You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिड-19 महाराष्ट्रात 'विकेंड लॉकडाऊन' लागू, काय सुरू आणि काय बंद?
महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा प्रसार झपाट्याने होतोय. राज्यात शुक्रवारी (9 एप्रिल 2021) 58 हजार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण लॉकडाऊनची चाचपणी करत आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार,विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
गरज नसताना आणि वैध कामाशिवाय घराबाहेर नागरिकांनी पडू नये, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.
काय सुरू, काय बंद?
विकेंड लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंधात काय सुरु आणि काय बंद, याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने सामान्य: विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची नियमावली जारी केली आहे.
लॉकडाऊनदरम्यान काय सुरु असेल?
- अत्यावश्यक सुविधा पुरवणारी सर्व दुकानं
- राज्यातील सर्व अत्यावश्यक सेवा- मेडिकल, दुध, किराणा फळं आणि भाज्या
- कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना संसर्ग रोखण्याचे सर्व नियम पाळून सुरू राहील. नियमांचं पालन होत नसेल तर राज्य सरकारच्या परवानगीने स्थानिक प्रशासन निर्णय घेऊ शकतं
- सार्वजनिक वाहतूकीच्या दृष्टीने गॅरेज खुली
- बस, लोकल ट्रेन, टॅक्सी
- अत्यावश्यक सेवेतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी
- दारू बारमधून विकत घेता येईल. किंवा नियमांप्रमाणे होम डिलिव्हरी मागवता येईल
- रोडच्या बाजूला असलेले धाबे सुरू रहातील. पण, बसून जेवता येणार नाही. पार्सल डिलिव्हरीला परवानगी
- आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट ऑफिस सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत खुले राहातील
- स्थानिक प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे बार, रेस्टॉरंट सुरू रहातील. पण, हॉटेलमध्ये बसून जेवता येणार नाही.
- ग्राहक सोमवार ते शुक्रवार ठरलेल्या वेळात स्वत: हॉटेलमध्ये जाऊन पार्सल विकत घेऊ शकतात.
- हॉटेल, रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी संध्याकाळी 8 वाजल्यानंतरही सुरू असेल
लॉकडाऊनदरम्यान काय बंद?
- बांधकाम सामुग्रीची दुकानं
- गाड्यांच्या पार्टची दुकान बंद
- केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत धरलं जाणार नाही.
- दारूची दुकानं बंद रहातील
- इलेक्ट्रॉनिक वस्तू एसी, कूलर, फ्रीज यांच्या दुरूस्तीची दुकानं
- फोन, लॅपटॉपची दुकानं
- विकेंड किंवा सोमवार के शुक्रवार संध्याकाळी 8 नंतर ग्राहक पार्सल घेऊ शकत नाहीत
- मॉल, थिएटर्स
राज्यभरात वीकेंड लॉकडाऊनची काय स्थिती?
अमरावती - जिल्ह्यात कडक निर्बंधाला सकाळी 10 वाजेपर्यंत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमरावती शहरातील नेहमी गजबजलेल्या राजकमल चौक, ईर्व्हिंन चौक, पंचवटी, जयस्तंभ या सर्वच मुख्य चौकात नागरिकांची तुरळक गर्दी होती.
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद आहेत.
कोल्हापुरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असल्याने नागरिकांची चौकशी करून सोडले जात आहे. शहरातील दसरा चौक, कावळा नाका, मिरजकर तिकटी, बस स्थानक परिसर अशा भागात रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे. सोमवार सकाळपर्यंत कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)