You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 रुग्णांना बेड मिळण्यासाठी करावी लागतेय धावाधाव
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
महाराष्ट्रात कोव्हिड-19 ची दुसरी लाट त्सुनामीसारखी पसरतेय. कोरोना संसर्गाचा स्फोट मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसारख्या शहरी भागापुरता मर्यादीत राहिलेला नाही. राज्याच्या ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे.
देशातील 10 कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी 7 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. तर, देशातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 60 टक्के एकट्या महाराष्ट्रात आढळून येत आहेत.
कोरोना संसर्गाने विक्राळ रूप धारण केलंय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. पण, राज्यातील उपलब्ध आरोग्यसुविधा वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी पडत आहेत.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 50 हजारापार पोहोचली आहे. त्यामुळे, कोरोनाबाधितांना बेड्स मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नातेवाईकांची रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.
'आठ-नऊ तासांनी मिळाला बेड'
कोरोनाग्रस्तांच्या वाढणाऱ्या संख्येसोबत मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू झालीये. मनीष कल्याणकर, त्यांच्यापैकीच एक आहेत. गुरुवार (8 एप्रिलला) सकाळपासून मनीष वडीलांसाठी बेड मिळवण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांचे वडील 73 वर्षांचे आहेत. बोरिवलीमधील खासगी रुग्णालयं पालथी घातल्यानंतर, अखेरीस त्यांच्या वडिलांना गोरेगावच्या नेस्को कोव्हिड-19 सेंटरमध्ये बेड मिळाला.
"कालचा (गुरुवार) पूर्ण दिवस वडिलांसाठी बेड शोधण्यातच गेला. अखेरीस, तब्बल आठ-नऊ तासांनी रुग्णालयात बेड मिळाला," असं मनीष बीबीसीशी बोलताना सांगतात.
मनीष मुंबईतील बोरिवली भागात रहातात. उत्तर मुंबईतील बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी हे विभाग कोव्हिड-19 चा हॉटस्पॉट बनू लागले आहेत.
मनीष पुढे सांगतात, "गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास मुंबई महापालिकेच्या हेल्पलाईनला फोन केला. सद्यस्थितीत बेड उपलब्ध नाहीत. बेड उपलब्ध झाला की माहिती देऊ असं सांगण्यात आलं. दुपारी 3 वाजता देखील हेच उत्तर मिळालं."
बुधवारी (7 एप्रिल) मनीष यांच्या वडिलांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मधुमेहाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्याचा सल्ला दिला.
"खासगी रुग्णालयांना संपर्क केला. पण, बेड उपलब्ध नव्हते. त्यामुळे धीर धरण्याशिवाय कोणताच पर्यायच नव्हता. उशीरा का होईना, संध्याकाळी 8.30 च्या सुमारास पालिकेकडून गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये बेड उपलब्ध झाल्याचा फोन आला," असं मनीष सांगतात.
अॅम्ब्युलन्स मनीषच्या वडिलांना घेऊन रुग्णालयात गेली. पण, कोव्हिड सेंटरमध्ये तपासणीनंतर बेड मिळण्यास रात्रीचे 12 वाजल्याचं, मनीष यांचं म्हणणं आहे.
बुधवारचा दिवस आठवत मनीष म्हणतात, "टेस्ट करून घरी येतानाच, बाबा रस्त्यातच कोसळले. त्यांना खूप वीकनेस होता. काहीच खाल्लं जात नव्हतं."
मुंबईतील कोरोना बेड्सची सद्यस्थिती
मुंबईत गेल्या तीन दिवसात 29 हजारपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद झालीये. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेने अतिरिक्त बेड्सची व्यवस्था सुरू केली आहे.
मुंबई महापालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीनुसार,
- मुंबईत एकूण उपलब्ध 1,179 व्हॅन्टिलेटरपैकी फक्त 58 व्हॅन्टिलेटर रिक्त आहेत. 1,151 रुग्ण सद्यस्थितीत व्हेंन्टिलेटरवर आहेत
- ऑक्सिजन बेड्स 2005 उपलब्ध आहेत. तर, 8762 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत
- मुंबईत 2087 ICU बेड्स आहेत. त्यापैकी सद्य स्थितीत फक्त 72 बेड्स शिल्लक
- कोव्हिड रुग्णालय आणि कोव्हिड सेंटरमध्ये असलेल्या एकूण 17,491 बेड्सपैकी 3,689 रुग्णांसाठी उपलब्ध
- सौम्य आणि मध्यम रुग्णांसाठी असलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 7033 खाटा उपलब्ध आहेत
तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी व्हॅन्टिलेटर, ICU बेड्स आणि ऑक्सिजन ही पालिकेसमोर गंभीर समस्या आहे.
ट्रॅव्हल डिझाईनर विधी शहा यांनी ट्विटरवर कोरोनाग्रस्त रुग्णासाठी व्हॅन्टिलेटर हवाय अशी मागणी मुंबई महापालिकेकडे केली आहे. "गोरेगाव परिसरात ICU आणि व्हेंन्टिलेटर बेड हवा आहे. तात्काळ मदत करा," असं ट्विट त्यांनी केलंय.
बीबीसीने विधी यांच्याशी ट्विटरवर संपर्क केला. "फोन केल्यानंतर व्हेंन्टिलेटर बेड उपल्बध नाहीत असं सांगण्यात आलंय," असं विधी म्हणाल्या.
'दोन दिवस मिळत नव्हता बेड'
"सोमवारपासून बेड शोधत होतो. अखेर, मंगळवारी 6 एप्रिलला सकाळी पुण्याच्या केईएम रुग्णालयात गेलो. दिवसभर आपात्कालीन विभागात बसून होतो. संध्याकाळी मला बेड मिळाला."
बीबीबीशी फोनवर बोलताना पुण्यात राहणारा मेहुल आपला अनुभव सांगत होता. मेहुल कोरोना पॉझिटीव्ह आहे. सध्या पुण्याच्या केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
"खूप त्रास झाला बेड मिळण्यासाठी. सगळीकडे विचारणा केली. पण, कुठेच बेड उपलब्ध नव्हता. आता माझी तब्येत सुधारतेय," असं मेहुल पुढे म्हणाले.
'तात्काळ आयसीयू बेड हवाय'
पुण्यातील फिजीओथेरपीस्ट डॉ. मानसी पवार आपल्या नातेवाईकांसाठी ICU आणि व्हेंन्टिलेटर बेड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणतात, "माझी काकू आणि भावाची तब्येत गंभीर आहे. दोघंही रुग्णालयात ऑक्सिजनवर आहेत. त्यांची ऑक्सिजन लेव्हल हळूहळू कमी होतेय. डॉक्टरांनी ICU बेड शोधण्यासाठी सांगितंलय. सर्व हेल्पलाईनला फोन केला, ओळखीने प्रयत्न केलेत, महापालिकेशी संपर्क केला. पण, ICU बेड मिळत नाहीये."
डॉ मानसी यांचे काका, काकू आणि भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
"ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी खूप त्रास झाला. गुरूवारी पाच तास ऑक्सिजन बेडसाठी प्रयत्न करत होतो. हे सर्व खूप कठीण होतं," असं डॉ. मानसी पवार पुढे बोलताना म्हणाल्या.
पुण्यातील बेड्सची परिस्थिती
पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वांत जास्त अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सध्या 97,272 कोरोनाबाधित आहेत.
पुणे जिल्ह्यात गुरूवारी तब्बल 9,600 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.
पुणे महापालिकेच्या डॅशबोर्डच्या माहितीनुसार,
- पुणे शहरात सद्य स्थितीत 3,620 बेड्स उपलब्ध आहेत.
- ICU आणि व्हॅन्टिलेटरचे 62 बेड्स रिक्त आहेत.
- फक्त 315 ICU बेड्स रुग्णांसाठी उपलब्ध
- ऑक्सिजन बेड्स 1,104 रिक्त
- ऑक्सिजन सुविधा नसलेले 2,139 बेड्स उपलब्ध
'रुग्णालयात बेड मिळाला नाही, आईचा मृत्यू झाला'
मुंबई, पुण्यासारखीच परिस्थिती राज्याची उपराजधानी नागपूरची आहे. नागपुरातही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. पण, बेड्स उपलब्ध होत नाहीयेत.
भगवान कुंभार (नाव बदललेलं) त्यांच्या 82 वर्षांच्या आईसाठी बेड शोधत होते. पण, खूप प्रयत्न करूनही त्यांना बेड मिळाला नाही. त्यांच्या आईचा मृत्यू झालाय.
बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "आईला बेड हवा होता. नागपूर मेडिकल कॉलेज आणि मेयो रुग्णालयात प्रयत्न केला. पण, त्याठिकाणी बेड नसल्याचं कारण देत, दाखल करून घेतलं नाही. बेड न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)