You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत : 'विरोधकांच्या मागणीवरून राजीनामे घ्यायचे, तर निम्मं केंद्रीय मंत्रिमंडळ रिकामं होईल' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. संजय राऊत : 'विरोधकांच्या मागणीवरून राजीनामे घ्यायचे, तर निम्मं केंद्रीय मंत्रिमंडळ रिकामं होईल'
सचिन वाझे प्रकरणावरून सध्या राज्यात तसंच राजधानी दिल्लीतही राजकीय खलबतं सुरू आहेत. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
पण विरोधकांच्या मागण्यांचा विचार करण्याची काहीएक गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
"विरोधकांकडे संख्याबळ नसतं म्हणूनच ते सत्तेत नसतात. सरकार त्यांच्या पद्धतीने काम करतं. विरोधकांच्या मागणीवरून राजीनामे घेतले तर निम्मं केंद्रीय मंत्रिमंडळ रिकामं होईल," असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
"परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याचा तपास होऊ दे. तपासातून योग्य ते बाहेर येईल," असं संजय राऊत म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
2. गुन्हे दाखल झाले तरी तुकाराम बीज साजरी करणार - बंडातात्या कराडकर
"यंदाच्या वर्षी देहू येथे कोणत्याही परिस्थितीत तुकाराम बीज साजरी करणार आहोत. गुन्हे दाखल झाले तरी त्यांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे," असं वक्तव्य वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे.
बंडातात्या सातारा येथे रविवारी (22 मार्च) एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "राज्यात कोरोनाच्या नावाखाली सरकार दहशत माजवत आहे. पुण्याची लोकसंख्या लाखांमध्ये असताना तीन-साडेतीन हजार लोकांना कोरोनाची लागण झाली म्हणजे त्यात काही विशेष नाही."
"सगळी थिएटर,ढाबे, लग्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मग वारकरी सांप्रदायातील यात्रा, उत्सव व वारीला प्रतिबंध करून, ते बंद पाडण्याचा उद्योग प्रशासनातील काही लोकांकडून का सुरू आहे. आषाढी, माघी, चैत्र वारी या सर्वांवर निर्बंध आणले गेले आहेत. त्यामुळे यंदाची 30 मार्चला होणारी देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणार, असं कराडकर यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
3. परमबीर सिंह यांनी माझं करिअर उद्धवस्त केलं, पोलीस अधिकाऱ्याचा आरोप
सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती. या प्रकरणात नाट्यमय घडामोडी आणि बैठकांचं सत्र सुरू असताना खुद्द परमबीर सिंगांवरही अशाच पद्धतीने पत्र लिहून आरोप करण्यात आले आहेत.
निलंबित पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी हे आरोप केले आहेत. त्यासंदर्भातील सविस्तर पत्र डांगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं असून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी डांगे यांनी केली आहे.
डांगे हे गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना सिंह यांच्या परिचितांवर गुन्हा दाखल करू नये, यासाठी त्यांनी दबाव टाकला होता. पण तरीही गुन्हा दाखल केल्याने डांगे यांची 4 जुलै रोजी बदली करण्यात आली. पुढे 18 जुलै 2020 मध्ये अनुप डांगे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. याप्रकरणी परमबीर सिंह यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. ही बातमी लोकमतने दिली आहे.
4. मी शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याने केंद्र सरकारकडून त्रास - अरविंद केजरीवाल
मी शेतकरी आंदोलनात आधीपासून सहभागी झालो होतो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार माझ्यासमोर समस्या निर्माण करत आहे. मला जाणुनबुजून त्रास दिला जात आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
शेतकर्यांच्या समर्थनार्थ रविवारी पंजाबमधील किसान महापंचायतीत सहभाग नोंदवल्यानंतर केलेल्या भाषणात केजरीवाल बोलत होते.
मोदी सरकार त्यांच्या सरकारकडून अधिकार हिसकावून घेण्यासाठी संसदेत विधेयक आणत आहे.शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचले तेव्हा मोदी सरकारने नऊ मैदानांना कारागृहांमध्ये बदलून तिकडे सर्व आदोलकांना डांबून ठेवण्याचा कट रचला होता, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. जास्त धान्य मिळवण्यासाठी जास्त मुलं जन्माला का घालत नाही? - तिरथसिंह रावत
उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि भाजप नेते तिरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? असा प्रश्न त्यांनी एका सभेत विचारला.
आधीच रावत यांच्या फाटक्या जिन्स आणि अमेरिकेने भारतावर राज्य केल्याच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये आता या वादाचीही भर पडली आहे.
कोरोना काळात प्रत्येक कुटुंबाला प्रति सदस्य 5 किलो धान्य मिळालं त्यानुसार ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत. त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात 2 सदस्य आहेत त्यांना केवळ 10 किलो धान्य मिळाले. त्यामुळे आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण 20 मुलांना जन्म का दिला नाही असंही तुम्हाला वाटत असेल," असं रावत म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)