You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी, कोणाविरुद्ध केली तक्रार? #5मोठ्याबातम्या
आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. अॅसिड हल्ला धमकीप्रकरणी नवनीत राणा यांचा कोणावर आरोप?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी राणा यांनी नवी दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवरून पाठवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नवनीत राणा यांनी 8 फेब्रुवारीला संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणाचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. या भाषणादरम्यान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील नॉर्स एव्हेन्यू पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या नवनीत राणा यांच्या घरी हे धमकीचं निनावी पत्र आलं आहे.
या पत्रात चेहऱ्यावर अॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. या पत्रात आमदार रवी राणा यांचाही उल्लेख असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
या पत्रावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. मात्र कोणाचाही नाव किंवा पत्ता नाहीय. सच्चा शिवसैनिक असं या पत्राखाली लिहिलेलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
2. पूजा चव्हाण प्रकरणी महिला आयोगाने मागवला तपास अहवाल
गेल्या आठवड्यात पुणे येथे घडलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपनं शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. एकीकडे याप्रकरणी राज्यात भाजप आक्रमक असताना आता राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतलीये.
पूजा चव्हाण प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे आदेश महिला आयोगाने पुणे पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांचं तपास सुरू असून आता त्यांनी तपासाला वेग दिल्याचं सांगितलं जात आहे. ही बातमी लोकमतने दिली.
3. राज्यात लॉकडाऊन नाही, पण नियमांची कठोर अंमलबजावणी - राजेश टोपे
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा काही प्रमाणात वाढत आहे. आता राज्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्या दृष्टीने अंमलबजावणी करावी, असंही राजेश टोपे म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
4. भाजप फक्त पैसे मागण्यासाठी रस्त्यावर - उद्धव ठाकरे
'रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहचत आहेत. पण पैसे मागण्यासाठी, आपल्याला तसं करायचं नाहीय. माझ्यापर्यंत तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. बाबरी मशीद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत,' अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
'वर्षा' बंगल्यावर आयोजित शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. या बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार, जिल्हाप्रमुख उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश आणि आता आागामी महापालिका निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
'दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेनं निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल,' असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
5. मोदी सरकारने 20 लाख कोटी रुपयांची लूट केली- काँग्रेसची टीका
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार देशातील फक्त दोन उद्योजकांसाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
देशातील नागरिक अबकारी कराच्या रुपात 'मोदी टॅक्स' भरत असल्याचं सांगत हा टॅक्स हटवण्याची मागणी काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मंगळवारी (16 फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत केली.
"मोदी सरकारने अबकारी कर कमी केला तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर 61 रुपये 92 पैसे तर डिझेलचा दर प्रतिलीटर 47 रुपये 51 पैसे इतका होईल. इंधनांच्या किंमतीतून देशाचे 20 लाख कोटी रुपये लुटले. हे 20 लाख कोटी कुठे गेले? कोणत्याही क्षेत्रात ते दिसले नाहीत. आपल्या काही मित्रांना फायदा व्हावा, यासाठी हा केलेला गुन्हेगारी कट होता असं म्हणू शकतो का?" असा सवाल पवन खेरा यांनी केला. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
हे ही वाचलात का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)