You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश दलित मारहाण : गावगुंडांच्या मारहाणीनंतर दलित तरुणाची आत्महत्या
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात कथित गावगुंडांनी दलिता तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीनं जखमी झालेल्या या दलित तरुणानं आत्महत्या केली.
पीडित तरुणाच्या बकऱ्यांनी आरोपींच्या आंब्याच्या झाडांची पानं खाल्ली होती. पोलिसांनी गावातल्याच तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपांना अटक केली आहे.
फतेहपूरचे पोलीस अधीक्षक सतपाल अंतिल यांनी सांगितलं, "मलवाँ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अस्ता गावातून आम्हाला माहिती मिळाली की, एका तरुणाने आत्महत्या केली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, तरुणाचा काही लोकांशी वाद झाला होता. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर तीन जणांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि दलित अॅक्टनुसार तक्रार दाखल करण्यात आली. दोन जणांना अटक केली आहे."
मलवाँ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अस्ता गावातील रमापती दिवाकर यांचा मुलगा धर्मपाल शेती करत असे. मंगळवारी तो बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेला. त्यावेळी गावातीलच काही जणांशी त्याचं भांडण झालं.
धर्मपालचे वडील रमापती दिवाकर यांनी सांगितलं, "माझा मुलगा संध्याकाळी बकऱ्या चरायला घेऊन गेला होता. तलावाच्या किनाऱ्यावर गावातीलच एका व्यक्तीचं आंब्याचं झाड आहे. या झाडाची पानं बकऱ्यांनी खाल्ली होती. त्यावेळी त्या व्यक्तीची तीन मुलं तिथं आली. नूर मोहम्मद, आशिक अली आणि त्यांचा भाचा सलमान अशी त्यांची नावं. या तिघांनीही धर्मपालला मारहाण केली. धर्मपालची आई तिथं गेली, तेव्हा तिलाही शिव्या दिल्या गेल्या. गावातील इतर लोकांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर तो वाद थांबला. जेव्हा पोलीस आले, तेव्हा धर्मपालवर साखळदंड चोरण्याचा आरोप लावण्यात आला. या आरोपामुळे धर्मपाल व्यथित झाला आणि त्यानं आत्महत्या केली."
रमापती दिवाकर यांच्या माहितीनुसार, आरोपींनी याआधीही धर्मपालला मारहाण केली होती. धर्मपालच्या आत्महत्येनंतर गावात तणावाचं वातावरण आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेण्यास नातेवाईकांनी विरोध केला होता. मात्र, गुन्हेगारांवर कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी दिला.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, हे गावगुंड कायमच गावातील इतर लोकांना त्रास देत असतात, मारहाण करत असतात. गावकऱ्यांकडून अनेक तक्रारींनंतरही पोलीस काहीच कारवाई करत नाहीत.
धर्मपालच्या वडिलांच्या माहितीनुसार, धर्मपालला मारहाण झाली तेव्हाही पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. मात्र, आरोपींनी जेव्हा 112 नंबरवर फोन केला तेव्हा पोलीस तातडीने आले.
ते पुढे सांगतात, "ज्या लोकांनी धर्मपालला मारहाण केली, तेच लोक पोलीस घेऊन आमच्या घरी आले होते आणि धर्मपालवर दागिने चोरीचा आरोप करू लागले. त्यामुळे धर्मपाल घरातल्या आतल्या खोली निघून गेला आणि त्याने आत्महत्या केली."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)