भंडारा आग : उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबीयांना काय आश्वासन दिलं?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल तसंच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

उद्धव ठाकरे यांनी आज (10 जानेवारी) भंडारा येथील रुग्णालयाला भेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी पीडित दाम्पत्य विश्वनाथ बेहेर आणि दीपा बेहेरे यांची भेट घेतली.

"आगीप्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली असून यात मुंबईचे विभागीय आयुक्त आणि मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी.एस.रहांगडले यांनाही सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

आधी अहवाल देऊनही परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे का? याचीही चौकशी होईल. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत," अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

भंडारा आगप्रकरणात मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी (9 जानेवारी) मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली होती. यात 10 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अतिदक्षता कक्षात एकूण 17 बालकं होती. यापैकी 7 जणांना वाचवण्यात यश आले.

"भंडाऱ्यातील घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीची चौकशी पूर्ण झाल्यावर रिपोर्टच्या आधारे दोषींवर कारवाई करू. राज्यातील सर्व रुग्णाललयात फायर ऑडिट, स्ट्रक्टरल ऑडिट केलं जाईल," अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आलं. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितलं असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले.

त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं.

या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली 7 बालकं वाचवण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)