ज्युलिओ रिबेरो: शरद पवारांनी ज्या माजी पोलीस अधिकाऱ्याचे नाव तपासासाठी सुचवले ते कोण आहेत?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे होमगार्डचे प्रमुख परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

हे प्रकरण गंभीर असून ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या अनुभवी माजी अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी असे पवार यांनी म्हटले.

"गृहमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहेत, या प्रकरणाची चौकशी ज्युलियो रिबेरो यांच्यामार्फत करण्यात यावी," असा पर्याय पवारांनी सुचवला.

ज्युलिओ रिबेरो यांना मुंबई पोलीस दलात मोठा मान दिला जातो. पण कोण आहेत ज्युलिओ रिबेरो? जाणून घेऊया

ज्युलिओ रिबेरो 1953 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. पोलीस खात्यात 15 वर्षं सेवा केल्यानंतर त्यांची मुंबईत पोस्टिंग झाली होती.

रिबेरो सध्या 92 वर्षांचे आहेत.

1969 च्या आसपास रिबेरो मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झाले.

मुंबई मिररच्या माजी संपादक मिनल बघेल यांच्या मुलाखतीत रिबेरो सांगतात, "मी पुण्यात पोलीस उपयुक्त होतो. त्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर माझी बदली मुंबईत झोन-3 मध्ये झाली."

मुंबईत विविध पदावर काम करणाऱ्या ज्युलिओ रिबेरो यांनी 1982 ते 1985 मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून धुरा सांभाळली होती.

त्यानंतर रिबेरो यांना पोलीस महासंचालकपद देण्यात आले. रिबेरो CRPF चे महासंचालक म्हणून दिल्लीला गेले.

मिनल बघेल यांच्या मुलाखतीत रिबेरो म्हणाले होते, "दिल्लीत पाच आठवड्यानंतर मला पंतप्रधानांचा गुजरातला जा म्हणून फोन आला."

रिबेरो यांनी गुजरातचे पोलीस महासंचालक आणि त्यानंतर पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून काम केलं.

पोलीस दलातील सेवेसाठी 1987 मध्ये रिबेरो यांचा पद्मभूषण पुरस्काराने सम्मान करण्यात आला.

मुंबईचे पोलीस आयुक्त

ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर प्रभाकर पवार सांगतात, "पोलीस दलात रिबेरो यांची डायनॅमिक अधिकारी म्हणून ओळख होती."

ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर सांगतात, "पोलीस दलात रिबेरो यांची प्रतिमा एक नॅान-करप्ट, स्पष्ट बोलणारे आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून आहे."

मुंबईतील अनेक वरिेष्ठ IPS अधिकारी रिबेरो यांना आदर्श मानतात. 1980 च्या दशकात मुंबईत गॅंगवॅार नव्हतं. पण स्मगलर्स आपले हातपाय पसरू लागले होते.

"1980 च्या दशकात रिबेरो मुंबई पोलीस आयुक्त असताना मुंबईत करीम लाला, हाजी मस्तीन यांसारख्या स्मगलर्सचं वर्चस्व होतं. यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम रिबेरो यांच्या कार्यकाळात झालं," असं प्रभाकर पवार सांगतात.

ते पुढे म्हणतात, "माटुंग्याचा भाई वरदराजन मुदलियार उर्फ वर्दाला संपवण्यात रिबेरो यांची मोठी भूमिका होती. रिबेरो यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी वरदराजन मुदलियारचं माटुंग्यातील वर्चस्व मोडून काढलं."

पंजाबमध्ये दहशतवाद मोडून काढला

पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद मोडून काढण्यात रिबेरो यांनी मोठी भूमिका बजावल्याचं ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे.

ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर प्रभाकर पवार सांगतात, "1980 च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणात फोफावला होता. रिबेरो यांनी खूप वर्षं पंजाबमध्ये काम केलं."

पंजाबमध्ये रिबेरो यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. 1986 साली पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी रिबेरो यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता.

प्रभाकर पवार सांगतात, "या हल्ल्यात रिबेरो जखमी झाले होते," पंजाब पोलिसांनी दहशतवाद्याविरोधात मोहीम उघडली होती.

"बूलेट का जवाब बूलेटसे देंगे," असं रिबेरो त्यावेळी म्हणाले होते असं पवार पुढे सांगतात.

'रिबेरो यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट शब्द आवडत नाही'

"रिबेरो यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट हा शब्द आवडत नाही," असं प्रभाकर पवार सांगतात. सचिन वाझेंच्या अटकेनंतर काही वृत्तपत्रांसाठी लिहीलेल्या ब्लॅागमध्ये रिबेरो यांनी या शब्दावर नाराजी व्यक्त केली होती.

"हा शब्द कोणी शोधून काढला आणि का?" असं रिबेरो यांनी म्हटलं होतं.

रिबेरो पुढे लिहितात, "कायदा व्यवस्था फेल झाल्यामुळे एन्काउंटर एक पर्याय बनला. हळुहळू हे एन्काउंटर स्पेशालिस्ट युनिफॅार्ममधील सरकारने संरक्षण दिलेले गु्ंड बनले,".

असे पोलीस अधिकारी एका गुंडापेक्षा जास्त खतरनाक असतात, त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं होतं.

रिबेरो-परमबीर आमने-सामने

वर्ष 2018 मध्ये ज्युलिओ रिबेरो आणि परमबीर सिंह आमने-सामने आले होते. मिड-डे वृत्तपत्राने ही बातमी दिली होती.

राज्य सरकारने 2018 मध्ये सुबोध जयसवाल यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक केली होती.

क्राइम रिपोर्टर सांगतात, "2018 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांचं नाव चर्चेत होतं. त्यावेळी रिबेरो यांनी नाव न घेता एका पत्रात काही वरिष्ठ अधिकार्यांचा बॅडकॅाप असा उल्लेख केला होता."

मिड-डे वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, परमबीर सिंह यांनी रिबेरो यांना त्यांचा उल्लेख "बॅडकॅाप" केल्याबद्दल माफी मागा असं पत्र लिहिलं होतं.

परमबीर सिंह 2018 मध्ये ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.

रिबेरो यांना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे समीक्षक मानलं जातं. केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचा रिबेरो यांनी विरोध केला आहे.

रिबेरो काय म्हणाले?

शरद पवारांच्या सूचनेनंतर एएनआयने ज्युलिओ रिबेरो यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणाची आपण चौकशी करणार नाहीत असं रिबेरो यांनी स्पष्ट केलं आहे.

"मी चौकशी करणार नाही. मला कोणी याबाबत सांगितलं नाही. त्यांनी फक्त सूचना दिलीये. माझं वयं 92 आहे. माझ्या अंगात ताकद नाहीये."

"या प्रकरणी खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे. एकेकाळी मुंबई पोलीस त्यांच्या कामासाठी जगभरात ओळखली जायची."

"मात्र काहींमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा संशयाच्या घेर्यात आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला नुकसान झालंय," असं रिबेरो म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)