You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किरण बेदी यांना पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदावरून काढलं
किरण बेदी यांना पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून काढण्यात आलं आहे. तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांच्याकडे पुदुचेरीचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.
किरण बेदी या देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या. 1972 साली पोलीस सेवेत दाखल झालेल्या किरण बेदी यांनी 2007 साली सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय वर्तुळातही प्रवेश केला.
राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या सोबत राहिलेल्या किरण बेदी या पुढे भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलं होतं.
सार्वजनिक आयुष्यातील प्रवेश
पोलीस सेवेतून बाहेर पडल्यानंतर किरण बेदी यांनी 2007 साली नवज्योती दिल्ली पोलीस फाऊंडेशनची स्थापना केली. पुढे या संघटनेचं नाव नवज्योती इंडिया फाऊंडेशन असं करण्यात आलं. या संघटनेच्या स्थापनेत त्यांच्यासोबत आणखी काही सहकारीही होते.
त्यानंतर किरण बेदी विविध संघटना, संस्था, मोहिमांच्या माध्यमातून सार्वजनिक आयुष्यात सक्रीय होत गेल्या. त्यापूर्वी 1994 साली त्यांनी इंडिया व्हिजन फाऊंडेशनही स्थापन केलं होतं. मात्र, ही संघटना पोलीस, तुरुंग, महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण विकास अशा पुरतीच मर्यादित होती.
अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभाग
2011-12 च्या सुमारास दिल्लीतील जंतर-मंतर मैदाननात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातही किरण बेदी यांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर किरण बेदी यांच्याभोवतीचं वलय आणखी वाढलं होतं.
अरविंद केजरीवाल यांच्या सहकारी म्हणून लोकांसमोर जात असतानाच, किरण बेदी यांननी आपल्या राजकारणाची दिशा बदलली आणि त्या भाजपच्या आडोशाला गेल्या. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत किरण बेदी यांनी उघडपणे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला.
त्यानंतर 2015 साली पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत किरण बेदी यांनी भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर उभ्या ठाकल्या. मात्र, या निवडणुकीत त्यांचेच जुने सहकारी अरविंद केजरीवाल यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. आम आदमी पक्षाचे एस. के. बग्गा यांनी किरण बेदी यांचा जवळपास दोन हजार मतांनी पराभव केला होता.
थेट नायब राज्यपालपदी
मात्र, त्यानंतर भाजपनं किरण बेदी यांना बाजूला केलं नाही. मे 2016 मध्ये किरण बेदी यांची पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली.
सर्वसामान्य लोकांसाठी पुदुचेरीच्या नायब राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राज निवासाचे दरवाजे सर्वसामान्य लोकांसाठी उघडून किरण बेदी या पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. हे निवास सर्वसामान्यांसाठी असल्याचं ते कायम म्हणत राहिल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)