You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महानगर पालिका निवडणुंकावर कोरोनाचं सावट येईल का?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या पाच महापालिकांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होणार असल्याची चर्चा होती. यासाठी राजकीय नेत्यांचा प्रचारही सुरू झाला होता.
दोन दिवस आधीपर्यंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली क्षेत्रात राजकीय मेळावे पार पडले.
औरंगाबाद आणि वसई विरारमध्येही प्रचाराचा धुरळा सुरू होता. पण वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे आदेश दिले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम काही दिवसांसाठी रद्द केले.
त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या प्रचारालाही ब्रेक लागल्याचं चित्र आहे. आता महापालिका निवडणुका कधी होणार? कोरोनाच्या संकटामुळे निवडणूका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे का? त्यामुळे राजकीय पक्षांची कोंडी होतेय का? याबाबतचा हा आढावा...
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोरोना वाढला?
जानेवारी महिन्यात 14,234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाचं ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. लोकांची गर्दी वाढली.
यामुळे ग्रामीण भागात कोरोना प्रसार वाढल्याची शक्यता राज्याच्या आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "ग्रामपंचायत निवडणुकीत अधिकाधिक लोक घराबाहेर पडले. मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. राजकीय मिरवणुका निघाल्या."
"या निवडणुकांवेळी शहरातील लोकंही मतदानासाठी गावाकडे जातात. यामुळे लोकांची जास्तीत जास्त सरमिसळ ग्रामपंचायत निवडणुकीवेळी झाली. ग्रामीण भागात कोरोना वाढण्याचं हे सुध्दा एक कारण असू शकतं असं आम्हाला वाटतं," आवटे सांगतात.
कोरोना वाढण्याचं हे एकमेव कारण नाही असंही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पण लॉकडाऊननंतर ग्रामपंचायत निवडणुकीवेळी लोकांचा संपर्क वाढला, घरातून ते बाहेर पडले.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या लक्षणं नसलेल्या रूग्णांशी इतर लोकांचा संपर्क आल्यानंतर कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता तपासली जातेय. जर ग्रामपंचायत निवडणुकीत हे चित्र असू शकेल तर महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर होणार्या प्रचाराबाबत कल्पना करता येईल.
निवडणुका पुढे जाणार?
औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार या महापालिकांची मुदत संपून 8 ते 10 महिने उलटले. कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपली आहे. कोरोनाच्या संकटामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. बर्याच महिन्यांनंतर या निवडणुका होणार असं सांगितलं जात असताना कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिल्याची माहिती आहे. राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्याआधी सरकारशी चर्चा करावी अशी विनंती केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितली. निवडणुकीच्या 45 दिवस आधी मतदानाच्या तारखा जाहीर केल्या जातात.
अजूनपर्यंत कोणत्याही महापालिका निवडणूकीची तारीख जाहीर केलेली नाही. ज्याअर्थी प्रचाराला सुरवात झाली होती त्याअर्थी ही निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूका लांबणीवर पडणार का? याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा केली. पण अद्याप निवडणूकीच्या तारखांबाबत कोणतीही चर्चा नसल्याचं सांगण्यात आलं.
आगामी महापालिका निवडणुकांचं चित्र..!
कोल्हापूर महापालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आता महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेची साथ या दोन्ही पक्षांना मिळू शकते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महापालिकेच्या प्रचारात जोर लावला आहे. कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजतोय. नामांतरावरून कॉंग्रेस विरूद्ध शिवसेना हा सामना बघायला मिळतोय. सध्या औरंगाबाद महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे. पण शिवसेनेची आक्रमकता बघता शिवसेना औरंगाबादची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपचं वर्चस्व आहे. कल्याण - डोंबिवली हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. जर महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादीशी युती केली तर कॉंग्रेस राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो पण शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजप आणि मनसे ही कल्याण डोंबिवलीपुरती युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे भूमिका मांडलेली नाही.
नवी मुंबई महापालिकेत दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता चुरशीची लढाई आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही महापालिका परत मिळवण्यासाठी प्रचाराचा जोर लावला आहे. नवी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची युती होऊ शकते.
वसई - विरार महापालिकेत मागची अनेक वर्षे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. महाविकास आघाडीपैकी शिवसेनेचं काहीसं अस्तित्व या महापालिकेत आहे. महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत होऊ शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)