You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप
परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पीडित महिलेसोबत पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे.
याप्रकरणी विटेकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
"माझे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. फक्त तपास सुरु असल्याचं सांगितलं जातं," अशी तक्रार संबंधित पीडित महिलेने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात, असा दावा पीडितेने केला आहे. राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे.
विटेकर यांनी आरोप फेटाळले
राजेश विटेकर यांनी संबंधित महिलेने केलेले बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत.
माझ्यावरील बलात्काराचे आरोप बिनबुडाचे असून ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने हे आरोप करण्यात आल्याची प्रतिक्रिया विटेकर यांनी दिली.
आपलं राजकारण संपवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. या संदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. विनाकारण आपल्याला या प्रकरणात गोवलं जात आहे, असंही विटेकर म्हणाले.
दरम्यान, राजेश विटेकर यांनी या प्रकरणी गंगाखेड न्यायालयात याचिका दाखल केल्याची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
कोण आहेत राजेश विटेकर?
39 वर्षीय राजेश विटेकर हे सध्या परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत परभणी येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याकडे सध्या सहकार क्षेत्रातील विविध पदे आहेत.
विटेकर हे सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत. तसंच परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकही आहेत.
2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. पण शिवसेनेचे संजय (बंडू) जाधव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत विटेकर यांना 4 लाख 96 हजार 742 मतं मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे नेते
लैंगिक अत्याचाराचा आरोप होणारे राजेश विटेकर हे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे नेते ठरले आहेत. विटेकर यांच्या आधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब शेख यांच्यावरही आधी लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. दोन्ही नेत्यांनी ते आरोप फेटाळून लावले आहेत.
धनंजय मुंडे यांनी आरोप झाल्यानंतर त्याबाबत तातडीने फेसबुक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं होतं. पुढे मुंडे यांच्या विरोधातील तक्रार संबंधित महिलेने मागे घेतली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)