You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीत तमाशा सुरू- पाशा पटेल #5मोठ्या बातम्या
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू- पाशा पटेल
नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळालं आहे. आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे. पाशा पटेल यांनी यावेळी शरद पवार कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते?
अशी विचारणादेखील केली आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानीत आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू असून तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळलं नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावावरून तमाशा करण्यात रस आहे," अशी टीका पाशा पटेल यांनी केली आहे.
पाशा पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकेची तोफ डागली. "शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेत. राज्यसभेमध्ये शेतकरी कायद्यांवर चर्चा सुरू होती त्यावेळी शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते?," असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
2. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये अख्खं गाव वसवलं - औवेसी
चीनने भारताच्या सीमेत घुसून अरुणाचल प्रदेशमध्ये अख्खं गाव वसवलंय तरीही मोदींकडे ते चीनने केल्याचं सांगण्यासाठी धाडस नाहीये, असा गंभीर आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला. मोदी सरकारने भारत-चीन सीमेवर चीनने हत्या केलेल्या 20 जवानांचं हौतात्म्य देखील वाया घालवल्याचाही आरोप केला आहे. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "भारत-चीन सीमेवर चीनने आपल्या 20 जवानांची हत्या केली. मात्र, मोदी सरकार या जवानांचं हौतात्म्य वाया घालवत आहे. भारत अजूनही PP4-PP8 या भागात टेहाळणी करु शकत नाहीये. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एक संपूर्ण गावचं वसवलं आहे. मात्र, हे तुम्हीच केलंय हे चीनला सांगण्याचं सरकारकडे धाडस नाहीये."
3. 'श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लामध्ये फरक करता येणार नाही'
भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत तसंच अल्ला आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल असं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी सांगितलं.
"प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे राम आहेत. जर ते संपूर्ण जगाचे राम आहेत तर ते आपल्या सर्वांचे राम आहेत. कुराण फक्त आमचं नाही, सर्वांचे आहे. जर तुम्ही कोणती चूक केली असेल तर आम्ही ती बरोबर करू आणि आम्ही काही चूक केली तर ती तुम्ही बरोबर कराल. असाच देश चालतो", असं अब्दुल्ला म्हणाले. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
"मला पाकिस्तानी, खलिस्तानी म्हणता. मला भारतातच जगायचं आहे आणि भारतातच मरायचं आहे. मी कोणालाही घाबरत नाही. आम्ही तुम्हाला कधी शत्रू मानलं नाही. राज्याला जोडण्याचं आणि तेथील लोकांचं हृदय जिंकण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे", असं त्यांनी सांगितलं.
4. अमरावतीत लस घेतल्यानंतरही 19 जणांना कोरोना
अमरावतीत लस घेतल्यानंतरही तब्बल 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या माहितीवर आरोग्य यंत्रणेकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
कोरोनाविरोधातील लढाईत अग्रभागी असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत अमरावतीतही 10 हजार 874 जणांना या लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
महिनाभरानंतर या सर्वांना कोरोना लशीचा दुसरा डोसही देण्यात येण्यार आहे. मात्र त्याआधीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लस घेतलेले 19 जण आता कोरोनाबाधित आढळले आहेत. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात अॅण्टीबॉडी तयार होतात. मात्र ही लस घेतल्यानंतरही एक ते दीड महिना कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे तोपर्यंत कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
5. आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो- छगन भुजबळ
आंदोलनजीवी अशा पद्धतीने हिणवणं योग्य नाही. लहानसहान गोष्टींवर भाजप आंदोलन करत आहे. त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो अशी टीका राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना आंदोलनजीवी ही नवी जमात तयार झाल्याचं म्हटलं होतं. आंदोलन कुठलंही असो ही माणसं तिथे असतात असं पंतप्रधान म्हणाले होते. 'सामना'ने ही बातमी दिली आहे.
आंदोलनं जगभर होत आहेत. या देशाला आंदोलनं नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हतं तेव्हा रोज काही ना काही असायचं. कुठे बांगड्य़ा घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा असं त्यांनी केलं होतं.
लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचं असतं. याव्यतिरिक्त आणखी काय करणार असा सवाल भुजबळ यांनी केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)