उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

रामपूर सहसवान घराण्यातील शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं आहे.

त्यांची सून नम्रता गुप्ता खान यांनी बीबीसीला सांगितलं की, उस्ताद गुलाम मुस्तफा यांचं निधन रविवारी (17 जानेवारी) दुपारी 1.47 वाजता झालं.

त्यांनी सांगितलं की, "उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 2019मध्ये ब्रेन स्ट्रोक झाला होता. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. त्यांनी मुंबईतल्या कार्टर रोडवरील घरातच आयसीयूचं सेटअप केलं होतं. तेव्हापासूनचं त्यांना अर्धांगवायू झाला होता आणि त्यांना बोलताही येत नव्हतं."

नम्रता यांनी इन्स्टाग्रावर याविषयी लिहिलं, "काही क्षणांपूर्वी माझे सासरे आणि पद्म विभूषण पुरस्कार विजेते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन झालं."

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये पद्म भूषण आणि 2018 मध्ये पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2003 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारनं गौरवण्यात आलं.

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं, "मला आताच बातमी समजली की महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. हे ऐकून मला खूप दु:ख झालं आहे. ते गायक तसंच माणूस म्हणूनही खूप चांगले होते."

त्यांनी पुढे लिहिलं, "माझ्या भाचीनं खान साहेबांकडून संगीताचे धडे गिरवले. मीसुद्धा त्यांच्याकडू थोडं संगीत शिकले. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे."

सरोद उस्ताद अमजद अली खान यांनी ट्वीट केलं, "उस्ताद गुलाम मुस्तफा यांच्या निधनानं दु:ख झालं. ते एक प्रतिष्ठित गायक होते. ते नेहमीच आमच्या हृदयात राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो."

ए.आर. रहमान यांनी लिहिलं, "सगळ्यांचे आवडते शिक्षक...तुम्हाला दुसऱ्या जगात एक विशेष असं स्थान मिळो."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)