You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वसीम जाफरवरचे धार्मिक भेदभावाचे आरोप आणि क्रिकेटपटूंच्या मौनाचा अर्थ
- Author, विजय लोकापल्ली
- Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
वसीम जाफरवर झालेल्या धार्मिक भेदभावांच्या आरोपांवर क्रिकेट जगतातून अगदी मोजक्याच प्रतिक्रिया उमटल्या. याचा अर्थ काय?
सगळ्यात आधी पाहूयात की भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याच्यावर ड्रेसिंग रूममध्ये धर्मभेदाचा आरोप कोणी केलाय?
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने आतापर्यंत या प्रकरणामध्ये परस्परविरोधी विधानं केलेली आहेत. पण हे प्रकरण धार्मिक भेदाचं असू शकत नसल्याचं एका अधिकाऱ्याने मला सांगितलं.
खरं पाहिलं तर खेळाच्या जगात धर्म हा आतापर्यंत कधीही वादाचा मुद्दा ठरलेला नाही.
1967मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन मन्सूर अली खान पतौडी यांनी संघातल्या खेळाडूंमध्ये चांगलं नातं निर्माण केलं होतं.
पतौडींच्या या कारकीर्दीबद्दल बोलताना भारताचे माजी कॅप्टन आणि स्पिनर बिशन सिंह बेदी सांगतात, "त्यांनी आम्हाला भारतीय असणं म्हणजे काय, ते शिकवलं. टीम म्हणून आपण सगळे एक असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं."
असा इतिहास असताना वसीम जाफरला स्वतःची बाजू मांडायला लागणं, धक्कादायक आहे.
टीमची निवड करताना तथाकथितरित्या धार्मिक भेदभाव केल्याचा आणि शुक्रवारच्या नमाजसाठी मौलवींना ड्रेसिंग रूममध्ये बोलवण्याचा आरोप वसीम जाफरवर करण्यात आलाय. पण यातले धर्मभेदाचे आरोप फेटाळत हे क्रिकेटशी निगडीत प्रकरण असल्याचं उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव माहिम वर्मा यांनी म्हटलंय.
या आरोपांनी व्यथित झालेल्या जाफर यांनी उत्तराखंडच्या टीमच्या प्रमुख कोचपदाचा राजीनामा देणं, यात आश्चर्याची बाब नाही. मुश्ताक अली टूर्नामेंटमध्ये या टीमची कामगिरी चांगली झाली नव्हती.
वसीम जाफरवर झालेले आरोप आणि मौन
जाफर यांच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणाची चर्चा व्हायला लागली. पण त्यानंतर क्रिकेट जगात काय प्रतिक्रिया उमटली? अगदी किरकोळ प्रतिक्रिया समोर आल्या.
भारतीय टीमच्या प्रशिक्षक पदावरून अनिल कुंबळेंना हटवण्यात आल्यानंतरही हेच पहायला मिळालं होतं. तेव्हाही क्रिकेटमधल्या दिग्गजांनी मौन बाळगलं होतं.
जाफरच्या बाजूने सगळ्यात आधी उभे राहणाऱ्यांमध्ये अनिल कुंबळे होते. कदाचित, एकटं पडणं आणि ज्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केली त्यांच्याकडून निराशा होणं याचा वसीम जाफर यांना होत असलेला त्रास ते सगळ्यात जास्त समजू शकत होते.
खिलाडू वत्ती दाखवत मोठ्या मनाने अनिल कुंबळेंनी ट्वीट केलं, "वसीम मी तुझ्यासोबत आहे. तू योग्य केलंय. दुर्दैव हे की या खेळाडूंना तुझं मार्गदर्शन मिळणार नाही."
एखाद्या खेळाडूला ज्याप्रमाणे ज्येष्ठांचा पाठिंबा मिळणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे हे होतं. खेळाच्या जगातल्या दिग्गजांनी सोशल मीडियावरून कशाप्रकारे जाफरला पाठिंबा देणं टाळलं, हे आपण पाहतोच आहोत. पण ज्या लोकांनी जाफरला पाठिंबा दिलाय, त्यांचं कौतुकही केलं जातंय.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनने जाफरला पाठिंबा दिलाय. याशिवाय मुंबई टीममध्ये त्याच्यासोबत खेळलेले चंद्रकांत पंडित, अमोल मुझुमदार, शिशिर हट्टंगडी, अविष्कार साळवी, शेल्डन जॅक्सन, फैज फजल, मोहम्मद कैफ, नयन दोषी, निशित शेट्टी यांनीही जाफरला पाठिंबा दिलाय.
झिंबाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यानेही जाफरचा धीर वाढवणारा संदेश पाठवलाय.
मौन बाळगण्यामागचं कारण काय?
सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग हे मोठ्या क्रिकेटर्सच्या मौनामागचं एक कारण असू शकतं.
पण टीमच्या ड्रेसिंग रूममधल्या बायो बबलचं उल्लंघन करत मौलवींना बोलवण्याबद्दल टीमचे खेळाडू इक्बाल अब्दुल्लांचं म्हणणंही ऐकून घ्यायला हवं.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने जे सांगितलेलं नाही, ते इक्बाल अब्दुल्लांनी सांगितलंय.
इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राशी बोलताना अब्दुल्लांनी सांगितलं, "आम्ही शुक्रवारचा नमाज मौलवींशिवाय पढत नाही. आमचा सराव दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पूर्ण होणार होता आणि त्यानंतरच आम्ही नमाज पढत असू. मौलवींना बोलवू शकतो का, हे मीच सगळ्यात आधी वसीम भाईंना विचारलं होतं.
त्यांनी मला टीम मॅनेजरची परवानगी घ्यायला सांगितली. मी टीम मॅनेजर नवनीत मिश्रांशी बोललो. ते म्हणाले,'काही हरकत नाही इक्बाल, प्रार्थना धर्म आधी व्हायला हवा.' त्यांनी मला परवानगी दिली आणि यानंतरच मी नमाज पढण्यासाठी मौलवींना बोलवलं."
खेळ हा धर्मापेक्षा महत्त्वाचा असल्याचं इक्बाल अब्दुल्लाच्या बोलण्यावरून दिसतं. पण खेळामधला भेदभाव हा दुसऱ्या प्रकारे दिसून येतो, हेही तितकंच खरं आहे.
धर्मभेदापासून दूर असणारं क्रीडा जगत
धर्मभेदाला खेळाच्या जगात स्थान नाही. 1993च्या दंगलींदरम्यान सुनील गावस्कर यांनी भडकलेल्या जमावामध्ये घुसत अडकलेल्या एका कुटुंबाची सुटका केली होती, हे आपण लक्षात ठेवायला हवं.
खेळाच्या जगामध्ये जफर इक्बालसारखे प्रसिद्ध हॉकी ऑलिम्पिक खेळाडूही आहेत ज्यांचा कोणत्याही सणाच्या वेळी सगळ्यात आधी संदेश येतो. तेच नाही तर मोहम्मद अझरुद्दीन, वसीम जाफर, फैज फजल, ओबेद कमाल आणि मोहम्मद कैफ यांचेही संदेश येतात.
जफर इक्बाल यांना तर भगवद्गीता आणि ऋग्वेदांचीही माहिती आहे. त्याचप्रमाण बिशन सिंह बेदी यांनाही सगळ्या धर्मांच्या ग्रंथांची जाण आहे.
वाराणसीमध्ये जन्मलेल्या मोहम्मद शाहीद यांच्यासारख्या हॉकीच्या जादूगाराला कोणी कसं विसरेल? खेळ आणि व्यक्तिमत्त्वामध्ये जे जे काही चांगलं असू शकतं, ते सगळं मोहम्मद शाहिद यांच्याकडे होतं.
त्यांनी पाकिस्तान विरुद्ध खेळताना कशाप्रकारे सर्वोत्तम कामगिरी केली होती, ते आपण पाहिलंय. यामागे काही खास कारण नव्हतं. पण ते पाकिस्तानी टीमला आपल्या तोडीची मान होते आणि आपल्या कौशल्याने त्यांना हरवण्यात त्यांना आनंद मिळायचा.
मोहम्मद कैफनी सांगितलं होतं, "क्रिकेट खेळताना मला कधीही माझ्या धर्माची आठवण करून देण्यात आली नाही." हेच सत्य आहे.
क्रीडा पत्रकारितेच्या माझ्या करियरमध्ये मला अनेक मोठ्या खेळाडूंना भेटायची संधी मिळाली. हे सगळे जण क्षूद्र राजकारण आणि जातीयता याच्या पलिकडचे होते.
रमजानच्या महिन्यात आपण मुसलमान मित्रांसमोर पाणीही पिणं टाळतो. खेळाच्या मैदानातलं बंधुत्वं हे नावाजलं जातं. खेळाडूंनी एकमेकांना साथ दिल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत.
सध्याच्या काळात सोशल मीडियावरून लोक लवकर निष्कर्ष काढून मोकळे होतात, पण दरवेळी हे सत्य नसतं. म्हणूनच समाजावर प्रभाव पाडणाऱ्या, जागरूकता निर्माण करू शकतील अशी प्रतिमा असणाऱ्या खेळाडूंनी त्यांचं मत मांडणं गरजेचं आहे.
सार्वजनिक पातळीवर आपले वैयक्तिक विचार मांडायचे का, हा प्रत्येकाचा निर्णय असू शकतो. एखाद्याची बाजू घेण्यासाठी कोणालाही भाग पाडता येत नाही.
पण जर तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवला असेल तर त्यांच्यासोबत उभे राहिल्याने मदत होते. आणि खेदाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त गरज असताना वसीम जाफरला ही मदत कोणाकडूनही मिळाली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)