उन्नाव: शेतात बेशुद्धावस्थेत आढळल्या तीन मुली, दोघींचा मृत्यू

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका शेतात कापडाने बांधलेल्या तीन किशोरवयीन मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यातल्या दोघींचा मृत्यू झाला आहे तर तिसरी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

उन्नावचे पोलीस अधीक्षक सुरेशराव कुलकर्णी यांनी बीबीसीला सांगितलं, "असोहा पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली आहे. तीन मुली त्यांच्याच शेतात बेशुद्धावस्थेत आढळल्या. तिघींचेही हात बांधले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. तिथे दोघींचा मृत्यू झाला. एकीवर उपचार सुरू आहे."

अधिक माहिती देताना ते म्हणाले, "प्राथमिक माहितीनुसार या तिन्ही मुली शेतात गवत कापायला गेल्या होत्या. तिघींना विष देण्यात आलं असावं, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी फेसही आढळून आला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे."

आतापर्यंतचा तपास

असोहा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बबुरहा गावातली ही घटना आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा एका शेतात या तीन किशोरवयीन मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या.

या गावातल्या तीन मुली बुधवारी दुपारी गुराढोरांसाठी चारा आणायला शेतात गेल्या होत्या. संध्याकाळी उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरू झाला. तिघीही गावातल्याच एका शेतात बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

यातल्या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. तर एक चुलत बहीण होती.

दोन सख्ख्या बहिणींचा भाऊ विशाल याने कानपूरचे स्थानिक पत्रकार रवी यांना सांगितलं, "तिघी बहिणी चारा आणण्यासठी शेतात गेल्या होत्या. पण संध्याकाळ होऊनही घरी परतल्या नाही. तेव्हा आम्ही त्यांना शोधायला बाहेर पडलो. तिघी एका शेतात बेशुद्धावस्थेत आढळल्या. तिघींचे हात बांधले होते. त्यातल्या दोघी माझ्या सख्ख्या बहिणी आहेत. तर तिसरी काकांची मुलगी आहे. आमचं गावात कुणाशीच भांडण नाही."

उन्नाव जिल्हा हॉस्पिटलमधले सीएमएस डॉक्टर बीबी भट्ट यांनी उपचार सुरू असलेल्या तिसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं, असं पत्रकार रवी यांचं म्हणणं आहे.

या तिसऱ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं तेव्हा तिच्या तोंडातून फेस येत होता. किटकनाशक प्यायल्याने असं झालं असावं, असा अंदाज डॉ. भट्ट यांनी व्यक्त केला.

या मुलींनी स्वतःच विषारी पदार्थ प्राशन केला की कुणी बळजबरीने दिला, याचा तपास सुरू आहे.

प्रत्येक अँगल तपासला जाईल, असं पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितलं. घटनेनंतर उन्नावचे डीएम आणि एसपीसह अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी हेच उन्नाव चर्चेत होतं. या गावातल्या एका तरुण मुलीवर कथित अमानुष बलात्कार करण्यात आला. यात तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलीचं पार्थिव तिच्या आई-वडिलांना सुपूर्द न करताच परस्पर अंत्यसंस्कार केले होते.

या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. त्या प्रकरणाचा तपास अजून सुरूच आहे. तो तपास पूर्ण होतो न होतो तोच तीन मुलींच्या या घटनेमुळे उन्नाव पुन्हा एकदा हादरलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)