You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत - 'महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय अपरिहार्यता' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय अपरिहार्यता - संजय राऊत
महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय अपरिहार्यता आहे. भाजपमुळे ही आघाडी तयार झाली. तिन्ही पक्षांची वेगवेगळी विचारसरणी आहे. पण आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीशी कधीच फारकत घेतलेली नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दैनिक भास्कर वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत बोलत आहेत.
यामध्ये संजय राऊत यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. सुशांत सिंह राजपूत, कंगना राणावत प्रकरणात भाजपचा परमबीर सिंह यांच्यावर विश्वास नव्हता. पण आता त्यांच्याच पत्रावर ते गोंधळ घालत आहेत, असं राऊत म्हणाले.
शिवाय, संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हेच करू शकतात, हीच भूमिका राऊत यांनी पुन्हा एकदा मांडली.
2. पुण्यात लॉकडाऊन करू नका, महापौर मुरलीधर मोहोळ यांची विनंती
पुण्यात लॉकडाऊन करण्याच्या मुद्द्यावर महापौर मुरलीधर मोहोळ विरोध दर्शवला आहे.
पुण्यात परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.
याबाबत प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ लॉकडाऊन न करण्याची विनंती केली.
ते म्हणाले, "सध्या तरी पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येऊ नये. निर्बंध आणखी कडक केले तर चालतील, पण लॉकडाऊन करू नका." ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
3. देवेंद्र अत्यंत अहंकारी आणि लबाड - अनिल गोटे
राज्यात एकाबाजूला राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपही प्रचंड वाढले आहेत.
दरम्यान, कधी काळी भाजपात राहिलेले आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रस्ताळेपणाकडे दुर्लक्ष करावे, ते अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत, असा आरोप अनिल गोटे यांनी केला.
मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती मी फडणवीस मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांना दिली होती. पण मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली होती, असं अनिल गोटे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.
4. UNHRC मधील श्रीलंकेविरुद्धच्या प्रस्तावादरम्यान भारत गैरहजर
संयुक्त राष्ट्र मानवाधकार परिषदेत श्रीलंकेविरुद्धच्या 'मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याच्या प्रस्तावाच्या मतदाना दरम्यान भारत गैरहजर राहिला.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 22 देशांनी या प्रस्तावाच्या बाजूने तर 11 देशांनी प्रस्तावाविरोधात मतदान केलं. भारतासह इतर 14 देश या प्रस्तावादरम्यान अनुपस्थित राहिले.
श्रीलंकेत मानवाधिकाराच्या संदर्भात भारत दोन प्रमुख मुद्दे लक्षात घेतो. पहिला मुद्दा म्हणजे, तमीळ लोकांना आमचा पाठिंबा आहे. त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. पण त्याचवेळी दुसरा मुद्दा म्हणजे श्रीलंकेची एकता अबाधित राहिली पाहिजे, असं भारताने याआधीच प्रसिद्धीपत्रक काढून म्हटलं होतं. ही बातमी बीबीसी न्यूज हिंदीने दिली आहे.
5. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर रश्मी ठाकरे यांची चाचणी केली असता त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे.
रश्मी ठाकरे या सध्या वर्षा या शासकीय निवासस्थानीच होम क्वॉरंटाईन झाल्या आहेत. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)