कोरोना लस : हाफकिन इन्स्टिट्यूटला निर्मितीची परवानगी, काय आहे संस्थेचा इतिहास?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

भारतात लसीकरणाचा विषय निघाला, की हाफकिन इन्स्टिट्यूटचं नाव आपोआपच पुढे येतं. मुंबईतल्या या संस्थेनं तयार केलेल्या लशींमुळे देशात प्लेग, कॉलरा, रेबीज, पोलिओ अशा आजारांवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं आहे.

भारतातली ही सर्वांत जुनी जैव-विज्ञान संस्था आता कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईतही महत्त्वाचं योगदान देऊ शकते. या संस्थेला 'कोव्हॅक्सिन' या लशीचं उत्पादन करण्यास केंद्र सरकारने 15 एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे.

संस्थेशी संलग्न हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन (हाफकिन महामंडळ) मार्फत लशीचं उत्पादन केलं जाणार आहे. कोव्हॅक्सिन ही हैदराबादमधल्या भारत बायोएन्टेकनं तयार केलेली लस आहे.

हाफकिनमध्ये कशी तयार होईल कोव्हिडची लस?

"वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हाफकिनमध्ये कोव्हॅक्सिन लस बनवण्याची परवानगी एका वर्षाकरिता दिली जात आहे," अशी माहिती विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वेगानं पसरत असताना हाफकिनमध्ये लशीचं उत्पादन करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती राज्य सरकारनं केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या मागच्या दोन व्हीडिओ संवादांदरम्यानही त्याचा उल्लेख केला होता.

त्यानंतर केंद्रानं ही परवानगी दिली असून या प्रकल्पासाठी आता शासनाकडून त्यासाठी आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.

हाफकिन महामंडळाच्या मुंबई आणि परळमधील केंद्रांमध्ये लसनिर्मितीची क्षमता असून, मुंबईत 154 कोटी रुपये खर्चून नवीन प्लांट उभारला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात (20 मार्च) दिली होती.

हाफकिनकडे वर्षभरात अंदाजे 130 कोटी लस निर्माण करण्याची क्षमता असेल, असं मुख्यमंत्री तेव्हा म्हणाले होते.

एखाद्या साथीच्या रोगात असं महत्त्वाचं योगदान देण्याची हाफकिन इन्स्टिट्यूटची ही पहिली वेळ नाही. इथे फक्त लशींची निर्मिती केली जात नाही, तर त्याविषयी संशोधनात आणि औषध निर्मितीतही हाफकिन देशात अग्रेसर राहिली आहे.

जीवरक्षक लशींचं माहेरघर

मुंबईच्या परळमध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटची मूळ इमारत उभी आहे. या परिसरातच केईएम हॉस्पिटल, लहान मुलांसाठीचं वाडिया रुग्णालय, कॅन्सर रुग्णांसाठीचं टाटा रुग्णालय ही मुंबईतली काही प्रमुख रुग्णालयं उभी आहेत.

हाफकिनची ही इमारत म्हणजे एकेकाळचं राजभवन म्हणजे मुंबईच्या गव्हर्नरचं निवासस्थान होतं. 1899 साली मुंबईचे गव्हर्नर सँडहर्स्ट यांनी ही जागा डॉ. व्लादेमार मोर्डेकई हाफकिन यांना प्लेग संशोधन प्रयोगशाळेसाठी दिली होती. त्यावर्षी 10 ऑगस्टपासून हाफकिन यांनी इथे लस संशोधन आणि निर्मितीचं काम सुरू केलं होतं.

युक्रेनमध्ये जन्मलेले व्लादेमार हाफकीन योगायोगाने 1893 साली भारतात आले होते. त्यांनी भारतात घालवलेली 22 वर्ष अतिशय महत्त्वाची ठरली.

हाफकिन यांनी कोलकात्यात कॉलरा लसीकरणाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता. मग 1896 साली भारतात प्लेगची साथ पसरल्यावर त्यांनी मुंबईत राहून संशोधन केलं. 10 जानेवारी 1897 रोजी प्लेगची लस स्वतःला टोचून त्यांनी तिची सुरक्षितता सिद्ध केली.

हाफकिन यांच्या या लशीनं पुढे लाखो लोकांचे प्राण वाचवले. हाफकिन यांच्या निवृत्तीनंतर या संस्थेला त्यांचं नाव देण्यात आलं.

1975 साली औषध आणि लस निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगानं व्हावी यासाठी राज्य शासनानं हाफकिनचं विभाजन केलं, म्हणजे संशोधन आणि निर्मिती करणारे विभाग वेगळे झाले आणि हाफकिन महामंडळाची स्थापना झाली. सध्या मुंबईबाहेर पिंपरी आणि जळगावात या महामंडळाचे निर्मिती प्रकल्प आहेत.

पुढच्या अनेक दशकात हाफकिन इन्स्टिट्यूटनं कॉलरा, धनुर्वात, रेबीज अशा आजारांवरच्या अधिक प्रभावी लशी विकसित केल्या. तसंच सर्पदंश, विंचूदंश आणि काही आजारांवरील औषधांची निर्मितीही सुरु केली.

हाफकिननं मोठ्या प्रमाणात पोलिओवरचे डोसही तयार केले, जे देशातून या रोगाला हद्दपार करण्यात महत्त्वाचे ठरले. लस आणि औषध निर्मितीसोबतच हाफकिन संस्थेत एड्स, टीबी अशा आजारांवर संशोधनही केलं जातं.

भारतातच नाही, तर भारताबाहेरील अनेक देशांत, विशेषतः दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत हाफकिनमधून लशींचे डोस पाठवले जातात. युनिसेफच्या अंतर्गत हाफकिननं 45 देशांना पोलिओ लस पुरवली होती.

अलीकडच्या काळात मुंबईतील साथ नियंत्रणात आणि रोग सर्वेक्षणात हाफकिननं योगदान दिलं आहे. 2000 साली मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरल्याची पुष्टी हाफकिननं केलं होती. इथल्या प्रयोगशाळेत बर्ड फ्लूचाही अभ्यास होतो आहे.

याआधीची भारतातली जागतिक साथ म्हणजे 2009 सालच्या स्वाईन फ्लूच्या साथीदरम्यान तपासण्यांमध्येही हाफकिनचा सहभाग होता.

आता कोरोना विषाणूच्या साथीला आळा घालण्यासाठी इथे लशींची निर्मिती केली जाणार आहे.

हाफकिनला पुन्हा उजाळा मिळेल?

एवढा गौरवशाली इतिहास असताना, कोव्हिडवरील लसनिर्मितीत हाफकिन अजून मागे का आहे, असा प्रश्न गेल्या काही महिन्यांत अनेकदा विचारला गेला. त्यातून हाफकिनमधलं एक वेगळं वास्तव पुन्हा समोर आलं.

हाफकिन इन्स्टिट्यूटकडे गेल्या काही दशकांत सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. हाफकिन संस्थेकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याचं वृत्तही अनेकदा समोर आलं आहे.

पण कोव्हिडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर हाफकिन पुन्हा चर्चेत आली आणि आता लसनिर्मितीसाठी या संस्थेचा विचार होतो आहे, याविषयी हाफकिनमधल्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

ते सांगतात,"रोगनियंत्रणात हाफकिनचं योगदान वादातीत आहे. आता केवळ लशीच्या निर्मितीपाशी न थांबता संशोधनाकडेही भर द्यायला हवा. हाफकिनला पुन्हा नवं बळ देण्याची ही चांगली संधी ठरू शकते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)