IND vs ENG : रोहित शर्माकडे टी-20 कर्णधारपद देण्याच्या मागणीने पुन्हा धरला जोर

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी-20 संघाचं कर्णधारपद देण्यात यावं, अशी मागणी वारंवार होत असते.

भारताने काल (गुरुवार, 18 मार्च) इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात निसटता विजय मिळवल्यानंतर या मागणीने सोशल मीडियावर पुन्हा जोर धरल्याचं दिसून येत आहे.

भारत आणि इंग्लंडदरम्यान सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या मालिकेत भारत 2-1 ने पिछाडीवर होता.

चौथ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागून भारत ही मालिका गमावणार अशी चिन्ह होती. पण या सामन्यात भारताने विजय मिळवून 2-2 अशी बरोबरी साधली आहे.

काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाचं कर्णधारपद कोहलीकडेच होतं. शिवाय भारताने या सामन्यात विजयही मिळवला आहे, अशा स्थितीत रोहित शर्माला कर्णधारपद देण्याची मागणी का केली जात असावी, असा प्रश्न उपस्थित केला जाणं स्वाभाविक आहे.

पण या मागणीचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला काल घडलेला सगळा घटनाक्रम जाणून घ्यावा लागेल.

मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर भारताने 5 बाद 185 अशी धावसंख्या उभी केला.

नंतर फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात विशेष चांगली झाली नाही. पण मधल्या फळीतील चौकार-षटकारांची आतषबाजी करत विजय दृष्टीक्षेपात आणला होता.

दरम्यान, अखेरची तीन-चार षटके उरलेली असताना विराट कोहली दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. अशा स्थितीत उपकर्णधार रोहित शर्माकडे भारतीय संघाची सूत्रं आली.

रोहित शर्माने शांतपणे ही जबाबदारी पेलताना सुयोग्य निर्णय घेतले. त्यामुळे सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकला होता. अखेरच्या षटकात इंग्लंडला 23 धावा आवश्यक होत्या. चेंडू शार्दूल ठाकूरकडे देण्यात आला.

पहिल्या तीन चेंडूंवर चौकार-षटकारांची बरसात झाल्याने ठाकूर चांगलाच दबावात आला. त्याने पुन्हा दोन वाईड चेंडू टाकल्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली होती.

पण रोहित शर्मा ठामपणे ठाकूरच्या बाजूने उभे राहिला. त्याने त्याचं मनोबल वाढवून चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अखेर, भारताने या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला.

या विजयामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांचं चांगलंच कौतुक केलं जात आहे. रोहित शर्मालाच टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे.

रोहित शर्मा IPL मधील सर्वांत यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा IPL विजेतेपद पटकावलेलं आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

भारताने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

रोहित शर्माच्या या सेलिब्रेशनचा एक वेगळा फॅन बेस असल्याचं आर्यन नामक एका ट्वीटर खातेदाराने म्हटलंय.

या फोटोत रोहित शर्मा विराट कोहलीला कर्णधारपदाचे धडे देत आहे, असं एका व्यक्तीने म्हटलंय.

रोहित शर्मा टीम इंडियाचा उपकर्णधार असला तरी तो एक अनुभवी कर्णधार आहे, असं माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितल्याचं हिटमॅन रॉकी या अकाऊंट धारकाने म्हटलंय.

तब्बल 25 पेक्षा जास्त अधिकृत ट्वीटर खातेदारांनी रोहितला कर्णधार म्हणून पसंती दिली, असं संजू यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)