बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीसुद्धा तुरुंगात गेलो होतो- नरेंद्र मोदी #5 मोठ्या बातम्या

मोदी

फोटो स्रोत, BJP

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीसुद्धा तुरुंगात गेलो होतो- नरेंद्र मोदी

'बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. त्यावेळी मी 20-22 वर्षाचा असेन. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो,' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दिनाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा असून त्यांनी बांगलादेशच्या दौऱ्यातच हे विधान केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख मुजीबूर रहमान यांना मरणोत्तर घोषित झालेला गांधी शांती पुरस्कार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे सुपुर्द केला. बांगलादेश आणि भारताचे संबंध अधिक दृढ होत आहेत. त्यामुळे मला हा पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे, असं त्यांनी म्हटलं.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

2. पुण्यात फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश

पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरातील आग काही क्षणांत पसरली.

पुणे फॅशन स्ट्रीट आग

फोटो स्रोत, BBC / Rahul Gaikwad

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

पुण्यातील फॅशन स्ट्रीट हे चहुबाजूनी इमारतीने वेढलेले आहे. या फॅशन स्ट्रीटमध्ये जाण्यासाठी छोटीशी वाट आहे. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग लागली त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे अडचणीचे होत होते. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर शेकडो नागरिकही या ठिकाणी दाखल झाले होते. यामुळे आग विझवण्याच्या कामात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचण येत होत्या. मात्र अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे खासगी क्षेत्रामध्ये संधीची त्सुनामी- मुकेश अंबानी

खासगी क्षेत्रातील उद्योगांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे देशातील उद्योजकांसाठी निरनिराळ्या क्षेत्रात संधीची त्सुनामी आल्याचं विधान रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केलं आहे. 22 व्या आंत्रेप्रिनर ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात बोलताना अंबानी यांनी भारत आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक शक्तीच्या रुपात वेगानं पुढं जात असल्याचंही म्हटलं. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

उद्योगपती- मुकेश अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुकेश अंबानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या भविष्यातील विकासामध्ये खासगी क्षेत्राच्या भूमिकेचं स्वागत करतात. दुसरं म्हणजे भारतात तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून 1.3 अब्ज भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात. याच दोन कारणांमुळे मला भारतात उद्योजकांसाठी संधीची त्सुनामी असल्याचा विश्वास आहे, असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं.

4. खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीच्या अंमलबजावणीसाठी बीएमसीचे प्रयत्न

मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी BMC प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी महापालिकेने खासगी कार्यालयांवर निर्बंध लादले आहेत. खासगी कार्यालयांमधील गर्दी 50 टक्के इतकी झाल्यास लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा कयास आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगर पालिकेची ओळख आहे.

मुंबईतील खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. आता महापालिका या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथकं तैनात करणार आहे. ही पथकं खासगी कार्यालयावर नजर ठेवतील. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

5. निवडणूक रोख्यांच्या विक्रीला स्थगिती नाही

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणूक रोख्यांच्या विक्रीला स्थागिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (26 मार्च) फेटाळली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने निवडणूक रोख्यांच्या विक्रीला स्थगिती देण्याची मागणी केली होती ती सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने फेटाळली.

विधनसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक रोख्यांची विक्री झाली तर राजकीय पक्षांना बेकायदेशीररीत्या निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होईल, अशी भीती या संस्थेने व्यक्त केली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)