कोरोना अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

    • Author, मयांक भागवत, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अमरावती जिल्ह्यात झपाट्याने पसरू लागलेल्या कोरोना संसर्गाचा फटका राज्यातील मंत्र्यांनाही बसू लागलाय.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालीय. बच्चू कडू यांनी शुक्रवारी (19 फेब्रुवारी) ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विटरवर लिहिलंय, "माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी."

राज्यमंत्री बच्चू कडूंची तपासणी करणारे अमरावतीचे जनरल फिजीशिअन डॉ. प्रफुल्ल कडू सांगतात, "सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी रिस्क कायम आहे. त्यांच्यासाठी हा आजार गंभीर आहे. आधी झालेल्या आजारामुळे रोगप्रतिकारशक्ती तयार झाली असेल, तरी, व्हायरस हल्ला करू शकतो."

"बच्चू कडू आयसोलेशनमध्ये आहेत. रक्ततपासणीचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. घाबरायचं कारण नाही. पण, त्यांना आता काळजी घेणं गरजेचं आहे. सोशल कॉन्टॅक्टमध्ये असताना मास्क नेहमी घालायला हवा. बच्चू कडू यांच्यामागे खूप लोक असतात. यात काही असिप्टोमॅटीस असू शकतात," असं डॉ. कडू पुढे म्हणतात.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अमरावतीच्या अचलपूर भागात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारने हे विभाग कंटनमेंट झोन जाहीर करून, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

दुसऱ्यांदा कोरोनासंसर्ग होण्याची कारणं?

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा संसर्ग का होतो, यावर इंग्लंडच्या किंग्ज कॉलेजमधील शास्त्रज्ञांनी अभ्यास केला.

संशोधकांच्या लक्षात आलं की, संसर्ग झाल्यानंतर साधारण 10 दिवसात अन्टीबॉडी तयार होतात. पण, काही महिन्यांनी अन्टीबॉडीजची संख्या हळूहळू कमी होऊ लागते.

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशिअन डॉ. गौतम भन्साळी म्हणतात, "दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होणं फार दुर्मिळ आहे. याचं प्रमाण खूप कमी आहे. दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचं प्रमुख कारण म्हणजे, कमी असलेली रोगप्रतिकारशक्ती."

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तुम्ही जितके जास्त आजारी, तितकं तुमचं शरीर जास्त रोगप्रतिकारशक्ती तयार करतं.

  • शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होणं
  • कोरोनामुक्त झाल्यानंतर मास्क न घालणं किंवा गर्दीत मिसळणं
  • स्वच्छता न पाळणं

या तीन कारणांमुळे दुसऱ्यांदा संसर्ग होऊ शकतो.

मुंबईतील फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. कपिल राठी यांनी दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण पाहिले आहेत. ते सांगतात, "कोरोनाचा संसर्ग होऊन गेला म्हणजे असं नाही की तुम्हाला आयुष्यभराकरता संरक्षण मिळालं."

"कोव्हिडमुक्त झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होऊ शकतो. याचं कारण, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं. संशोधनातून समोर आलंय की रोगप्रतिकारशक्ती 3 ते 6 महिने टिकते. त्यानंतर पुन्हा इंन्फेक्शन होऊ शकतं," असं डॉ. राठी सांगतात.

मुंबईतील डॉक्टरांना झाला होता दुसऱ्यांदा कोव्हिड-19 संसर्ग

सप्टेंबर 2020 मध्ये मुंबई महापालिकेच्या नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना कोव्हिड-19 चा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचं आढळून आलं.

एक-दीड महिन्यापूर्वी संसर्ग होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना झाल्याचं निदान झालं.

"डॉक्टरांना दुसऱ्या वेळी कोरोनाची तीव्र लक्षणं नव्हती. उपचारानंतर डॉक्टरांनी पुन्हा ड्युटी सुरू केली," अशी माहिती निवासी डॉक्टरांची संघटना मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना दिली होती.

तर ऑक्टोबर महिन्यात पत्रकारांशी बोलताना इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी, भारतात दुसऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याच्या तीन घटनांना दुजोरा दिला होता.

जगभरात समोर आलेल्या घटना

कोरोना व्हायरसचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याची प्रकरणं फार दुर्मिळ आहेत.

24 ऑगस्ट 2020 ला हॉंगकॉंगमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाली होती. ज्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या संसर्गावेळी व्हायरस पूर्ण वेगळा असल्याचं समोर आलं होतं.

जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला होता.

जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल हेड डॉ. मारिया व्हॅन काराकोव्ह डिसेंबरमध्ये म्हणाल्या होत्या, "हॉंगकॉंगमध्ये असं प्रकरण समोर आलं आहे. अशा गोष्टी दुर्मिळ आहेत. पण, कोरोनाचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो."

त्यानंतर बेल्जियम, नेदरलॅंड आणि अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग दुसऱ्यांदा झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पण, दुसऱ्यांदा झालेला संसर्गाची तीव्रता पहिल्या संसर्गापेक्षा जास्त गंभीर नव्हती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)