवाविषयी सांगितलं आणि लोकांना लस घेण्याचं आवाहनही केलं.
शुक्रवारी (16 एप्रिल) विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते घरातच खाली कोसळले.
विवेक यांना लगेचच चेन्नईच्या SIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार विवेक यांना त्यांच्या कुटुंबियांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात आणलं, तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू केले. त्यानंतर विवेक यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आणि मग अँजियोप्लास्टीही करण्यात आली. ते आयसीयूमध्येच होते, शनिवारी (17 एप्रिल) पहाटे त्यांचं निधन झालं.
विवेक यांना अक्युट करोनरी सिंड्रोम हा हृदयाच्या धमन्यांशी निगडीत आजार होता आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला असून लशीमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण SIMS रुग्णालयाच्या डॉ. विजयकुमार चोखानी यांनी दिलं आहे.
विवेक यांच्या निधनानंतर तामिळनाडूसह देशातील अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
विवेक हे एक विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध होते आणि 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. रजनीकांत यांच्या 'शिवाजी द बॉस' या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. तामिळ चित्रपटात सृष्टीतल्या आयकॉन्समध्ये त्यांचा समावेश केला जातो. त्यांना पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं.
विवेक दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे चाहते होते. आपल्या मुलाचा डेंग्यूनं मृत्यू झाल्यावर ते सामाजिक कार्यात उतरले. त्यांनी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली होती आणि तीस लाखांहून अधिक झाडं लावली होती. एक कोटी झाडं लावण्याची त्यांची योजना होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)